रामचंद्र केळकर; जिल्ह्यातून १७ नोव्हेंबरला कर्मचारी सहभागी होणार
रत्नागिरी, ता. 11 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांनी १७ नोव्हेंबर रोजी पुण्यात महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरील शासनाच्या दुर्लक्षाविरोधात ही आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर यांनी दिली. विविध मागण्यांवर शिक्षण मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही तोडगा न निघाल्याने हा मोर्चा आयोजित करण्यात येत असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले. Non-teaching organizations’ march
२००४ पासून माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद असल्याने शाळांमधील कामकाज होत नाही. निवृत्ती, मृत्यू किंवा बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत असून, कमी कर्मचाऱ्यांवर वाढता कामाचा ताण येत आहे. शासनाकडून अनेक प्रस्ताव सादर करूनही, १०/२०/३० वर्षांच्या कालबद्ध प्रगतीसह विविध लाभांवर निर्णय प्रलंबित आहे. लेखनिक-वर्ग, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, शिपाई यांना पाच वर्षे, दहा वर्षे, पंधरा वर्षे पदोन्नती यांसारखे कोणतेही सेवा लाभ मिळत नसल्याची खंत संघटनांनी व्यक्त केली. Non-teaching organizations’ march

शाळा व्यवस्थापन, संस्थाचालक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातील प्रश्न सोडवण्यासाठी अनेकदा मंत्रालयात पाठपुरावा झाला, मात्र फक्त आश्वासने मिळत असून प्रत्यक्ष निर्णय होत नाही, असा आरोप केळकर यांनी केला. या पार्श्वभूमीवर १७ नोव्हेंबर सकाळी ११ वाजता पुण्यातील शनिवार वाडा येथे ‘महामोर्चा’ आयोजित केला आहे. राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा मोर्चा शांततापूर्ण असणार असून शासनाने कर्मचारीवर्गाच्या न्याय्य मागण्यांवर निर्णय न घेतल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये २४ वर्षांनंतर मिळणाऱ्या लाभांचा विस्तार, राज्य शासनमान्यता, पदोन्नतीची सुसंगतता, वेतनश्रेणी सुधारणा, प्रयोगशाळा व ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, निवृत्तीवेतन मुद्दे यांसह एकूण १२ मुख्य मागण्यांचा समावेश आहे. Non-teaching organizations’ march
