रत्नागिरी, ता. 17 : समाजप्रबोधनाचा वसा जोपासत गेली चौदा वर्षे रत्नागिरीत आयोजित केल्या जात असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात येत्या जानेवारीमध्ये महाभारत या विषयावरील आणखी काही पैलू राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे उलगडून दाखवणार आहेत. यंदाचे या कीर्तन महोत्सवाचे पंधरावे वर्ष आहे. Kirtankar will reveal aspects of Mahabharata
यावर्षी ६ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव रत्नागिरीच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडासंकुल होणार आहे. नीटनेटके आयोजन, प्रशस्त बैठक व्यवस्था असणारा कीर्तनसंध्या महोत्सव असून महोत्सवात नेहमीप्रमाणेच सर्व व्यवस्था असणार आहे. कीर्तन महोत्सवाचे मुख्य प्रायोजकत्व पितांबरी उद्योग समूहाने स्वीकारले आहे. Kirtankar will reveal aspects of Mahabharata

कीर्तनसंध्या परिवारातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. त्यानुसार सन २०१२ पासून गेली चौदा वर्षे कीर्तनसंध्या महोत्सवात भारताचा देदीप्यमान इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. रामायणानंतर महाभारत या प्राचीन भारत आणि जगातील सर्वांत मोठ्या महाकाव्यातील काही भाग गेल्या वर्षीच्या महोत्सवात सादर करण्यात आला होता. महाभारत ग्रंथ भारताच्या धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट आहे. हा ग्रंथ ग्रीक महाकाव्ये इलियड व ओडिसी यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ इसवी सनपूर्व २००० इतका मागे जाऊ शकतो. महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताच्या कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या भारतवर्षाचा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. मात्र ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताना कोणती तत्त्वे अंगीकारावी, महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते. या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष गुणविशेष दर्शवले आहेत. या साऱ्या इतिहासाचा सुरुवातीचा काही भाग आफळे बुवांनी गेल्या वर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवात समजावून सांगितला होता. Kirtankar will reveal aspects of Mahabharata
कार्यक्रमाच्या कालावधीत प्रवचनकार धनंजय चितळे यांची १८ लेखांची “ओळख महाभारताची” ही संक्षिप्त लेखमाला सोशल मीडियावरून प्रसिद्ध केली जाणार आहे. भीम आणि मारुती, अजगराच्या विळख्यात भीम, जयद्रथ आणि युधिष्ठिर, विदुरनीती, भीष्म पितामहांकडून युधिष्ठराला राजधर्माचा उपदेश, महाभारत ग्रंथातील राजकारण, तेजस्वी द्रौपदी, सत्यप्रिय गांधारी, महारथी अर्जुन, देवव्रत भीष्म, भगवान श्री परशुराम, महती महाभारताची, महाभारत आणि आपली कर्तव्ये, महाभारतातील काही सुभाषिते, महाभारतातील भाषा आणि विचार सौंदर्य असे या लेखमालेचे विषय असतील. या लेखमालेचा आणि कीर्तनसंध्या महोत्सवाचा कीर्तनप्रेमींनी नेहमीच्याच उत्साहात आस्वाद घ्यावा, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवारातर्फे करण्यात आले आहे. Kirtankar will reveal aspects of Mahabharata
यावर्षी महोत्सवाच्या देणगी सन्मानिका कार्यक्रमाच्या ठिकाणीच म्हणजेच प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे उपलब्ध होणार आहेत. कीर्तनसंध्या महोत्सवाच्या वातावरणनिर्मितीसाठी येत्या २० आणि २१ डिसेंबर रोजी प्रख्यात प्रवचनकार धनंजय चितळे यांची “विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत” ही दोन दिवसीय व्याख्यानमाला होणार आहे. Kirtankar will reveal aspects of Mahabharata
