शासनाच्या निर्णयाची वाट न पहाता अन्य ग्रामस्थांनी बांध तोडला
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात केंद्र शासनाच्या जनसुविधेअंतर्गत गावडे अवरेवाडी येथे वर्षभरापूर्वी डांबरी रस्ता बनविण्यात आला होता. परिसरातील काही ग्रामस्थांनी चिऱ्याचा बांध घालून हा रस्ता अडविला होता. याबाबत शासनाकडे तक्रार करुनही अवैध बांधकाम तसेच होते. त्यामुळे त्याचवाडीतील अन्य ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला पत्र देवून सदर बांध काढुन रस्ता पूर्ववत केला आहे. Road Problem in Varveli

केंद्र सरकारच्या जनसुविधा योजनेअंतर्गत 5 लाख रुपये खर्च करुन गावडे अवरेवाडी हा 240 मिटरचा रस्ता नव्याने बांधण्यात आला. त्यांचे डांबरीकरणही झाले. सदर रस्त्याचा प्रस्ताव करताना रस्ता ज्यांच्या जागेतून केला आहे अशा अनंत रामा शिंदे, हरिश्चंद्र भागोजी गावडे, राधिका किसन रेवाळे, रुक्मिणी धाकू गावडे व रामचंद्र धाकु बारगोडे यांनी संमतीपत्रही लिहून दिले. ग्रामपंचायतीच्या दफ्तरी 23 नंबरला या रस्त्याची नोंद आहे. Road Problem in Varveli

रस्त्याचे काम फेब्रुवारी 2021 मध्ये झाले. मात्र रस्ता पूर्ण होवून वर्ष होत नाही तोच हरिश्चंद्र भागोजी गावडे यांनीच या रस्त्याला विरोध केला. या रस्त्यावरुन होणारी वहातूक थांबावी म्हणून गावडे यांनी काही ग्रामस्थांना सोबत घेवून रस्त्याच्या मध्यरेषपासून सुमारे 10 फुट लांब रस्ता खोदला आणि चिऱ्याचा बांध घातला. त्यामुळे या रस्त्यावरुन आता दुचाकी देखील ये जा करु शकत नाही. Road Problem in Varveli

यासंदर्भात ग्रामपंचायतीने पंचायत समिती, तहसीलदारांकडे तक्रार केली होती. तंटामुक्त समितीच्या बैठकीतून विषय सोडविण्याचा प्रयत्न झाला. गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले, तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पवार यांनी एकत्रित बैठक घेतली. मात्र ठोस निर्णय होत नव्हता. अखेर त्याच वाडीतील मधुकर बारगोडे यांच्या मुलाने ग्रामपंचायतीला कळवून सदरचा बांध काढुन टाकला. तसेच रस्ता अडविणाऱ्यांपैकी काही जणांनी खोटी कागदपत्रे बनवून शासनाची दिशाभूल केल्याची तक्रारही अधिकाऱ्यांकडे केली आहे. Road Problem in Varveli
बांध काढला असला तरी वर्षभरापूर्वी बांधलेल्या रस्त्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तसेच खोटी कागदपत्रे बनवून दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करुन दंड वसुल करावा.
– सुरेश सावंत, जिल्हाध्यक्ष, आरपीआय (ए)
