कृषी भुषण पुरस्कार प्राप्त साळवी यांनी मागितली शासनाकडे दाद
गुहागर, ता. 4 : प्रदुषण मंडळाने हवा व पाणी प्रदुषणाबाबत नोटीस देवून शासनाच्याच कृषी पर्यटन (Agro Tourism) व पर्यटन (Tourism) धोरणात अडसर निर्माण केला आहे. असे मत माझ्या मामाचे गाव पर्यटन केंद्राच्या संचालिका व जिजामाता कृषी भुषण पुरस्कार प्राप्त सौ. सुजाता साळवी यांनी शासनाला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने हवा व पाणी प्रदुषणाबाबत दाखले घेण्यासंदर्भात गुहागरमधील सुमारे 12 पर्यटन व्यावसायिकांनांही नोटीस पाठवली आहे. याबाबत मुंढर मधील माझ्या मामाचे गाव पर्यटन केंद्राच्या संचालिका आणि 2007 मध्ये महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषी भुषण पुरस्कार मिळविणाऱ्या सौ. सुजाता विजय साळवी यांनी शासनाकडे दाद मागितली आहे. त्यांनी या अन्यायकारक नोटीसी विरोधात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरणच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
या पत्रात सौ. साळवी लिहितात की, 2016 मध्ये महाराष्ट्र शासनाने पर्यटनाचे नवे धोरण (Tourism Policy 2016) सुरु केले. या धोरणामुळेच कोकणात कृषी पर्यटन, होम स्टे (Home Stay) ला चालना मिळाली. शेती व पर्यटन उद्योगाची साखळी निर्माण झाली आहे. त्यातून कोकणातील तरुणांच्या हाताला काम व त्यापासून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही सुरु आहे.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, विभागीय कार्यालय कोल्हापूर यांनी जल प्रदुषण (Water Pollution) कायदा 1974 आणि वायू प्रदुषण (Air Polltion) कायदा 1981 नुसार परवानगी घेण्याबाबत नमुद केले आहे. येथील पर्यटन केंद्रांमध्ये घरगुती पध्दतीने रहाण्याची व जेवणाची सोय करण्यात येते. कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, छोटे हॉटेल्सचा परिसर हा हिरवागार असून या परिसरात पूर्णत: फळझाडे, फुलझाडांसह विविध प्रकारच्या वनस्पतींचे जनत करण्यात येते. या केंद्राच्या परिसरातील सांडपाण्याचा वापर फळ व फुलझाडांना देवून करण्यात येतो. त्यामुळे हवा व पाणी यांचे प्रदुषण होऊ शकेल अशा प्रकारच्या कोणत्याही बाबी पर्यटन केंद्र परिसरात नाहीत. स्वाभाविकपणे जल व वायू प्रदुषण कायद्यांचे उल्लंघन होत नाही.
आतातर कोकणच्या विकासासाठी इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन ची नाविन्यपूर्ण कल्पना शासनातर्फे राबविण्यात येत आहे. असे असताना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (Maharashtra Pollution Control Board) धोरणामुळे ग्रामीण भागातील पर्यटन व्यवसायात अडसर निर्माण होत आहे. तरी कोकणात पर्यटन उद्योग करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना पाणी व हवा प्रदुषण परवानगीच्या अटीतून सूट देण्यात यावी.
नेत्यांनी घेतली पत्राची दखल
सौ. सुजाता साळवी यांचे पत्राची दखल मंत्री उदय सामंत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. दोन्ही नेत्यांनी योगायोगाने एकाच दिवशी 10 फेब्रुवारीला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार केला. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. त्याचवेळी पर्यावरणच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या कार्यालयालाही हे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना दिलेल्या प्रदुषण मंडळाच्या नोटीसांबाबत धोरणात्मक निर्णय होईल. अशी अपेक्षा व्यावसायिक करत आहेत.
कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना प्रदूषण मंडळाच्या नोटिसा
(ही बातमी वाचण्यासाठी लाल रंगातील शब्दांवर क्लिक करा)