लोकार्पण सोहळा संपन्न : गुहागरच्या पत्रकारांची मागणी पूर्ण
गुहागर, ता. 01 : निसर्ग वादळासंदर्भातील आढावा सभेला आलो असता येथील पत्रकारांनी गुहागरमध्ये रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. आज त्यांची मागणी पूर्ण केली आहे. आमदार निधीतून सुमारे 15.50 लाख रुपये खर्च करुन आणलेली ही रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयाकडे सुपूर्त करत आहे. असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर पंचायत समितीमध्ये केले.
गुहागर पंचायत समितीच्या प्रागंणात आज रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर बोलताना आमदार जाधव म्हणाले की, पत्रकारांनी सूचना केल्यानंतर रुग्णवाहिकेचा पाठपुरावा केला. परंतु शासनाकडे तुटवडा असल्याने आमदार निधीतून रुग्णवाहिकेचा प्रस्ताव तयार केला. आज ही रुग्णवाहिका गुहागरकरांच्या सेवेसाठी ग्रामीण रुग्णालयाकडे सुपूर्त केली आहे. याची कुठेही चर्चा मी केली नाही. माझं कामच बोलले अशी भुमिका घेवून कोरोना संकटात अनेक कामे केली आहेत. प्रांताधिकाऱ्याकडे पाठपुरावा करुन कामथे रुग्णालयात 112 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. यासाठी खासगी संस्थांनी मदत केली. आज तेथे 67 ऑक्सिजनची व्यवस्था, 9 व्हेंटिलेटर, 2 हायस्पीड व्हेंटिलेटर आदी सुविधा उभ्या केल्या आहेत. येथे खासगी रुग्णालयांपेक्षा चांगले उपचार होत आहेत. आजपर्यत 1368 रुग्ण दाखल झाले त्यातील केवळ 41 रुग्ण दगावले आहेत. त्यातील 35 रुग्ण आयत्यावेळी दाखल झाले. याचा विचार केला तर कामथे रुग्णालयातील मृत्युदर १ टक्के पेक्षा कमी आहे. आजही तेथे काही अडचणी आहेत त्या सोडविण्याचा प्रयत्न आजही सुरु आहे. मध्यंतरी गुहागर शहरातील तरुण कार्यकर्ता रवी बागकर आणि पागडे यांचे चिपळूणातील रुग्णालयात निधन झाले. तरुणांचा मृत्यु होऊ लागल्याने मनातून अस्वस्थ झालो. म्हणून खासगी रुग्णालयांसोबत बैठक बोलावली. त्यावरुन मी मॅनेज असल्याच्या बातम्या पसरविल्या गेल्या. इतकाही मी स्वस्त नाहीए. या रुग्णालयातील अनेक गोष्टी मला समजल्या आहेत. लोकांच्या जीवाशी कोणी खेळत असेल तर कीतीही आरोप झाले तरी मी बधणार नाही. वेळणेश्र्वर कोविड सेंटरमधील कचऱ्यांच्या बातम्या आल्यावर माहिती घ्यायला सुरवात केली. त्यात असं कळलयं की, डी.एम. एंटरप्रायझेस नावाच्या कंपनीने संपूर्ण महाराष्ट्रातील कोविड सेंटरचा कचरा उचलण्याचा ठेका घेतलाय. त्याबद्दल प्रति सफाई कामगार रु. 17 हजार महाराष्ट्र शासन त्याला देतयं. पण हा ठेकेदार येथील सफाई कर्मचाऱ्यांना 3 ते 4 हजार रुपयात राबवून घेतोय. आता त्याचीही पाठ सोडणार नाहीए. अशी अनेक कामे मी करत आहे. कोरोना अजुनही संपला नाहीए. आपण सर्वांनी काळजी घ्यावी. आज देत असलेल्या रुग्णवाहिकेचा कोणालाच उपयोग होवू नये अशी आशा करतो. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेश नाटेकर, पं.स. सभापती सौ. विभावरी मुळे, उपसभापती सुनील पवार, जि.प. विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, जि.प. सदस्य प्रविण ओक, सौ. नेत्रा ठाकुर, पंचायत समिती सदस्या पुनम पाष्टे, निमुणकर, रविंद्र आंबेकर, प्रांताधिकारी प्रविण पवार, गटविकास अधिकारी अमोल भोसले, मुख्याधिकारी कविता बोरकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, शहर प्रमुख नीलेश मोरे आदी लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.