विद्यार्थ्यांनी 340 ग्रामस्थांना केले जागृत, रत्नागिरी जिल्हा राज्यात 16 वा
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : कळतनकळत निष्काळजीपणे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्या ग्रामस्थांना त्यांची चूक दुरुस्त करायला लावण्याचे काम सध्या विद्यार्थी करत आहेत. पहिल्या टप्प्यातील सर्वोत्कृष्ट मॉनिटरींग करणाऱ्या शाळांची नावे नुकतीच राज्याच्या शिक्षण विभागाने जाहीर केली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हयाचा राज्यात 16 वा क्रमांक आला. तर गुहागर तालुक्यातील कुडली नं. 4 या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. Kudali school cleanliness monitor activities
केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाला जोड म्हणून राज्याच्या शिक्षण विभागाने लेटस् चेंज असा उपक्रम यावर्षी सुरु केला. या उपक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांकडे मॉनिटरगीरी करण्याचे काम देण्यात आले. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्ती कचरा फेकत असल्याचे निदर्शनास आले तर विद्यार्थ्यांनी लगेच त्याला हटकायचे. कचरा न टाकण्याची सूचना द्यायची. टाकलेला कचरा उचलण्याची विनंती करायची. जेणेकरुन समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये कचरा न टाकण्याचा बदल घडला पाहीजे. असे काम केलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत येवून आपल्या शिक्षकांना अनुभव कथन करायचे. शिक्षकांनी या अनुभव कथनाचे व्हिडिओ लेटस् चेंजच्या वेबसाईटवर अपलोड करायचे. महाराष्ट्रातून आलेल्या सर्व व्हिडिओंमधील सर्वाधिक पाहिले गेलेले व्हिडिओ आणि व्हिडिओमधील चांगला कंटेन्ट याचे परिक्षण केले जात होते. स्वच्छता मॉनिटर उपक्रमाचा हा पहिला टप्पा 2 ऑक्टोबरला संपला. त्यानंतर राज्यात स्वच्छता मॉनिटर उपक्रम प्रभावीपणे राबविलेल्या जिल्ह्यांचा आणि शाळांचा निकाल राज्य शिक्षण विभागाने जाहीर केला. Kudali school cleanliness monitor activities
या उपक्रमात राज्यातील 64 हजार 198 शाळांमधील 59 लाख 31 हजार 410 विद्यार्थी सहभागी होते. वेबसाईटवर 1 कोटी 50 लाखांहून अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते. या सर्व व्हिडिओंचे परिक्षण केल्यानंतर राज्य विभागाने जाहीर केलेल्या निकालात रत्नागिरी जिल्ह्याचा 16 क्रमांक आला. तर रत्नागिरी जिल्ह्यांतर्गत गुहागर तालुक्यातील कुडली नं. 4 या जिल्हा परिषद शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. Kudali school cleanliness monitor activities
कुडली नं. 4 शाळेतील अर्पण भरत जाधव, श्रावस्ती जितेंद्र जाधव, प्रणव अविनाश जाधव, आरोही प्रबोध जाधव, अस्मि प्रबोध जाधव, सार्थक जितेंद्र जाधव, सिद्धांत अविनाश जाधव, आर्यन महेंद्र जाधव, आदिती राजेंद्र जाधव, अवनी अनिल जाधव या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मॉनिटर म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. त्याच्यापैकी तीन विद्यार्थी आणि एक उपशिक्षक यांची निवड मुंबई येथील गौरव सोहळ्यासाठी होणार आहे. Kudali school cleanliness monitor activities
स्वच्छता मॉनिटरचे काम विद्यार्थ्यांना समजून सांगणे, त्यांच्या अनुभव कथनाचे व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड करणे ही कामे कुडली नं. 4 शाळेतील उपशिक्षक अजित पाटील व विराज सुर्वे यांनी केले. कुडली शाळेच्या या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, गुहागरच्या गटशिक्षणाधिकारी सौ. लीना भागवत, विस्तार अधिकारी गळवे साहेब, केंद्रप्रमुख नामदेव लोहकरे, केंद्रप्रमुख सुहास गायकवाड, शाळा व्य. समिती, पालक, ग्रामस्थ यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.Kudali school cleanliness monitor activities