महाभारत आणि आपली कर्तव्ये
धनंजय चितळे
Guhagar News : महाभारताने गृहस्थाश्रमाची थोरवी गायली आहे. या ग्रंथाच्या शांती पर्वात गृहस्थाश्रमाचा गौरव केलेला दिसतो.
धर्मराज सर्वसंग परित्याग करून वनात जाण्याचा हट्ट करतो. तेव्हा त्याला त्याच्या निश्चयापासून परावृत्त करण्याचा प्रसंग या ठिकाणी आला आहे. या वेळच्या संवादात गृहस्थाश्रमात राहणाऱ्या माणसाला आणखी वेगळे तप करण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले आहे. गृहस्थाश्रम हा अन्य आश्रमांचा आधार आहे. देव, पितर, अतिथी, नोकर-चाकर या सर्वांचा निर्वाह गृहस्थाश्रमी माणूस करत असतो. निसर्गातील पशुपक्षी, अन्य प्राणी यांचेही पोषण त्याच्याकडूनच होत असते. म्हणूनच गृहस्थाश्रम हे सिद्धी क्षेत्र आहे, असे महाभारत सांगते. जितेंद्रिय माणसाला जी सद्गती मिळते, तीच निष्ठापूर्वक आपली कर्तव्ये पूर्ण करणाऱ्या गृहस्थाश्रमी माणसाला मिळते, असेही महाभारत सांगते. Introduction to Mahabharata
महाभारत या आश्रमाची कर्तव्येही सविस्तरपणे वर्णन करते. महाभारतातील स्त्रिया या व्यवहारचतुर होत्याच, पण कलानिपुणही होत्या. या स्त्रियांना नृत्य, गायन शिकवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था होत्या, असे उल्लेख ग्रंथात वाचायला मिळतात. ययातीची कन्या माधवी गायन, नर्तन अशा गांधर्वकलेत प्रवीण होती, असा उल्लेख उद्योग पर्वात आला आहे. विराटाच्या राजवाड्यात उत्तरेसाठी स्वतंत्र नृत्यशाळा होती. विशेष म्हणजे नृत्यशाळेत शिक्षण घेणाऱ्या मुली घरी जात व रात्री नृत्यशाळा शून्य, असे लिहिले आहे. म्हणजे आत्ताच्या क्लासेसमध्ये जशी मुले शिक्षण घेण्यासाठी येतात, तसेच तेव्हाही होत असावे असे दिसते. Introduction to Mahabharata
वडील मंडळींचा मान राखणे, त्यांचा आदर करणे हे महाभारतकालच्या भारतीय समाजाचे विशेष लक्षण होते. आपल्याला पटले नाही तरी मोठ्यांचे ऐकायचे, ही तेव्हाची रीत होती. सभा पर्वामध्ये द्रौपदीची दुर्दशा झाल्यानंतर भीम खूप संतापतो. तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो, ”आपला ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर याची अमर्यादा करणे योग्य नाही.” त्याबरोबर भीम आपला संताप आवरून शांत बसतो. Introduction to Mahabharata

आपल्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती येत असेल तर आपण उठून उभे राहावे, हा संकेत तेव्हा कटाक्षाने पाळला जात होता. या काळात माणसे उद्योगशील होती. महाभारतात अनेक ठिकाणी मनुष्याचे दैव श्रेष्ठ की प्रयत्न श्रेष्ठ, याची चर्चा आली आहे. सर्व ठिकाणी केवळ दैव बलवत्तर आहे, म्हणून निरुद्योगी माणसाला त्याच्या दैवाची फळे कधीही चाखायला मिळणार नाहीत. तेव्हा माणसाला सतत उद्योगशील राहायला हवे. धर्मावर श्रद्धा ठेवायला हवी, असेच सांगितले आहे. महाभारताच्या अनुशासन पर्वात अकराव्या अध्यायात लक्ष्मी आणि रुक्मिणी यांचा संवाद आला आहे. त्यात लक्ष्मी म्हणते, ”कर्तव्यदक्ष, उद्योगी, देवतार्चन करण्यात तत्पर, न संतापणारे, कृतज्ञ, निग्रही अशा लोकांकडे माझा वास असतो, पण जे आळशी आहेत, कृतघ्न आहेत, ज्यांचा देवावर विश्वास नाही, त्यांच्याकडे मी कधीही जात नाही.” Introduction to Mahabharata
काही वेळा महाभारतकार आपले म्हणणे सांगताना परखड शब्दांचा वापर करतात. काहीही न करणाऱ्या माणसाचा धिक्कार करताना ते म्हणतात, ”जो मनुष्य उद्योग करीत नाही, तो नपुसकाच्या बायकोप्रमाणे दुःखी होतो.” मला वाटते, या वाक्यावर अधिक काही बोलायची गरज नाही. Introduction to Mahabharata
महाभारताने अनेक प्रतिभावंतांना वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची स्फूर्ती दिली आहे. महाभारतातील सत्यवान-सावित्री कथानक इतके सुंदर आहे की योगी अरविंदांनी त्यावर इंग्रजी भाषेत सावित्री हे महाकाव्य निर्माण केले. म्हणूनच या ग्रंथाचे डोळसपणाने वाचन व्हावे, त्याचे सखोल चिंतन व्हावे, हीच योगेश्वर श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करू या. Introduction to Mahabharata
