गुहागर : गुहागरच्या कार्यतत्पर आणि संवेदनशील अधिकारी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना नुकताच सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या येथील जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे तहसील कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. Jeevshree Congratulate Mrs. Warale यावेळी जीवनश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे, सचिव निलेश गोयथळे, उपाध्यक्ष विजय सावंत, संचालक नितीन बेंडल, सिद्धीविनायक जाधव, सुधाकर कांबळे, माधव ओक, डॉ. मयुरेश बेंडल, संचालिका स्नेहा वरंडे आदी उपस्थित होते.


राजापूर तहसीलदारपदी चार वर्षे कार्यरत असणाऱ्या तहसीलदार सौ. वराळे (Tahsildar Pratibha Varale) या सध्या गुहागर तहसीलदार पदी काम करत आहेत. राजापूर तालुक्यात त्यांनी तहसीलदार म्हणून काम करताना आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला. तर कायमच सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत त्यांच्या कामाचा झटपट निपटारा करण्यावर त्यांनी भर दिला. समाजातील विविध घटकांशी त्यांनी अत्यंत चांगले संबध ठेवताना प्रशासकिय कारभार लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. कोरोना व नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांनी अतिशय कौतुकास्पद काम केले. राजापूर तालुक्याने तहसीलदार सौ. वराळे यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.


ऑगस्ट 2021 मध्ये सौ. प्रतिभा वराळे (Tahsildar Pratibha Varale) यांची गुहागरच्या तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. राजापूरमध्ये केलेल्या कामाप्रमाणेच सौ. प्रतिभा वराळे यांनी गुहागरमध्ये कामकाजाला सुरवात केली. सामान्य जनतेपर्यंत पोचून संवाद सुरु केला. समाजात काम करणाऱ्या विविध कार्यकर्ते, संस्था यांचा परिचय करुन घेतला. विविध संस्थामार्फत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये त्या सहभागी होवू लागल्या. त्यामुळे गुहागर तालुक्यातील अनेक संस्था, व्यक्ती यांनी सौ. प्रतिभा वराळे यांना मिळालेला पुरस्कार योग्य असल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन केले. संतोष वरंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवनश्री प्रतिष्ठानतर्फे सौ. प्रतिभा वराळे यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले. Jeevshree Congratulate Mrs. Warale