धनंजय चितळे
Guhagar news : अर्जुनाला विविध प्रकारची अस्त्रे देऊन त्याला सामर्थ्यसंपन्न करून स्वतः देवराज इंद्र भूतलावर सोडण्यासाठी आला. अर्जुनाची सर्व भावंडे आणि द्रौपदी त्याची आतुरतेने वाट पाहत होती. जेव्हा देवराज इंद्राचा रथ जमिनीवरती उतरला, तेव्हा अर्जुनाने प्रथम तेथे असणाऱ्या तपस्वी ऋषीमुनींना साष्टांग नमस्कार घातला. नंतर आपल्या थोरल्या भावांना नमस्कार केला. सर्व बांधवांनी इंद्राला नमस्कार केला. फलाहार देऊन त्याचे स्वागत केले. इंद्र पुन्हा स्वर्गाकडे रवाना झाल्यानंतर या सर्वांमध्ये संवाद सुरू झाला. अर्जुनाने आपल्याला कोणकोणती अस्त्रे मिळाली, आपण निवात, कवच, पौलोम, कालकेय अशा दैत्यांचा कसा वध केला, त्याचे वर्णन केले. त्यानंतर अर्जुनाने मिळालेल्या शस्त्रांचा प्रयोग करून दाखवण्याची तयारी सुरू केली. तेव्हा देवर्षी नारद तेथे आले आणि म्हणाले, “ही अस्त्रे विनाकारण वापरण्याची नाहीत. जेव्हा अत्यंत आवश्यकता असते, तेव्हाच त्याचा उपयोग करावा.”
अर्जुनाने नारदांचे म्हणणे ऐकले. वाचकहो, शस्त्रांचा तारतम्याने वापर करावा, हा धडा या कथेतून मिळतो. नंतर ही सर्व मंडळी विशाखयुप नावाच्या ठिकाणी आली. त्या परिसरातून जात असताना एका अजगराने भीमाला पकडले आणि आपल्या विळख्यात त्याला आवळले. भीमाला आपल्या शक्तीचा खूप गर्व होता, पण त्याचा तो गर्व पूर्णपणे गळून पडला. Introduction to Mahabharata
हा अजगर म्हणजे पूर्वजन्मीचा नहुष राजा होता. आपल्या सामर्थ्याने त्याने इंद्रपद प्राप्त केले होते, पण उच्चपदी गेलेला माणूस जसा चळतो, तसे त्याचे झाले होते. त्याने आपली पालखी वाहण्याचे काम ऋषींकडे सोपवले होते आणि एक ऋषी हळूहळू चालत आहेत, असे लक्षात आल्यावर त्यांना लाथ मारली होती. गर्वाने धुंद झालेल्या या राजाला अगस्ती ऋषींनी शाप दिला आणि त्यामुळे तो अजगर रूपामध्ये आला होता. “ज्यावेळी धर्मराज युधिष्ठिर तुला स्पर्श करेल तेव्हाच तू मुक्त होशील”, असे अगस्तींनी सांगितले होते. बराच वेळ झाला, तरी भीम कुठे दिसेना. म्हणून युधिष्ठिर त्याला शोधत त्या ठिकाणापर्यंत आला. अजगराच्या विळख्यातील भीमाला पाहून युधिष्ठराला खूप वाईट वाटले आणि त्याने अजगराची प्रार्थना केली. त्यावेळी तो अजगर मनुष्यवाणीने बोलू लागला. तो म्हणाला, “माझ्या एका प्रश्नाचे उत्तर तू दिलेस तर मी भीमाला सोडेन.” युधिष्ठिराने प्रश्न विचारायला सांगितले. अजगराने विचारले, “जर एखाद्या शूद्र माणसाकडे सत्यदान इत्यादी सद्गुण असतील, तर त्याच्यात आणि ब्राह्मणात काय फरक आहे?” त्यावर युधिष्ठिराने सांगितले, “ज्या व्यक्तीकडे सत्यदान इत्यादी सद्गुण आहेत, ज्याचे आचार पूर्ण शुद्ध आहेत, तो माणूस ब्राह्मणाइतकाच पवित्र आहे. तो कोणत्याही प्रकारे ब्राह्मणापेक्षा कमी दर्जाचा नाही.” आणि अजगराने त्या उत्तराने प्रसन्न होऊन भीमाच्या अंगावरील आपले विळखे सैल करायला सुरुवात केली. युधिष्ठिराने त्या अजगराला स्पर्श करताच त्या अजगराचे पुन्हा नहुष राजात रूपांतर झाले. Introduction to Mahabharata
वाचकहो, ही कथा सांगण्यामागचे कारण भारतीय संस्कृतीमधील महाभारतकाळात चातुर्वर्ण्य संस्था कशी होती, ते आपणापुढे यावे. भगवान श्रीकृष्णाने श्रीमद् भगवद्गीतेत गुणकर्मानुसार चातुर्वर्ण्य असे जे म्हटले आहे, तेच जणू इथे युधिष्ठराच्या बोलण्यातून व्यक्त झाले आहे. म्हणूनच महाभारतापासून जातिभेद विसरून आम्ही सारे आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मातील भारतीय आहोत. आम्ही एक आहोत, हाच धडा घेऊ या. Introduction to Mahabharata
