एस.टी. वहातूक बंद; जलवाहिनी फुटल्याने रस्ता नादुरुस्त
गुहागर, ता. 6 : वेळणेश्र्वर साखरीआगर या रस्त्यावर झालेले खडीकरणातील एक भाग अवघ्या एका दिवसातच पूर्णपणे उखडला आहे. जलवाहिनी (Water Distribution Line) फुटून पाणी रस्त्यावर आल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. सध्या वेळणेश्र्वर मार्गे साखरीआगर एस.टी. वहातूक बंद आहे.
वेळणेश्र्वर गावातील पुलाचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले. या पुलाच्या कामामध्येच वेळणेश्र्वर दत्त मंदिर ते अनंत खरे बाग या 500 मिटर अंतरातील रस्ता (Bridge Approach Road) करणे. 15 मिटर सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत बांधणे ही कामे अंतभूत आहेत. त्यासाठी सुमारे 12 लाखाचा निधीही नाबार्ड योजनेतून मंजूर आहे. मात्र कोरोना संकट, टाळेबंदी, पावसाळा, वेळणेश्र्वर ग्रामपंचायतीची निवडणूक यामुळे रस्ता आणि संरक्षक भिंतीचे काम रखडले होते. सदरच्या कामाचा ठेका अनिल चिले, चिपळूण यांनी घेतला आहे. त्यानी हे काम स्थानिक ठेकेदार भाटकर यांना दिले होते. भाटकर यांनी 28 फेब्रुवारीला कामाला सुरवात केली. 2 मार्चला रस्त्याचे खडीकरण आणि त्यावर डांबर टाकून (BBM) झाले. कारपेट (Carpet) आणि सीलकोटचे काम बाकी होते.
मात्र रस्त्याचे काम जवळून वेळणेश्र्वर खारवीवाडी येथे गेलेली जलवाहिनी फुटून त्याचे पाणी रस्त्यावरुन वाहू लागले. त्यातच खडीकरणानंतर सदर रस्त्यावरुन वहातूक सुरु झाली. त्यामुळे खारवीवाडीजवळील तीव्र चढ असलेल्या भागातील संपूर्ण खडी उखडली आहे.
या घटनेमुळे रस्त्याचे कामात डांबर कमी वापरले. निकृष्ट दर्जाचे काम झाले. ठेकेदाराने काम चालू वहातूक बंद असे बोर्ड लावण्याची आवश्यकता होती. अशा चर्चा वेळणेश्र्वर गावात सुरु झाल्या होत्या. मात्र समंजस गावकऱ्यांनी ही चर्चा थांबवली आहे. रस्त्याच्या कामाबाबत कोणताही वाद नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने काय सांगितले हे वाचण्यासाठी तांत्रिक कारणांमुळे खडी उखडली या लाल रंगातील ओळीवर क्लिक करा.