70 वर्षांची वाचन परंपरा जपणारी वास्तू, नव्या पिढीसाठी नव्या रुपात येणार
गुहागरच्या वाचनसंस्कृतीचा वारसा जपणारी वास्तु म्हणजे ज्ञानरश्मि वाचनालयाची इमारत. 26 जानेवारी 1950 बांधलेल्या या वास्तुंचे नुतनीकरण करण्याचे संस्थेने ठरविले आहे. नव्या इमारतीमध्ये विविध कक्षांबरोबरच स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेची सुविधाही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
गुहागर सार्वजनिक ज्ञानरश्मि वाचनालयाची उभारणी जिल्हा न्यायाधिश कै. भावे यांनी केली. गुहागरमध्ये वाचनालय असावे अशी त्यांची पत्नी वाराणसीबाई भावे यांची इच्छा होती. ही वास्तू स्वातंत्रवीर सावरकर (1955साली ), आचार्य अत्रे (1958 साली), मधु मंगेश कर्णिक, रहस्यकथाकार सुहास शिरवळकर अशा अनेक महनीय व्यक्तींच्या पदस्पर्शान पावन झाली आहे. तीन वर्षांपूर्वी कोकण विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन याच संस्थेतर्फे करण्यात आले होते. कविता वाचन, कथा वाचन, पुस्तक प्रकाशन असे साहित्य चळवळीला बळ देणारे अनेक उपक्रम वाचनालयातर्फे चालविले जातात. सद्यस्थितीत वाचनालयात सुमारे २७ हजार पुस्तके आहेत. त्यामध्ये दुर्मिळ ग्रंथ, संदर्भ ग्रंथ आदींचा समावेश आहे.
७० वर्षांचा वारसा जपणाऱ्या या वास्तुची दुरुस्ती आणि देखभाल करणे आवश्यक होते. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या वास्तुच्या नुतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. नव्या वास्तुबाबत सांगताना संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर म्हणाले की, वाचन संस्कृती वाढविणे, टिकविणे आणि त्यातून संस्कारक्षम पिढी निर्माण करणे या उद्देशाने गुहागरमध्ये वाचनालय सुरु झाले. आता नव्या पिढीला आवश्यक अशा सुविधांची निर्मिती या इमारतीत केली जाणार आहे. नव्या इमारतीमध्ये बाल विभाग, महिला विभाग, वाचन कक्ष, देवघेव कक्ष असे कक्ष असतील. याशिवाय स्पर्धा परिक्षांसाठी अद्ययावत, संगणकीकृत अभ्यासिका आम्ही विकसीत करणार आहोत. जेणेकरुन तालुक्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसह इंटरनेटवर आधारीत माहिती सहज उपलब्ध होवू शकेल. याशिवाय वाचनालयातर्फे चालणाऱ्या विविध उपक्रमांसाठी एक छोटे सभागृहही बांधण्यात येणार आहे. नुतनीकरणासाठी सुमारे ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च साहित्य प्रेमींच्या देणगीतून उभा केला जाणार आहे. गुहागर न्युजच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील साहित्यप्रेमींना देणगी देण्यासाठी आवाहन केले आहे.
ज्ञानरश्मि वाचनालयाचे उद्घाटन भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी 1950) झाले होते. त्यामुळे नुतनीकरणानंतरचा समारंभ देखील 26 जानेवारी 2021 रोजी करण्याचे संस्थेने निश्चित केले आहे. तत्पूर्वी हे काम पूर्ण व्हावे यासाठी तालुक्यातील साहित्यप्रेमींनी खारीचा वाटा उचलवा. अशी विनंती आहे.
– राजेंद्र आरेकर , अध्यक्ष, ज्ञानरश्मि वाचनालय
आपली देणगी आपण खालील खात्यावर जमा करु शकता.
सार्वजनिक ज्ञानरश्मि वाचनालय
बँकचे नांव : बँक ऑफ इंडिया, शाखा गुहागर खाते क्रमांक : 140110100003779 आयएफएससी कोड : BKID0001401