मराठी रंगभुमी दिनी युवा कलाकारांनी सादर केले नाटक
गुहागर, ता. 08 : गुहागर वरचापाट येथील विठ्ठलराव पटवर्धन रंगमचांवर मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. शहरातील नाट्यकलाकरांनी रंगभूमी आणि नटेश्र्वराचे पूजन केले. तर युवा कलाकारांनी आमदार सौभाग्यवती ही नाट्यकलाकृती सादर करुन मराठी रंगभुमीला अभिवादन केले. Marathi Theatre Day
मराठी रंगभूमी दिन इतिहास
5 नोव्हेंबर 1843 रोजी सांगली येथे विष्णूदास भावे यांनी पहिल्या मराठी संगीत नाटकाचा सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग सादर केला. हे मराठी रंगभूमीवरील पहिले नाटक मानले जाते. विष्णूदास भावे यांनी मराठी नाट्यसृष्टीचा पाया रचला म्हणून सांगलीतील नाट्यगृहाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. 1943 मध्ये या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून 5 नोव्हेंबरला सांगलीमध्ये नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या नाट्य संमेलनापासून 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभुमी दिन साजरा करण्यात येऊ लागला. हा दिवस रंगभूमीचे पूजन करुन, नाट्यकलाकारांचा गौरव करुन महाराष्ट्रात साजरा केला जातो. Marathi Theatre Day

प्रसिध्द हार्मोनियम वादक आणि बाल गंधर्व, कुमार गंधर्व यांच्या सह अनेक दिग्गज कलाकारांना संगीत नाटकात साथ करणारे पं. गोविंदराव पटवर्धन हे गुहागरचे. त्यांनी गुहागर वरचापाट येथील कोपरी नारायण मंदिराशेजारी वडिल विठ्ठलराव पटवर्धन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रंगमंच बांधला आहे. दरवर्षी या रंगमंचाचे पूजन करुन गुहागरमधील कलाकार मराठी रंगभूमी दिन साजरा करतात. यावर्षीही 5 नोव्हेंबरला मराठी रंगभुमी दिन विठ्ठलराव पटवर्धन रंगमंचावर साजरा करण्यात आला. रंगमंचाचे पूजनानंतर नाट्य कलाकारांनी नटेश्वराचे पूजन केले. नटेश्वराला रंगभुषेसाठी वापरण्यात येणाऱ्या रंग वाहण्यात आला. नांदी म्हणून रंगमंचाची आरती करण्यात आली. त्यानंतर गुहागर वरचापाट येथील हौशी युवा कलाकारांनी आमदार सौभाग्यवती या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण याच रंगमंचावर केले. Marathi Theatre Day

यावेळी राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचे पारितोषिक पटकावणारे डॉ. मंदार आठवले, विविध नाटकांचे दिग्दर्शन करणारे, रंगभुषा करणारे विवेकानंद जोशी गुरूजी, नाट्य कलाकार व तबला वादक प्रकाश तांबे, आमदार सौभाग्यवती हौशी कलाकारांच्या नाटकाचे दिग्दर्शन करणारे नितीन दिक्षीत, कोपरी नारायण देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर, सेक्रेटरी मनिष खरे, आदी उपस्थित होते. Marathi Theatre Day

