सुचय रेडिज : संस्थेने अपंगाचे जीवन सुखकर बनवले
गुहागर, ता. 08 : चिपळूण येथील नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड (नॅब), च्या जिल्हा शाखा रत्नागिरी तर्फे गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेला बाई रतनबाई घरडा पुरस्कार 2020 देवून सन्मानित करण्यात आले. नॅबचे अध्यक्ष सुचयअण्णा रेडिज, घरडा केमिकलचे युनिट हेड आर. सी. कुलकर्णी, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी शेंडे यांच्या उपस्थित हा पुरस्कार देण्यात आला. शाल, मानचिन्ह, मानपत्र आणि 11 हजार रुपये असे पुरस्कारचे स्वरुप आहे. Ratanbai Gharda Award


पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना नॅबचे अध्यक्ष सुजयअण्णा रेडिज म्हणाले की, ही संस्था अपंगांसाठी दरवर्षी विविध प्रकारची शिबीरे भरवुन त्यांच्या जीवन सुखकर बनविण्यासाठी कार्य करत आहे. याशिवाय अपंगांसाठी स्वतंत्र वसतीगृह, कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभे करण्याचा या संस्थेचा मानस आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेवून हा पुरस्कार संस्थेला देण्यात येत आहे. यावेळी घरडा केमिकलचे कुलकर्णी म्हणाले की, गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था करत असलेल्या कामाला सलाम केला पाहिजे. गुहागरमध्ये पर्यटनाला येणाऱ्या मंडळींनी देखील वरवेली येथे जावून या संस्थेचे सुरु असलेले कार्य पहावे. Ratanbai Gharda Award


गुहागर तालुका अपंग पुनवर्सन संस्थेने आजपर्यंत 21 वैद्यकिय शिबिरे घेवून 893 अपंगांना अंपगत्व प्रमाणपत्र, एस.टी. भाडे सवलत कार्ड मिळवून दिले आहे. अपंग वधु वर सुचक मंडळातर्फे 17 जणांचे संसार उभे केले. अल्पदरात संगणक, शिलाई प्रशिक्षण, गृहउद्योग प्रशिक्षण वर्ग घेतले. तालुक्यातील अपंगांना 52 तीनचाकी सायकल, 97 वॉकिंग स्टीक, 107 कुबड्या, 31 व्हिलचेअर, 7 वॉकर, 27 जयपूर फुट व 43 कॅलिपर्स असे साहित्य कृत्रिम साहित्य शिबिरातून उपलब्ध करुन दिले आहे. याशिवाय दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, स्वकर्तृत्वावर चरितार्थ चालविणाऱ्या अपंगांचा सत्कार, वरवेली येथील कार्यालयात अपंगांनी बनवलेल्या वस्तुंची विक्री व्यवस्था, जिल्हास्तरीय क्रिक्रेट स्पर्धा, वर्षातून दोन वेळा व्यवसाय मार्गदर्शन आणि शासकीय योजना माहिती शिबीर आदी उपक्रम घेतले जातात. Ratanbai Gharda Award

