गुहागर, ता. 09 : गुहागर मधील अनुलोम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिवाळीच्या आनंद समाजात वाटुया अशा उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत ज्यांच्या घरात वेगवेगळ्या अडचणींमुळे दिवाळी साजरी होऊ शकत नाही. अशा कुटुंबांना दिवाळीच्या फराळ आणि अशा कुटुंबातील मुलांना फटाके भेट देण्याचे ठरविले आहे. दि. 7 ऑक्टोबरला याचे आवाहन केल्यानंतर आजपर्यंत 21 जनांकडून (ता.9 ऑक्टो.) 14 हजार 29 रुपये जमा झाले. या उपक्रमांत पूर्णपणे पारदर्शकता रहावी म्हणून अनुलोमच्या कार्यकर्त्यांनी व्हॉटसॲप ग्रुप बनविला आहे. देणगीदारांनी आपली देणगी जी पे द्वारे 9423048230 या व्हॉटसॲप क्रमांकावर पाठविल्यावर त्याचा स्क्रीनशॉट ग्रुपवर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कुटुंबांची निवड कशी केली
या उपक्रमाअंतर्गत अनुलोम मित्रांनी गावातील प्रभावी व्यक्ती (गावप्रमुख, वाडीप्रमुख, सरपंच आदी) यांच्याबरोबर चर्चा करुन काही कुटुंबांना भेटून नावे निश्चित केली आहेत. नावांच्या निश्चितीसाठी कुटुंबांची निवड कशी केली याची दोन उदाहरणे समोर ठेवत आहे.
उदाहरण
1. माझ्या प्रवासामध्ये मला एक कुटुंब भेटलं, ज्याच्यामध्ये वडील, आठवीतील मुलगी, आणि दुसरीतील मुलगा आहे. मुलं लहान असल्यामुळे वडिलांना कामाला जाता येत नाही. शासनाकडून धान्य मोफत मिळत असल्याने जेवणाची अडचण नाही. मात्र मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि अन्य सणवारांच्या वेळेला होणाऱ्या खर्च करताना वडिलांची ओढाताण होते. मग हे कुटुंब फराळ कसा करणार, मुलांना फटाके फोडण्याचा आनंद कसा मिळणार.
2. एक कुटुंब बघितलं त्यामध्ये आई मतिमंद आहे घरच्या जेवणाव्यतिरिक्त ती काहीच करू शकत नाही. घरात अन्य महिला नाही. वडील काम करून आवश्यक खर्च भागवतात. पण सणवाराला घरात गोडधोड होत नाही.
3. आजही गावागावात अशी काही वृद्ध कुटुंब आहेत ज्यांची मुले नोकरी व्यवसायासाठी बाहेरगावी रहातात पैसे कमावतात पण आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात. असे वृद्ध आईवडील आनंदाच्या सणातही दुःखी कष्टी असतात. त्यांच्या घरात दिवाळी साजरी होत नाही.
अशी नावे शोधण्याचे काम गेले 20 दिवस अनुलोम मित्र करत होते. अनुलोम मित्रांच्या साह्याने नोंद झालेल्या 329 कुटुंबात आपण दिवाळीचा आनंद वाटणार आहोत. या कुटुंबांना आपण फराळामध्ये चिवडा, चकली, शंकरपाळे आणि बेसन लाडू, करंजी तसेच उटण्याचे पाकीट आणि प्रत्येक मुलांला दोन फुलबाजीच्या पेट्या, एक चक्राची पेटी, एक पाऊस व छोटे सुटे फटाके भेट देणार आहोत. फराळाचा खर्च साधारणपणे 400 रुपये आणि फटाक्याचा खर्च साधारणपणे 100 रुपये असा आहे.
आवाहन
गुहागर अनुलोमच्या या उपक्रमात आपण स्वेच्छेने सहभागी व्हावे. ज्यांच्या घरात दिवाळी साजरी होत नाही अशा घरांमध्ये आपण दिवाळीचा आनंद वाटू या. त्यासाठी यथाशक्ती आर्थिक मदत आपण सर्वांनी आम्हाला करावी. फराळ वाटपाच्या दिवशी आपणही एका गावात आमच्यासोबत या उपक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन आहे.
पारदर्शकता
संपूर्ण उपक्रमात पारदर्शकता असावी म्हणून आपण मर्यादित कालावधीसाठी व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. देणगीदारांनी आपली देणगी 9423048230 या गुगल पे क्रमांकावर पाठवल्यावर त्याचा स्क्रीनशॉट सदर व्हॉटसअपॅ ग्रुपवर पाठवावा. तसेच आपले पूर्ण नांव, व्हाट्सअप क्रमांक आणि आपला फोटो देखील पाठवावा. म्हणजे सर्वांसमक्ष त्यांची नोंद राहील. शिवाय या उपक्रमातील वेगवेगळ्या टप्प्यांची माहिती ही फोटोसह त्या ग्रुपवर टाकली जाईल. देणगीदारांनी फराळ वितरणाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. सहभागी होऊ इच्छीणाऱ्यांनी तसे ग्रुपवर कळवले तर नियोजन करता येईल.
अनुलोम ही सामाजिक काम करणारी संस्था आणि या संस्थेचे कार्यकर्ते हे केवळ निमित्तमात्र आहेत. दिवाळीत आपण खरेदी करतो, फराळ खातो, फटाके फोडतो. हाच आनंद आपल्या आसपासच्या कुटुंबातही साजरा व्हावा यासाठी हा उपक्रम आम्ही समाजासमोर ठेवला आहे. आपणही तनमनधनपूर्वक यात सहभागी व्हावे. हा उपक्रम अनुलोमचा न रहाता समाजाचा व्हावा एवढीच अपेक्षा अनुलोमच्या कार्यकर्त्यांची आहे.
Whatsapp group link to Join – https://chat.whatsapp.com/EFNctmW1H7Y1psj8g5L2yf?mode=ems_copy_h_t
आपला नम्र
मयुरेश पाटणकर
अनुलोम भाग जनसेवक गुहागर
9423048230 / 7888048230