मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धोपावे शाळा क्र. १ येथे उद्घाटन
गुहागर, ता. 14 : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत धोपावे-तेटले यांच्या वतीने धोपावे शाळा क्र. १ येथे नव्या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री. गमरे सर यांनी श्रीफळ वाढवून केले, तर वाचनालयाचे औपचारिक उद्घाटन मा. माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. अनंत सिताराम डावळ यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. Library inaugurated at Dhopave School

या वाचनालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वाचन सामग्री उपलब्ध होऊन ज्ञानवृद्धीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्री. आशिर्वाद दयानंद पावसकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना वाचनालयाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावून ज्ञानवृद्धीसाठी वाचनालयाचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले.

ग्रामपंचायत अधिकारी सौ. अवनी अर्चिस तवसाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Library inaugurated at Dhopave School
