गुहागर, ता.22: येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी जुनेजाणते कार्यकर्ते पद्माकर आरेकर पुन्हा निवड करण्यात आली आहे. शहरातील ज्ञानरश्मि वाचनालयातील डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी नुकताच तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. आगामी निवडणुकांची तयारी सुरू असताना तालुकाध्यक्ष पद रिक्त राहु नये अशी वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. म्हणून खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी रिक्त झालेल्या तालुकाध्यक्ष पदावर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते निवड करावी अशी सूचना केली होती.
त्यानुसार आज गुहागर शहरातील ज्ञानरश्मि वाचनालयाच्या डॉक्टर तानाजीराव चोरगे सभागृहात गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा सरचिटणीस विजय मोहिते, जेष्ठ नेते व माजी तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी, नगराध्यक्ष राजेश बेंडल, सेक्रेटरी प्रदीप बेंडल, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर, तालुका उपाध्यक्ष वैभव आडवडे व पांडुरंग पाते, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. स्नेहा भागडे, ओबीसी सेल अध्यक्ष अजित बेलवलकर , नगरसेविका सौ. सुजाता बागकर, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, दीपक शिरधनकर, पडवे गट अध्यक्ष तुषार सुर्वे, उपाध्यक्ष संतोष मोरे, अनिल शिंदे , राजू भागडे, रोहित मालप, सौरभ भागडे, शुभम शेटे, मानसी शेटे , मयुरेश कचरेकर, शशांक बागकर आदी उपस्थित होते.
पक्ष कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी, संघटनेला अधिक बळकटी मिळावी यासाठी तालुक्याची जाण असलेला कार्यकर्त्यांना परिचित असलेला अध्यक्ष हवा. समोर कितीही मोठे आव्हान उभे राहिले तरी पक्षाच्या ध्येय धोरणांप्रमाणे काम करणारी सर्वमान्य व्यक्ती अध्यक्ष म्हणून हवी. असा विचार करून, तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार जेष्ठ नेते पद्माकर आरेकर यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. यापूर्वी तालुकाध्यक्ष राहीलेले पद्माकर आरेकर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्याच प्रमाणे जेष्ठ नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस या प्रदेश स्तरावरील सेलचे ते सदस्य आहेत.
पद्माकर आरेकर यांचे निवडीमुळे पुन्हा एकदा गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना क्रियाशील केले जाईल. नव्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस लढेल आणि यश मिळवेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.