बळीवंश फाऊंडेशन गुहागरचा स्तुत्य उपक्रम
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती, मार्गदर्शन व दर्जेदार अभ्यास सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ‘क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले स्पर्धा परीक्षा वाचनालय’ शृंगारतळी येथे सुरू करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन समाजसेवक श्री. संतोषजी जैतापकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. Jaitapkar gave space to Shringartali Library

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून श्री. शेखर शं. भिलारे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती गुहागर) उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या योग्य दिशादर्शनाची आणि अभ्यासिकेच्या सुविधांची गरज अधोरेखित केली. “गावागावातील विद्यार्थीही आज विविध स्पर्धा परीक्षांत उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, फक्त त्यांना योग्य संधी, साधनसंपदा आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले. Jaitapkar gave space to Shringartali Library

यावेळी संतोष जैतापकर म्हणाले, “कोकणातील प्रत्येक घरातून सरकारी अधिकारी घडावेत, हे माझे स्वप्न आहे. त्यासाठी लागणारी मदत मी नेहमी करेन. वाचनालयासाठी तीन वर्षे विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली आहे.” उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वाचनालयातील पुस्तकसंपदा, वाचन व्यवस्था, तसेच विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या सराव चाचण्यांच्या सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतला आणि बळीवंश फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. यावेळी कार्यक्रमास संतोष जैतापकर, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, संस्थेचे अध्यक्ष संतोष सोलकर, पांडुरंग पाते, वैद्य सर, मंगेश गोरीवले सर आदी मान्यवर उपस्थित होते. Jaitapkar gave space to Shringartali Library
