जि.प.सदस्या नेत्रा ठाकुर यांचाही सहभाग, गावकऱ्यांनी केले कौतूक
गुहागर, ता. 21 : शिमगोत्सवातील सर्व कार्यक्रम बहुतांश ठिकाणी पुरुष करतात. अगदी खेळ्यांमधील राधा, कोळीणीचे कामही साडी नेसून, मेकअप करुन पुरुष करतात. अशा संस्कृतीमध्ये महिलांनी थेट सहाणेवरच पालखी खांद्यावर घेवून नाचवली. ही घटना प्रथमच घडत असली तरी उपस्थित गावकरी, मानकरी सर्वांनीच या बदलाचे स्वागत केले. विशेष म्हणजे शीरची माहेरवाशीण असलेल्या जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकुर यांनी देखील पालखी नाचविण्याचा आनंद सहाणेवर लुटला. Palkhi Danced by Women


शिमगोत्सवाची पालखी घरी येते तेव्हा अनेक महिला आनंदाने पालखी नाचवतात. सध्या आधुनिकतेची कास धरताना काही मंडळींनी नमनाच्या व्यावसायिक प्रयोगांमध्ये गौळणीत महिलांना, मुलींना स्थान दिले आहे. पण कोकणातील बहुतांश गावात परंपरने चालत आलेल्या शिमगोत्सवातील कोणत्याच कार्यक्रमात महिलांचा थेट सहभाग नसतो. पालखीचे दर्शन आणि ग्रामदेवतेची ओटी भरण्यासाठी महिला सहाणेवर येतात. मात्र सहाणेवरील झाडलोट करण्यापासूनची सर्व कामे पुर्वांपार पुरुषच करतात. Palkhi Danced by Women
यावर्षीला होम लागल्यावर ग्रामस्थांनी पालखी नाचवत सहाणेवर आणली. तिथे पालखी नाचवत असताना एका महिलेने पालखी नाचविण्याची इच्छा प्रदर्शित केली. उपस्थितांनी त्या महिलेला परवानगी दिल्यानंतर एकेक करत काही महिला पालखी नाचविण्यासाठी पुढे आल्या. यावेळी होळीसाठी माहेरी आलेल्या वेळणेश्र्वर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकुर यांनी महिलांना पालखी नाचवताना पाहिले. त्यांनी देखील सहाणेवर पालखी नाचवली. या नवीन बदलाचे उपस्थित ग्रामस्थ आणि मानकऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. Palkhi Danced by Women

