आमदार शेखर निकमांचे प्रयत्न; शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक
गुहागर, ता. 3 : कोकणातील आंबा, काजू, फणस आदी बागायदारांच्या समस्या सोडविण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री, खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये कोकणातील बागायदारांच्या अडीअडचणी शरद पवार समजून घेणार आहेत. चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांतून ही बैठक होत आहे.
आमदार शेखर निकम यांनी आज (ता. 3 मार्च, बुधवार) सकाळी मुंबई येथे माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार निकम यांनी कोकणातील आंबा, काजू, फणस आदी बागायतदारांचे प्रश्न मांडले. निसर्ग वादळानंतरची बागांची स्थिती, अवकाळी पावसाने झालेले नुकसान यामुळे कोकणातील बागायदार अडचणीत आहे. याशिवाय कोकणातील कृषी उत्पन्नाचे मुल्यवर्धन, त्यासाठी फळप्रक्रिया उद्योगांची निर्मिती असे विविध विषय या चर्चेत समोर आले. समस्यांमधुन मार्ग काढून कृषी आधारीत विकास करायचा असेल तर आपण सर्वच बागायतदारांसोबत चर्चा करु. असा प्रस्ताव थेट माजी केंद्रीय मंत्री, खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार शेखर निकम यांच्यासमोर ठेवला. शरद पवारांसारखा अनुभवी नेत्याने कोकणातील बागायतदारांसाठी वेळ दिली आहे. हीच एक मोठी संधी आहे. हे लक्षात घेवून आमदार शेखर निकम यांनी तत्काळ या बैठकीला होकार दिला. लगेचच तारीख, वेळ, स्थान यांची निश्चिती करण्यात आली. त्याप्रमाणे मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शुक्रवारी दि. ५ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये कोकणातील आंबा, काजू, फणस आदी बागायतदारांच्या अडीअडचणी स्वत: शरद पवार समजून घेणार आहेत. काही समस्या या बैठकीतच सुटू शकतात. त्यामुळे कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनाही या बैठकीत बोलावण्यात आले आहे. या बैठकीला आमदार शेखर निकम व कोकणातील बागायतदार उपस्थित राहणार आहेत. आमदार शेखर निकम यांच्यामुळेच कोकणातील प्रश्र्न शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्यासमोर मांडण्याची संधी बागायदारांना मिळणार आहे. याबद्दल बागायतदारांनी बैठकीपूर्वीच निकमसरांचे आभार मानले आहेत.