धनंजय चितळे
विदुरनीती भाग २
Guhagar News : मागच्या भागात आपण विदुराने पंडिताची कोणती लक्षणे सांगितली आहेत, ते पाहायला सुरुवात केली आहे. महात्मा विदुर म्हणतात, १) सांगितलेले सत्वर ग्रहण करणे, पक्के समजण्याकरिता स्वस्थपणे ऐकून घेणे , इच्छेची पर्वा न करता विचाराने कोणतीही गोष्ट हाती घेणे आणि जो आपला विषय नाही त्यासंबंधी ज्ञानी लोकांच्या मार्गदर्शनाशिवाय, त्यांना विचारल्याशिवाय शब्द खर्ची न घालणे हे पंडिताचे पहिले लक्षण आहे.
२) प्रथम निश्चय केल्यावरच जो एखादे कार्य हाती घेतो, कार्य हाती घेतल्यानंतर ते पार पाडल्या वाचून जो स्वस्थ बसत नाही, जो आपला वेळ फुकट घालवत नाही आणि ज्याचे मन स्वतःच्या स्वाधीन असते, त्याला पंडित असे म्हणतात.
३) प्राणिमात्राचा स्वभाव जाणणारा, कोणत्याही कर्माचा परिणाम काय होईल हे समजणारा आणि माणसांना आपलेसे करण्याची युक्ती माहीत असणारा जो पुरुष आहे, त्याला पंडित असे म्हणतात.
४) मोठी संपत्ती, विद्या किंवा ऐश्वर्य प्राप्त झाल्यानंतरही जो गर्वरहित वागतो, त्याला पंडित असे म्हणतात.
ज्याला स्वतःची उन्नती करून घ्यायची आहे, त्या माणसाने काही गोष्टींचा त्याग केला पाहिजे आणि काही गोष्टी कायम अंगीकारल्या पाहिजेत, असे विदुर सांगतात. ते म्हणतात, अभ्युदयाची तळमळ लागलेल्या पुरुषाने निद्रा, तंद्रा, भय, क्रोध, आळस आणि चेंगटपणा यांचा त्यागच केला पाहिजे आणि सत्य, दान, उद्यमशीलता, निर्मत्सरता, क्षमा आणि धैर्य यांचा कायम स्वीकार केला पाहिजे. अशी शहाणी माणसे काय करतात, त्याचे एका वाक्यात वर्णन करताना महात्मा विदुर म्हणतात, शहाणे लोक सत्कर्मांच्या ठिकाणी रत असतात. ज्या सत्कर्मांच्या योगाने कल्याण होईल, अशीच करणे ते हाती घेतात आणि कोणाच्याही हिताच्या आड ते येत नाहीत.
अशा चांगल्या लोकांचे वर्णन केल्यानंतर आता याविरुद्ध असणाऱ्या मूढ लोकांचे वर्णन करायलाच पाहिजे. महात्मा विदुरांनी तेही काम केले आहे. ते म्हणतात, जो मित्राचा द्वेष आणि घात करतो, जो आपल्या शत्रूला मित्र मानतो, ज्याला कोणाचाच विश्वास वाटत नाही, जो बोलावल्यावाचून आगंतुकपणे कोणाकडे जातो आणि विचारल्याशिवाय पुष्कळ बोलतो, अविश्वासी पुरुषावर जो विश्वास ठेवतो, तो नराधम मूढबुद्धी आहे. आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना न देता जो एकटाच चांगले पदार्थ भक्षण करतो, उत्तम वस्त्रे परिधान करतो, त्यापेक्षा अधिक मूढ, दुष्ट आणखी कोण असणार? शहाण्या माणसाने अशा व्यक्तींना माझा तुझ्यावर विश्वास नाही, असे बोलू नये, पण काहीतरी सकारण सबब सांगून आपल्यापासून दूर करावे. आपली पात्रता वाढवण्यासाठी माणसाने आठ गुणांकडे लक्ष द्यावे, असे विदुरनीती सांगते. बुद्धी, कुलीनता, विद्या, इंद्रियदमन, पराक्रम, मितभाषण, यथाशक्ती दान आणि कृतज्ञता हे ते आठ गुण आहेत.
आपली संस्कृती सर्वांना बरोबर घेऊन कार्य करा, असे सांगते. विदुरनीतीमध्ये याचे प्रतिबिंब दिसते. विदुरजी म्हणतात, अन्न एकट्याने खाऊ नये. मोठ्या कार्याचा विचार एकट्याने करू नये. एकट्याने प्रवास करू नये आणि इतर सर्व निद्रिस्त असताना एकट्यानेच जागत बसू नये.
वाचकहो, संपूर्ण विदुरनीतीच इतकी अप्रतिम आहे की, खरे तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातून याचे धडे द्यायला हवेत. कीर्तनसंध्या परिवार हे काम निरलसपणाने करत आहे. म्हणून त्यांना द्यावेत तितके धन्यवाद कमीच आहेत.
