पत्रकार शिरिष दामले
Guhagar News : गुहागरमध्ये एका घरी जायचे होते. तेथील एका गृहस्थाला विचारले अमुक घरी जाण्याची खूण काय? तो म्हणाला रिक्षावाल्याला सांगा पाटणकर मॅडमच्या घरी जायचे आहे. हा सुखावणारा धक्का होता. ते पत्रकार ना? अमुक अमुक सांगा याऐवजी चक्क मॅडमचे (त्याच्या आईचे) नाव सांगा. म्हणजे मॅडमची ओळख पत्रकारापेक्षा अधिक आहे तर. हा किस्सा असेल 15 वर्षांपूर्वीचा. 26 जानेवारीला नुकताच त्यांच्या घरी गेलो तो मॅडमचे निधनानंतर. त्यांच्या कुटुंबियांना भेटायला. त्या दिवशी मुद्दाम रिक्षावाल्याला विचारले .पुन्हा पाटणकर मॅडमचे घरीच. किमान 30 वर्षे ही ओळख संस्कृत विषय शिकविणाऱ्या शिक्षिकेला मिळते यात गुहागरची संस्कृती दिसते अन् मॅडमनी मिळवलेलं स्थान. मॅडमचे कुटुंबियांशी अन् गुहागरातील अनेकांशी बोलताना लक्षात आलं मॅडमनी संस्कृत आणि संस्कृतीही जपली. Patankar Madam
तळमळीची शिक्षिका, पुस्तकप्रेमी, सामाजिक कार्यकर्ती, गृहिणी असे त्यांचे अनेक पैलू कळत गेले. जे सहजपणे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे भाग होते. त्यात मिरवणे अजिबात नव्हते. संस्कृत शिक्षिका ही मॅडमची सुमारे 35 वर्षातील ओळख. परंतु त्याचे शिकविण्याचे मूळ विषय होते मराठी आणि हिंदी हे खूप कमीजणांना माहिती आहे. शाळेत संस्कृत शिकवायला जोशी सर (शास्त्रीबुवा) होते. त्यांच्यानंतर सौ. रेखा देशपांडे या संस्कृत विषय शिकवत. मॅडम या दोघांमुळे संस्कृत शिकल्या. त्यानंतर संस्कृत घेवून बीएड केले. आणि पुढे संस्कृत शिक्षिका म्हणूनच ओळख बनली. जिद्द,चिकाटी अन् सस्कृतची आवड असल्याविना हे शक्य नाही. Patankar Madam
निवृत्तीनंतरही पाच वर्ष त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत संस्कृत शिकवले. CBSC बोर्डाच्या अनेक विद्यार्थ्यांना संस्कृत विषय शिकविताना इंग्रजी भाषेचाही अभ्यास करावा लागला. तोही त्यांनी केला. त्यांच्यासाठी संस्कृत केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नव्हते. अनेकवेळा एखाद्या संस्कृत शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी त्या तज्ञांशी चर्चा करत. आपलं शिकवणं विद्यार्थ्यांना कळले पाहिजे हा अट्टाहास असायचा. जर एखाद्या सुभाषिताचा, शब्दाचा अर्थ विद्यार्थ्याला कळला नाही तर तो त्यांना त्यांचा कमीपणा वाटे. अभ्यासक्रम तोच असला तरी मॅडमचे शिकविण्याची पध्दत विद्यार्थ्यांगणिक बदलायची. याच वृत्तीमुळे त्या विद्यार्थीप्रिय होत्या. काही वर्षे आधी निवृत्तीचा घेतलेला निर्णय संस्थाचालकांनी अमान्य केला होता. ही त्यांच्यासाठी पावतीच होती.त्यांच्यातील शिक्षकाला दिलेली दाद होती. Patankar Madam
अमृता माळवदेसारख्या धोपाव्यातून गुहागर हायस्कुलला शिकण्यासाठी येणारी मुलीने पुणे विद्यापीठात संस्कृत मधुन एम. ए. होताना चार सुवर्णपदके पटकावली. याचे श्रेय अमृता आजही पाटणकर मॅडमना देते. अनेक होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्या मदत करत.यात मला नवल वाटत नाही पण अनेक नवोदित शिक्षकांसाठीही पाटणकर मॅडम म्हणजे मन मोकळे करण्याचे हक्काचे स्थान होते. शाळेतील नोकरी संपल्यानंतरही अनेक शिक्षक शिक्षिका त्यांना भेटायला घरी येत असतं. त्यांची त्या जणू समुपदेशिका होत्या. Patankar Madam
