गुहागर नगरपंचायत : राष्ट्रवादीच्या मतात वाढ, उबाठाची मते स्थीर
गुहागर, ता. 23 : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा आमदारांना असलेला विरोध अधोरेखित केला आहे. त्याचवेळी विधानसभेत उबाठा शिवसेनेला मिळालेली मते आजही हललेली नाहीत. एकला चलो रे च्या भुमिकेत राहून राष्ट्रवादीला काहीही साध्य करता येणार नाही. भाजप सेना युतीने एकीने, उत्तम समन्वयाने आगामी निवडणुका लढविल्या तर मतदार यशाचे माप त्यांच्या झोळीत टाकतील. हे या निवडणुकीने सिध्द केले आहे. एकहे येथील कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी निवडणूक अंगावर घेत यश मिळविल्याचेही या निवडणुकीतून दिसून आले आहे. Political analysis of the Guhagar Election
गुहागर नगरपंचायतीची स्थापना आमदार जाधव यांनी केली त्यानंतरच्या केवळ एकाच निवडणुकीत गुहागरची एकहाती सत्ता आमदार जाधव यांना जनतेने दिली होती. मात्र मागील आणि आज झालेल्या निवडणूकीत आमदार जाधव आणि त्यांच्या पक्षाचा पराभव हेच राजकीय उद्दीष्ट होते. गतवेळी राजेश बेंडल यांनी शहर विकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केला. यावेळी आघाडीच्या ऐवजी भाजप सेना युती होती. या दोन्ही वेळेला मतदारांच्या माध्यमातून हे राजकीय उद्दीष्ट साध्यही झाले. आमदार भास्कर जाधव यांचे नेतृत्व जनतेने नाकारले, हे जरी खरे असले तरी विधानसभा 2024 मध्ये आमदार जाधव यांना मिळालेल्या मतांइतकीच (1266) मते यावेळीही उबाठा शिवसेनेला (1105 नगराध्यक्ष पदासाठी तर 1119 प्रभागनिहाय) मिळाली आहेत. Political analysis of the Guhagar Election

राजेश बेंडल यांना मिळालेल्या विधानसभेच्या मतांशी (2758) तुलना करायची झाली तर महायुतीची मते वाढली आहेत. नगरपंचायत निवडणुकीत भाजप सेना युतीच्या उमेदवार निता मालप यांना मिळालेली 2135 आणि राष्ट्रवादी काँग्रसेच्या सुजाता बागकर यांना मिळालेली 1138 या दोन्हीची बेरीज 3273 होते. याचा अर्थ महायुतीच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. परंतू जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणार नाही असे विधान पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. त्याचा विचार केला तर भाजप शिवसेनेला अपेक्षित मते मिळालेली नाहीत हे ही वास्तव स्विकारावे लागेल. Political analysis of the Guhagar Election
गुहागर नगरपंचायतीच्या आजच्या निवडणुकीने पुन्हा एकदा गुहागरात भाजप सेना युतीची राजकीय अपरिहार्यता समोर आली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये हे दोन पक्ष पुन्हा एकत्र आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला युतीच्या एकजुटीचा फटका बसु शकतो. मात्र त्यासाठी जागा वाटपाचे गणित योग्य न्यायाने भाजप आणि शिवसेनेला सोडवावे लागेल. गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे समन्वय ठेवावा लागेल. Political analysis of the Guhagar Election
राष्ट्रवादीच्या मतात वाढ झाल्याचा दावा तालुकाध्यक्ष साहील आरेकर करीत आहेत. हा दावा खोटा आहे असे म्हणून चालणार नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक उमेदवार, अन्य उमेदवारांबाबत असलेली नाराजी याचाही परिणाम मतांवर होत असतो. नगरपंचायतीसारख्या छोट्या निवडणुकीत तालुकाध्यक्ष साहील आरेकर यांनी दाखविलेले धाडस निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र महायुती म्हणून राष्ट्रवादी लढली असती तर आणखी एका नगरसेवकाच्या विजयाचे दान पदरात पडले असते. त्यामुळे जिल्ह्यात महायुती नसली तरी गुहागर तालुक्यात महायुतीचे गणित जुळविण्यासाठी साहील आरेकर प्रयत्नशील राहीले पाहिजेत. तरच केंद्र आणि राज्यात असलेल्या सत्तेचा फायदा राष्ट्रवादीला गुहागर तालुक्यात घेता येईल. Political analysis of the Guhagar Election
