राजेश बेंडल, गुहागर नगरपंचायतीमधील नागरिक त्रस्त
गुहागर, ता. 19 : उनाड गुरांच्या मालकांना नगरपंचायतीमध्ये बोलावून समज दिली जाईल. त्यानंतरही त्यांची गुरे अन्यत्र भटकत असताना सापडली किंवा कोणी आणून दिली तर कोंडवाड्यात ठेवून दंडात्मक कारवाई केली जाईल. असे आश्र्वासन गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी नागरिकांना दिले.(Problem of Stray Cattle)
1 मे रोजी एक भटकी गाय गुहागर पंचायत समितीच्या खड्ड्यात मृतावस्थेत सापडली होती. या गायीच्या मालकाचा तपास लागला. सदर मालकाने जवळपास पाच वर्ष ही गाय सांभाळली होती. तिच्यापासून झालेली वासरेही त्यांच्या गोठात आहे. तरीही अंत्यसंस्कार करावे लागतील म्हणून सदर गाय विकल्याचे संबंधित मालकाने सांगितले. अन्य मालकही पुढे न आल्याने अखेर गुहागर नगरपंचायतीच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने या गायीला खड्ड्यातून काढून अंत्यसंस्कार केले. त्यानंतर उनाड गुरांचा (Problem of Stray Cattle) प्रश्र्न अधिक चर्चेत आला.
Problem of Stray Cattle
शहरातील सर्वेश भावे यांनी आपल्या वाडीत येणाऱ्या गुरांच्या टॅगवरुन मालकाना शोधले. त्यांची भेट घेतली. आपली गुरे माझ्या वाडीत बांधुन ठेवलीत तरी चालेल. असेही सांगितले. तरीही मालकानी दुर्लक्ष केले. अखेर वैतागलेल्या भावेंनी या उनाड गुरांचा मालकासहीत फोटो फेसबुकवर टाकला. तरीही हा प्रश्र्न सुटला नाही. रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेल्या उनाड गुरांमुळे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. अनेकांच्या वाडीतील नारळी पोफळीची रोपे (plantation) खावून टाकली. शिंपण्यासाठी लावलेले ठिबक सिंचनच्या वाहिन्या (drip irrigation pipes) गुरांच्या फिरण्यामुळे मोडल्या आहेत. काहींनी अंगणात वाळत घातलेले गहु, तांदुळ गुरांनी खाल्ले. रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेल्या उनाड गुरांमुळे दुचाकीस्वार जखमी झाले (Accident due to Stray Cattle) आहेत. नुकसानीला कंटाळून अखेर गुहागर शहरातील 20-25 नागरिकांनी आज नगराध्यक्षांची भेट घेतली. उनाड गुरांमुळे होणारे नुकसान, मालकांकडून मिळणारी अरेरावीची उत्तरे याबाबत नगराध्यक्षांना माहिती दिली. उनाड गुरांच्या त्रासामधुन कायमची सुटका करावी. अशी विनंती केली.
यावेळी झालेल्या चर्चेनंतर नगरपंचायतीच्या कचरा गाडीवरुन उनाड गुरांबाबत उद्घोषणा केली जाईल. टॅग नसलेल्या गुरांची जबाबदारी पशुसंवर्धन खात्याकडे दिली जाईल. टॅग असलेल्या उनाड गुरांच्या मालकांना नगरपंचायतीमध्ये बोलावून ताकीद दिली जाईल. त्यानंतरही उनाड गुरे सापडल्यास अथवा नागरिकांनी आणून दिल्यास कोंडवाडा सदृष्य इमारतीमध्ये गुरांना दोन दिवस ठेवले जाईल. गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई नगरपंचायत करेल. असे आश्र्वासन नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिले.
मात्र गुरे सोडविण्यासाठी मालक आलाच नाही तर काय असा प्रश्र्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. या मुद्द्यावर नगरपंचायत कायद्यामध्ये नेमके काय सांगण्यात आले आहे. याची माहिती घेवूनच पुढील कार्यवाही करावी लागेल. नियमबाह्यपणे सदर गुरे गोशाळेला देता येणार नाहीत. अशा गुरांचा लिलाव करण्याची तरतूद आहे का हे पहावे लागेल. असेही यावेळी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी सांगितले.
यासंदर्भातील गुहागर न्यूजचा व्हिडिओही अवश्य पहावा.