वेळंबमधील ओक बाई महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भाऊबीज निधी संकलनाचे काम करायच्या. त्यांनी हे काम मंडळाकडे सोपविले. दिवाळीच्या सुट्टीत भाऊबीज निधी जमा करण्यासाठी त्या फिरायच्या. त्या निधी न्यायला आल्या नाहीत तर देणगीदारांचा फोन यायचा. निवृतीनंतर निधी संकलनाचा आवाका त्यांनी वाढवला. पुण्यात मुलगा महेशकडे जायच्या तर तिथे देखील अनेकांकडून भाऊबीज निधी घ्यायच्या. गुहागर तालुक्यातील काही शिक्षकांनाही या कामात त्यांनी सहभागी करुन घेतले होते. भाऊबीज योजनेसाठी सर्वाधिक निधी संकलक म्हणून महर्षि स्त्री शिक्षण संस्थेने त्यांचा सत्कार केला. तेव्हा या कामाची व्याप्ती आम्हाला कळली हे त्यांच्या चिरंजीवांचे उद्गार म्हणजे मॅडम किती सहजपणे कोणताही आव न आणता गाजावाजा न करता काम कस करावं याचा वस्तुपाठ होता. Patankar Madam
मॅडमचे वडिल माधव काटदरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करायचे. पती नाना पाटणकर हे देखील संघ कार्यकर्ते असल्याने घरात कायमच संघ प्रचारक, संघ कार्यकर्ते यांचे जाणेयेणे. त्यांनी नोकरी करत असतानाही अनेक प्रचारकांना वेळीअवेळी जेऊखाऊ घातले. आणिबाणीच्या काळात वसंतराव केळकर त्यांच्या घरी दीड महिना नाव बदलून राहीले होते. आज संघप्रेमींना चांगले दिवस आले आहेत पण तो काळ संघविरोध जोरात असण्याचा होता त्यावरून मॅडमचा कणखरपणा लक्षात येईल.
वडिलांचपाठोपाठ त्यांची दोन्ही मुले संघचे काम करु लागली. त्यावेळी पतीकडे जनकल्याण समितीचे काम आले. सोबतच शिवथरघळसाठी त्यांचे पती काम करु लागले. परिणाम घरात या सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांना राबता वाढला. मॅडम या सर्वांचे स्वागत आईच्या मायेने करत. तालुका प्रचारकांसाठी तर मॅडम म्हणजे आईच होती. वेळ पडल्यास मॅडम प्रचारकांच्या आरोग्याची काळजीही त्यांनी घेतली. यासाठी त्यांचा सेवाभावी स्वभाव उपयोगी पडला. Patankar Madam
मॅडमनी त्यांच्याआजारी दीराची सेवा केली. सासु सासऱ्यांचीही सेवा केली. स्वत:ची आई आजारी असताना शीरला जावून आईची सेवाही केली. भावजय आजारी असतानाही अनेकदा शीरला जावून तिचे सर्व केले यावर त्यांचा मुलगा मयुरेश सांगतो की या सर्व काळात आईला कधी चिडलेले, रागावलेले, दमलेले त्यांनी पाहिले नाही. ती सदासर्वकाळ आनंदी, सकारात्मक असायची. यासाठीओठी आंतरिक ताकद लागते.ती त्यांच्यापाशी होती.नाना असोत,त्यांची मुले असोत,त्यांच्या समाजसेवेमागे ,संघकार्य मागे मॅडमचा भरभक्कम आधार होता. या साऱ्यांसोबत वावरताना त्यांना स्वतःची ओळख होती.आत्मभान होते. Patankar Madam
त्यांच्याकडे शाळाबाह्य संस्कृत पुस्तकांचे संकलन होते. याशिवायही अनेक पुस्तके नेहमी विकत घेत. पाहुण्यांबरोबर घरी आलेल्या मुलांच्या हातावर भेट म्हणून त्या पुस्तके ठेवत. त्यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांना आवडतील अशी पुस्तके त्यांच्याकडे कायम असायची. विविध शाळांमधील ग्रंथालयांनाही अनेक पुस्तके त्यांनी दिली आहेत.
पतीचे दोन अपघात, उभं राहिलेलं घर पडणं, स्वत:वर झालेल्या दोन शस्त्रक्रिया अशा संकटांनाही त्या धिराने सामोत्या गेल्या. कॅन्सर बळावला तेव्हा केमोच्या उपचारांतून रोजचं मरणं नको त्यापेक्षा जे होणार आहे ते मी आनंदाने स्वीकारणार ही भूमिका त्यांनी घेतली हे सोपे नाही. मृत्यूला कणखरपणे सामोरे जाणे हा आपल्या हिंदू सस्कृतीचा भाग आहे.हिंदुत्वाचे गोडवे गायले तरी मृत्यूचे स्वागत करणे भल्याभल्यांना साध्य होत नाही.मॅडमना ते झाले. आपली सस्कृती जपण्याचा पाठच त्यांनी घेतला. सस्कृत अन् सस्कृती जपणारी माऊली ही ओळख सार्थ ठरवली म्हणून पाटणकर मॅडमच घर मनात घर करून राहिले. ती ओळख एका शिक्षिकेची कधीही न पुसणारी. Patankar Madam
