साचलेल्या पाण्याने दुर्गंधी पसरली; ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
गुहागर : तालुक्यातील पालशेत समुद्र किनाऱ्यावर पावसाळ्यात एक बार्ज वाहून आला. हा बार्ज नदी समुद्राला मिळते तिथे अडकला. परिणामी नदीचा प्रवाह थांबला. आणि बाजारपेठ पुल येथील समुद्रापर्यंत असलेल्या नदीमध्ये साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यावर त्वरित कार्यवाही करण्यासाठी गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे यांना पालशेत शिवसेना शाखा प्रमुख मिनार पाटील व शिवसैनिकांनी निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, पालशेत बाजारपेठ पुल येथील समुद्रापर्यंत असलेल्या नदीमध्ये पाणी साचले आहे. काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पाण्याची परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या परिसरातून जाताना ग्रामस्थ नाकावर रुमाल घेऊन ये जा करत आहेत. पालशेत समुद्रकिनाऱ्यावर पावसामध्ये वाहून आलेले महाकाय बार्ज याच नदीच्या प्रवाहावर किनारी लागले आहे. पाण्याचा प्रवाह बदलले आहे आणि नदीचे पाणी थांबले आहे. सदरील बंद झालेल्या पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग पूर्ववत करून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
दरम्यान, याआधी सहाय्यक बंदर निरीक्षक, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, पालशेत व मंडळ अधिकारी, पालशेत व तलाठी, पालशेत यांना दिलेल्या निवेदनानंतर सर्व अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. परंतु अद्याप त्यावर प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही, असे मिनार पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व विभाग प्रमुख प्रवीण ओक, नरेंद्र नार्वेकर, रमेश नार्वेकर व शिवसैनिक उपस्थित होते.