धनंजय चितळे
Guhagar News : भारताने जगाला दिलेल्या अलौकिक देणग्यांपैकी एक असणारे महाभारत हे एक महान काव्य आहे. महाभारत ही केवळ कौरव-पांडव संघर्षाची कथा नाही, तर त्या कथेत प्रवासवर्णने आहेत, तीर्थक्षेत्रांच्या माहात्म्याच्या कथा तसेच विविध व्रतांच्या कथाही आहेत. याबरोबरच या ग्रंथात मार्मिक उपदेशांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे मार्गदर्शन कालातीत आहे. या उपदेशांच्या माध्यमातून ज्याला आपल्या आयुष्याचे सार्थक व्हावे असे वाटते, त्याला महाभारत ग्रंथ उत्तम प्रकारे दिशा दाखवू शकतो.
विदुरनीती- भाग १
महाभारतातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे विदुर. या विदुराची जन्मकथा आपण मागच्या वर्षी पाहिली होती. विदुर हा अत्यंत ज्ञानी, प्रजाहितदक्ष मंत्री आहे. त्याने केलेला बोध हा विदुरनीती या नावाने प्रसिद्ध आहे. आजच्या लेखात आपण या विदुरनीतीतील काही मोजके मुद्दे पाहू या. प्रथम जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी महाज्ञानी विदुरांनी काय सल्ला दिला आहे ते सांगतो.
१) दुर्लक्ष, त्वरा, आत्मश्लाघा हे विद्येचे तीन शत्रू आहेत. यातील त्वरा म्हणजे अतिघाई करणे आणि आत्मश्लाघा म्हणजे स्वतःविषयी अनावश्यक विश्वास बाळगणे.
२) आळस, मद, मोह , चांचल्य, जिथे इकडच्या तिकडच्या अवांतर गप्पा चालतात तिथे वेळ काढणे, उद्धटपणा, गर्व आणि लोभ या सात गोष्टी विद्यार्थिवर्गाला दूषित करणाऱ्या आहेत.
३) सुशीलपणा आणि सदाचरण हे अध्ययनाचे फळ आहे.
ज्या माणसाला आपली उन्नती करून घ्यायची आहे, त्याने काय करावे याबद्दल विदुर म्हणतात,
४) उद्योग, इंद्रियनिग्रह, सावधपणा, धैर्य, स्मृती आणि विचारपूर्वक कर्मास आरंभ या गोष्टी प्रगतीला कारणीभूत ठरतात.
खरा ज्ञानी कोण, याबद्दल महात्मा विदुर सांगतात ५) बुद्धीला अनुरूप ज्याचे अध्ययन आहे अध्ययनाला अनुरूप ज्याचे विचार आहेत आणि सज्जनांनी घालून दिलेल्या मर्यादेचे ज्याच्या हातून उल्लंघन होत नाही, तो खरा ज्ञानी होय.
वाचकहो, ही सारी सूत्रे विदुरनीतीत एकापाठोपाठ एक येत नाहीत. विषयानुसार ती संकलित करून आपल्यासमोर ठेवली आहेत. या सूत्रांचे वाचन केले तर आपल्या लक्षात येते की ज्याला ज्ञान मिळवायचे आहे, त्याने कोणते गुण अंगी बाणवले पाहिजेत, कोणत्या अवगुणांचा त्याग केला पाहिजे आणि आपण जे शिकलो त्यातून आपल्याला काय मिळाले पाहिजे, या सर्वच गोष्टी मोजक्या शब्दांत विदुरांनी सांगितल्या आहेत.
संस्कृतमध्ये सूत्र या शब्दाची व्याख्या करताना असे म्हटले आहे की, जे मोजक्या शब्दांत असते, जे वाचताना त्याच्यातील अर्थ स्पष्ट होतो, कोणतेही गोंधळात टाकणारे विचार ज्याच्यात नसतात आणि जे वाचताना अभ्यासकाला आनंद होतो, त्याला सूत्र असे म्हणतात. विदुरनीतीतील सर्व वाक्ये ही या व्याख्येत चपखल बसतात. विदुरनीतीत ज्ञानी लोकांची आणखी काही सुंदर लक्षणे वर्णन केली आहेत. ते म्हणतात क्रोध, हर्ष, गर्व, लज्जा, उद्धटपणा आणि अहंकार हे दोष ज्याला आपल्या कर्तव्यापासून भ्रष्ट करत नाहीत, पुरुषार्थापासून ढळू देत नाहीत त्याला पंडित असे म्हणतात. पंडिताचे आणखी एक लक्षण सांगताना विदुरनीती सांगते, मोठी संपत्ती, विद्या, ऐश्वर्य प्राप्त झाल्यावरही जो निगर्वी राहतो, तो खरा पंडित.
