शृंगारतळीत Prolife Multi Specialty Hospitalचे उद्घाटन
Guhagar News : शालेय जीवनात वडिलांनी बोलून दाखवलेल्या स्वप्नाची पूर्तता आज डॉ. सचिन ओक करीत आहेत. गुहागर तालुक्यात आज सुसज्ज हॉस्पिटल नसल्याने अनेक रुग्णांना मानसिक, शारिरीक आणि आर्थिक त्रास होतो. हे लक्षात घेवून एम.बी.बी.एस. व मास्टर ऑफ सर्जरी (एम.एस.) या पदव्या घेतलेल्या डॉ. सचिन बाळकृष्ण ओक शृंगारतळीमध्ये Prolife Multi Specialty Hospital सुरु करत आहेत. या अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त अशा रुग्णालयाचे उद्घाटन बुधवारी (ता. 11 जानेवारी) होत आहे. विशेष म्हणजे एम.बी.बी.एस. व नेत्रचिकित्सक असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी ओक यांचा देखील या रुग्णालयाच्या उभारणीत मोठा वाटा आहे.
वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता
डॉ. सचिन ओक यांचे गाव वेळंब (ता. गुहागर). शालेय शिक्षण घेत असताना इयत्ता ७ वी मध्ये सचिन ओक स्कॉलरशीपच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीण झाले. निकालानंतर घरात कौतुक करताना बाळकृष्ण ओक (वडील) सहज म्हणाले की, सचिन मोठा झाल्यावर डॉक्टर हो आणि गुहागर तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी गुहागरमध्ये ये. पुढे सचिनने वैद्यकीय शिक्षणास सुरवात केली. तेव्हाही बाळुशेठ यांनी गप्पा मारताना उच्च विद्याविभुषित होवून गुहागर येण्यास सांगितले. या दोन्ही गोष्टी डॉ. सचिन यांनी लक्षात ठेवल्या होत्या. एम.बी.बी.एस.नंतर एम.एस. पूर्ण केल्यानंतर डॉ. सचिन ओक यांना मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी शहरात सहज वैद्यकीय क्षेत्रात जम बसविता आला असता. परंतू वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे हे डॉ. सचिन ओक यांनी निश्चित केले होते.
डॉ. सचिन यांच्या पत्नी डॉ. सौ. अश्विनी ओक यांचे माहेर विट्याचे. डॉ. सौ. अश्र्विनी यांचे आईवडिलही डॉक्टर. डॉ. अवधुत बापट आणि डॉ. सौ. शुभांगी बापट यांनीही त्यांच्या उमेदीच्या काळात शहरात न जाता गावाची पायवाट चोखळली. विटा आणि आसपासच्या गावातील जनतेसाठी विट्यात श्रीकृपा हॉस्पिटल सुरु केले. स्वाभाविकपणे आईवडिलांचा आदर्श समोर असलेल्या डॉ. सौ. अश्विनी यांनी डॉ. सचिन यांच्या गुहागर तालुक्यात सुसज्ज रुग्णालय उभारण्याच्या इच्छेला पूर्णपणे पाठिंबा दर्शविला. त्यामुळेच आज वैद्यकिय क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित ओक दाम्पत्य, वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आणि गुहागर तालुकावासियांना उत्तम आणि अत्याधुनिक रुग्णसेवा देण्यासाठी कटीबद्ध झाले आहे. Prolife Multi Specialty Hospital
Prolife Multi Specialty Hospital उद्घाटन
शृंगारतळीतील सकीना कॉम्प्लेक्स मध्ये Prolife Multi Specialty Hospital उभे राहीले आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन बुधवारी (ता. 11 जानेवारी) बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक संतोष सावंत देसाई यांच्या हस्ते होणार आहे. आमदार भास्कर जाधव देखील या रुग्णालयाला भेट देणार आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उद्घाटन समारंभाला उपस्थित राहु शकत नाहीत असे त्यांनी कळविले आहे. माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यासह गुहागर तालुक्यातील वैद्यकिय क्षेत्रातील मान्यवरही या उद्घाटन समारंभाला उपस्थित रहाणार आहेत.
रुग्णालयाची गरज पूर्ण
बुधवार पासुन रुग्णसेवेसाठी सज्ज होण्याऱ्या या रुग्णालयात डॉ. सचिन ओक (एम.बी.बी.एस., सर्जन) आणि डॉ. सौ. अश्विनी ओक (एम.बी.बी.एस. व नेत्रचिकित्सक) हे दोघेही पूर्ण वेळ रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय आठवड्यातून एक दिवस अस्थिरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ रुग्ण असे विविध शाखांचे तज्ज्ञ डॉक्टर तपासणीसाठी उपस्थित राहणार आहेत. यामुळे गुहागर तालुकावासीयांची मोठी सोय होणार आहे. एम.एस. डॉक्टर गुहागरमध्ये नसल्याने अनेक वेळा अपघात, हार्ट ॲटक, मेंदुमध्ये रक्तस्त्राव आदी आपत्कालीन स्थितीत उपचारासाठी 40 ते 45 कि.मि.चा प्रवास रुग्णांना करावा लागत असे. निरामय हॉस्पिटल बंद झाल्यानंतर गुहागर तालुक्यात सुसज्ज रुग्णालयाची उणिव सातत्याने भासत होती. Prolife Multi Specialty Hospital मुळे ही उणिव भरुन निघणार आहे.
अत्याधुनिक सुविधा
Prolife Multi Specialty Hospitalमध्ये OPD (बाह्यरुग्ण विभाग) बरोबर IPD ( आंतर रुग्ण विभाग आहे. महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र 7 खाटांचे 2 कक्ष आहेत. एक स्वतंत्र खोली आहे. एक्सरे साठी आधुनिक डिजिटल मशिन आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने युक्त असा शस्त्रक्रिया विभाग (ऑपरेशन थिएटर) असून त्यामध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया देखील करता येणार आहेत. सध्या पूर्वनियोजीत शस्त्रक्रिया इथे होणार आहेत. डॉ. अश्विनी ओक या नेत्रचिकित्सक असल्याने डोळ्यांच्या सर्व आजारांवरील उपचार येथील नेत्र विभागात होणार आहेत. त्यासाठी आवश्यक अशी अत्याधुनिक यंत्रणा (उदा. रेटीना आणि PHACO ऑपरेशन थिएटर ) इथे उपलब्ध करण्यात आली आहे. नेत्ररोगांवरील याशिवाय Ventilator, NIV ची सुविधा, २४ तास अत्यावश्यक सेवा ( Emergency Service), रुग्णालयातच २४ तास सुरु रहाणारे औषध विक्री दुकान (in house pharmacy) आणि पॅथॉलॉजिकल लॅब उपलब्ध असणार आहे.