गुहागर, ता. 16 : तालुका विधी सेवा समिती गुहागर यांच्या वतीने ग्रामपंचायत धोपावे येथे महिलांचे अधिकार व त्यांच्या सुरक्षेबाबतचे कायदे तसेच लोकअदालत या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. पी. व्ही. कपाडिया साहेब, तालुका विधी सेवा समिती गुहागर तसेच दिवाणी न्यायाधीश साॊ व न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांनी उपस्थित होते. Legal guidance at Dhopave

यावेळी महिलांचे अधिकार, त्यांच्या संरक्षणासंबंधी असलेले विविध कायदे व त्यांचा वापर याबाबत सविस्तर माहिती दिली. महिलांनी आपल्या हक्कांबाबत सजग राहणे आणि कायदेशीर संरक्षणाच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला. त्याचप्रमाणे ॲड. सुशिल अवेरे यांनी “राष्ट्रीय लोकअदालत” या विषयावर मार्गदर्शन करताना लोकअदालतीचे कार्य, त्यातील प्रक्रिया, तसेच जनसामान्यांना मिळणारे त्वरित आणि मोफत न्याय याबाबत सविस्तर माहिती दिली. Legal guidance at Dhopave

या शिबिराकरीता ॲड. सौ. प्रितम कपाडिया, ग्रामपंचायत धोपावेचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, उद्योजक राजनशेठ दळी, तसेच धोपावे गावातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमामुळे गावातील महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण झाली असून, समाजात महिलांच्या हक्कांविषयी सजगता वाढीस लागली आहे. शिबिराचे आयोजन अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. Legal guidance at Dhopave