रवींद्र चव्हाण : कोकणवासीयांनी येथील कला जगात पोचवाव्यात
गुहागर, ता. 17 : आई चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळण (ता. गुहागर) यांनी जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचा विजेता ठरला. तनाळीच्या (ता. चिपळूण) वाघजाई देवी नृत्य पथक उपविजेते ठरले. गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. Palkhi Dance Competition Result
गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. उद्घाटन समारंभात बोलताना मंत्री चव्हाण म्हणाले की, कोकणातील दशावतार, नमन, जाखडी आणि पालखी नृत्य या पारंपरिक लोककलांमधुन विविध कलांचा आविष्कार पहायला मिळतो. या लोककला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगासमोर आणण्याचे काम कोकणातील सामाजिक व्यवस्था नेहमीच करत असते. डोंबीवलीत वर्षप्रतिपदेच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रा संघाने गणेश मंदिर संस्थानद्वारे केली. आज नववर्ष स्वागत यात्रा केवळ महाराष्ट्रात, देशात नाही तर जगाभरात गुढीपाडव्याला निघते. एखादी चळवळ सामाजिक बांधिलकीने सुरु होते. तेव्हा समाजातून त्या चळवळीला स्वाभाविक पाठींबा मिळतो. Palkhi Dance Competition Result
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकार संघाने ही स्पर्धा आयोजित केली. आता येथील समाज व्यवस्थेने ही लोककलेला पुढे न्यावे. गुहागर तालुका पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेत तनाळी व शिरवली (ता. चिपळूण), मळण, पालपेणे आणि वरवेली (ता. गुहागर) या पाच संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये केवळ अर्ध्या गुणाच्या फरकाने मळणचे आई चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक विजेते (92 गुण) ठरले. त्यांना रु. 15 हजार 555 व चषक देवून गौरविण्यात आले. वाघजाई देवी पालखी नृत्य पथक तनाळी उपविजेते (91.5 गुण) ठरले. त्यांना रु. 7 हजार 777 व चषक देवून गौरविण्यात आले. तर तृतीय क्रमांक हसलाई देवी पालखी नृत्य पथक वरवेली यांनी पटकावला. त्यांना रु. 5 हजार 555 व चषक देवून गौरविण्यात आले. भैरी चंडिका प्रसन्न पालखी नृत्य पथक शिरवली, ता. चिपळूण व श्री खेम वरदान पालखी नृत्य पथक पालपेणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. दोन्ही संघांना रु. 3 हजार व चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेचे समालोचन वैभव पवार यांनी तर परिक्षण बंटी महाडीक, रामपूर व रामचंद्र जड्यार, चिपळूण यांनी केले. स्पर्धा प्रमुख म्हणून पत्रकार संकेत गोयथळे यांनी काम पाहीले. Palkhi Dance Competition Result
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, नगराध्यक्ष राजेश बेंडल, तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, माजी आमदार डॉ. विनय नातू, शिवसेना (उ.बा.ठा.) जिल्हा प्रमुख सचिन कदम, भाजपचे जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, भाजपचे नगरपचांयतीचे गटप्रमुख उमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. Palkhi Dance Competition Result