पिंपरमधील घटना, कालवा फोडल्याने पाणी वस्तीत
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पिंपर धरणाच्या Pimper Dam देखभालीच्या कामाचे वेळी एक झडप सुमारे 10 मिनीटांसाठी उघडण्यात आले. यावेळी प्रचंड वेगाने बाहेर पडलेले पाणी ग्रामस्थांनी मे महिन्यात फोडलेल्या कालव्यांमुळे वस्तीत शिरले. अचानक आलेल्या पाण्यामुळे धरण फुटल्याची अफवा पसरली. मात्र तातडीने तालुका नैसर्गिक आपत्ती प्रशासनाने लक्ष घातल्याने खरी बाब समोर आली. Pimper Dam

पिंपर धरणाची दुरुस्ती
गुहागर तालुक्यातील पिंपरच्या धरणावर बसवलेल्या झडपा नादुरुस्त झाल्याने गेल्यावर्षी पासून धरणाला Pimper Dam गळती लागली होती. यावर्षी गळती वाढली. सदर गळती रोखली नाही तर पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होईल अशी भिती होती. त्यामुळे लघु पाटबंधारे विभागामार्फत अभियंता सुभाष बागेवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपर धरणावरील झडपा उघडझाप करणाऱ्या यंत्रणेची दुरुस्ती व देखभालीच्या काम मे महिन्याच्या अखेरीस हाती घेण्यात आले होते. हे काम अजुनही पूर्ण झालेले नाही. याच कामाचा भाग म्हणून 9 जुलैला दुपारी धरणाची एक झडप उघडण्यात आली. नुकत्याच झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला होता. त्याच्या प्रचंड दाबामुळे या झडपेतून वेगाने पाण्याचा निचरा झाला. हे पाणी डाव्या बाजुच्या कालव्याने वाहून जाणे अपेक्षित होते.

गावात घुसले पाणी
पिंपरमधील धरणाच्या डाव्या बाजुला असलेल्या कालव्याचे पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. पिंपरमधील बागायदारांनी मे महिन्यात झाडांना पाणी मिळावे म्हणून ठिकठिकाणी डाव्या बाजुचा कालवा फोडला होता. पावसाळा सुरु झाल्यानंतर फोडलेला कालवा बंद करणे आवश्यक होते. मात्र काही बागायतदारांनी याकडे दुर्लक्ष केले. आज 9 जुलैला धरणाची झडप उघडल्यानंतर वेगाने वाहत आलेले पाणी फुटलेल्या कालव्यातून बागांमध्ये आणि नंतर वस्तीत शिरले. हा प्रवाह वेगवान आणि मोठा होता. (बातमी खालील व्हिडिओ पहावा.) अचानक वेगाने वहात आलेल्या पाण्यामुळे त्या वस्तीत घबराट पसरली. पिंपरचे धरण फुटल्याची अफवा पसरली. Pimper Dam

जागरुक प्रशासन
पिंपरमधील घटनेची माहिती कळताच नैसर्गिक आपत्ती कक्षाची यंत्रणा तातडीने कामाला लागली. लघु पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून नेमके काय घडले याची माहिती तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी घेतली. ही माहिती पिंपरचे तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी यांच्यापर्यंत पोचली. तोपर्यंत ही मंडळी पिंपर गावात पोचली होती. त्यांनी ग्रामस्थांना धीर देत घडला प्रकार सांगितला. वस्तीत शिरलेले पाणी कमी होईपर्यंत अधिकारी गावात थांबुन पहाणी करत होते. त्यामुळे लोकांमधील भयगंड नाहीसा होण्यास मदत झाली. Pimper Dam

पाण्याचा प्रवाह थांबला
दरम्यान पिंपर गावात घुसलेले पाणी, गावकऱ्यांमधील घबराट, आपत्ती कक्षाने केलेली धावपळ या गोष्टींची कल्पना धरणावर काम करणाऱ्या यांत्रिकी विभागाला नव्हती. झडपाची उघडझाप होत असल्याचे लक्षात आल्यावर सुमारे 10 मिनिटात यांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झडप बंद केले. पाण्याचा निचरा थांबला. वस्तीतील पाण्याचा वेगही कमी झाला. सुमारे तासाभरानंतर वस्तीतून वाहून जाणारे पाणीही थांबले. Pimper Dam
धरणावरील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
धरणाचे काम करत असताना पाणी सोडण्यात येणार असेल तर त्याची माहिती स्थानिक प्रशासनासह नैसर्गिक आपत्ती विभागाला द्यावी. अशा सूचना तहसीलदार सौ. वराळे यांनी लघु पाटबंधारे विभागाला तसेच ठेकेदाराला दिल्या होत्या. मात्र आज पिंपर धरणाचे झडप उघडण्यापूर्वी या दोघांनी याची पूर्वसूचना दिली नाही. Pimper Dam
लघु पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांची माहिती
या संपूर्ण प्रकारानंतर तातडीने लघु पाटबंधारेचे अधिकारी खोत यांनी जिल्हा माहिती कार्यालय आणि तहसीलदार गुहागर यांना काही फोटो आणि व्हिडिओ पाठवले. तसेच पिंपर धरण सुस्थितीत असल्याचे जाहीर केले. खोत म्हणाले की, पिंपर धरणाच्या गेट दुरुस्तीचे काम यांत्रिकी विभागामार्फत प्रगतीपथावर असून डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. परंतु लोकांनी उन्हाळी सिंचनासाठी कालव्याचा काही भाग फोडलेला होता, त्यामधून सदरचे पाणी वस्तीकडे गेले. आत्ता कलव्या मधील पाणी बंद असून कोणतेही नुकसान झाले नाही. पिंपर धरण सुस्थितीत असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
पिंपर गावात घुसलेले पाणी
(व्हिडिओ पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा)
