द्रष्ट्या अभ्यासकाचा साक्षात्कार म्हणजे अमृतानुभव-डॉ. चंद्रशेखर भगत
रत्नागिरी, ता. 14 : नारायण पाटणकर यांनी २७ वर्षांत सुमारे चार हजार पानांचे अध्यात्मिक लिखाण केले. ते स्वतः लेखक, प्रतिभावंत कवी, द्रष्टे अभ्यासक आहेत. अद्वैत तत्त्वज्ञान, जीव, ब्रह्म, भारतीय तत्त्वज्ञान, जे. कृष्णमूर्ती यांचे विचार व आधुनिक विज्ञानाचा सखोल अभ्यास आहे. त्यांच्या ग्रंथातून जीवनाचे सार आपल्याला पाहायला मिळते, असे प्रतिपादन संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. चंद्रशेखर भगत यांनी केले. Narayan Patankar’s book publication
नारायण पाटणकर यांच्या अमृतानुभव या पुस्तकाचे प्रकाशन सिद्धिविनायक मंगल कार्यालयात रविवारी दिमाखात झाले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना डॉ. भगत म्हणाले, पाटणकर हे अध्यात्मिक अधिकारी आहेत. जीव ब्रह्म ऐक्याचा विषय त्यांनी सामान्य लोकांना साध्या पद्धतीने समजावला आहे. त्यांच्या ध्यानातून झालेल्या साक्षात्काराचे दर्शन यात घडते. तसेच त्यांनी या ग्रंथात अद्वैत परमार्थाचे ज्ञान जसेच्या तसे मांडल्याने त्याचा वाचकावर खोलवर रुजणार आहे. या ग्रंथात दहा प्रकरणे असून गुरु शक्ती समावेशाने सुरू होणारा गुरु प्रशंसा करत वाचा ऋण फेडत ज्ञान, विवेकाची मांडणी करत त्रिपद विवेचन मांडून शब्द, ज्ञान, खंडन करून माणसाला जीवमुक्त अवस्था सहज कशी प्राप्त होईल, याचे सहज सोप्या काव्यात निरूपण केले आहे. Narayan Patankar’s book publication

यावेळी ज्ञानेश्वरीचे अभ्यासक सुनील देशपांडे, अध्यात्मिक अभ्यासक डॉ. मिलिंद पटवर्धन, संत साहित्याचे अभ्यासक धनेश जुकर, भगवद्गीता प्रचारक केतन केळकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे तसेच ज्येष्ठ पत्रकार, पाटणकर यांचे स्नेही शिरीष दामले मंचावर उपस्थित होते. त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि संत ज्ञानेश्वरांची मूर्ती देऊन पुणे येथील उद्योजक व कार्यक्रमाचे आयोजक अशोक अत्रे यांनी केला. Narayan Patankar’s book publication
साक्षात्कारातून लिखाण- नारायण पाटणकर
नारायण पाटणकर यांचे अध्यात्मविषयक हे पंधरावे पुस्तक आहे. याविषयी ते म्हणाले, आपण अज्ञानी आहोत हे बऱ्याचदा कळत नाही. अमृतानुभव हे संत ज्ञानेश्वरांचे आहे. जसं भावलं तसं दिलं आहे. सद्गुरु ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रथित केलेल्या अमृतानुभवाची ही एक प्रकारे सध्या प्रचलित असलेल्या मराठीतील फेरमांडणी आहे. हे सर्व लिखाण साक्षात्कारातून केले. Narayan Patankar’s book publication
पुण्याच्या स्नेहल प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. याबाबत प्रकाशक रवींद्र घाटपांडे यांनी सांगितले की, पाटणकर यांची ९ पुस्तके प्रकाशित केली आहेत. यापुढेही त्यांनी असेच लिखाण करत राहावे, प्रकाशन करू. याप्रसंगी नारायण पाटणकर आणि सौ. नीता पाटणकर यांचा विशेष सन्मान श्री. अत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार शिरीष दामले यांनी पाटणकर दांपत्याचे कौतुक करून गेली ४० वर्षे त्यांच्या मैत्रीबद्दल आणि मायेची चादर पांघरल्याचे सांगितले. Narayan Patankar’s book publication

अध्यात्माकडे वळले पाहिजे- केतन केळकर
श्री. केळकर म्हणाले की, संभाजीनगर येथून आम्ही ६ जण आलो आहोत. मी वयाच्या ५० व्या वर्षापासून तरुणांना भगवद्गीता शिकवत आहे. करिअर व फिटनेसवर जसा तरुण पिढी भर देते, त्याप्रमाणे अध्यात्माकडेही वळले पाहिजे. ते पाटणकर पद्यातही विचार करतात. ते निर्मळ आहेत, त्यांच्यासोबत संवादात राहून आम्हीसुद्धा निर्मळ होत आहोत. आमचेही साधकत्व समर्थ व्हावे. Narayan Patankar’s book publication
अनुभवाशिवाय लेखन नाही- जुकर
मुंबईतील धनेश जुकर म्हणाले की, पाटणकर यांचे संत कबीरावरील पुस्तक वाचून मी संपर्क साधला. पहिली भेटच सहा तास चालली. ते जशी शब्दांची साधी फोड करतात, त्यातून गंमत वाटली आणि आमचा संवाद वाढला. ते अनुभवाशिवाय लिहीत नाहीत. त्यांचे वाचन करताना आपले सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवले पाहिजे, तरच आपण अध्यात्म समजून घेऊ शकतो. Narayan Patankar’s book publication
जे. कृष्णमूर्तींप्रमाणे प्रभावित झालो- वाघमारे
नाशिक येथील अरुण वाघमारे यांनी सांगितले की, जे. कृष्णमूर्ती यांच्याप्रमाणेच पाटणकर यांचे विचार प्रभावित करून गेले. त्यांचे पुस्तक वाचून मी फोन केला. पहाटे त्यांना जे दिसतं, साक्षात्कार होतो, त्यावर ते सकाळी सकाळी लिहितात आणि मला अनेकदा फोन करतात. अनेक पद्य मी ध्वनिमुद्रित केली असून ती आता यू ट्यूबवरदेखील उपलब्ध करून दिली आहेत. Narayan Patankar’s book publication

अमृतानुभव म्हणजे आनंदाचा ठेवा- डॉ. सुनील देशपांडे
वाई येथून आलेले डॉ. सुनील देशपांडे म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे आनंदाचा ठेवा आहे. अमृतानुभव घेण्यासाठी जरूर सर्वांना हे पुस्तक आवर्जून वाचावे, मी तर याची पारायणेच करणार आहेत. त्याशिवाय अर्थ समजणार नाही. Narayan Patankar’s book publication
सूत्रसंचालक निबंध कानिटकर यांनी श्रोत्यांची वाहवा मिळाली. कार्यक्रमाचे सूत्र पकडून त्यांनी समर्पक मल्लिनाथी केली. सीमा हर्डीकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सौ. कांचन चांदोरकर यांनी योगदान दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. Narayan Patankar’s book publication