• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 January 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ओळख महाभारताची भाग १०

by Guhagar News
January 2, 2026
in Articals
20 0
0
Introduction to Mahabharata
39
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महारथी अर्जुन

धनंजय चितळे
Guhagar News : पुराणकाळात दोन जणांना वनारी या नावाने संबोधले जाते. अशोक वनाचा विध्वंस करणारे महारुद्र हनुमान आणि खांडव वन दहन करणारे अर्जुन, हे ते दोन जण आहेत. खांडव वन दहन करताना अर्जुनाकडून अश्वसेन नावाच्या नागाच्या मातेची हत्या झाली होती.  त्यानंतर अश्वसेन पाताळलोकात राहू लागला होता आणि त्याच्या मनात अर्जुनाविषयी वैरभावना धुमसत होती. जेव्हा कर्ण आणि अर्जुन यांचे युद्ध सुरू झाले, तेव्हा अश्वसेनाने ती संधी साधायचे ठरवले आणि तो कर्णाच्या भात्यामध्ये एका बाणाच्या रूपाने आला.

युद्ध सुरू असताना कर्णाने अर्जुनावर सर्पमुखी बाणाचा प्रयोग केला. या बाणावर आरूढ होऊन अश्वसेन अर्जुनाकडे झेपावला. या बाणाची संहारक शक्ती लक्षात घेऊन भगवान श्रीकृष्णांनी आपल्या रथाचे घोडे गुडघ्यावर बसवले. त्यामुळे तो बाण अर्जुनाच्या मुकुटावर आदळला. अर्जुन मेला नाही, हे पाहून अश्वसेन पुन्हा कर्णाकडे आला. त्याला बघून कर्णाने विचारले, “तू कोण आहेस?” अश्वसेनाने आपण कोण आणि का आलो, ते सांगितले. कर्णाने स्वतःच्या बळावर युद्ध जिंकण्याची तयारी दाखवत त्याची मदत नाकारली. तेव्हा सूडाने पेटलेल्या अश्वसेनाने स्वतःच्या बळावर अर्जुनावर हल्ला केला. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्याचा वध करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे सहा बाण सोडत त्याने अश्वसेनाला यमसदनी पाठवले. एखाद्या व्यक्तीच्या मनात किती दीर्घकाळ वैरभावना राहू शकते, याचेच दर्शन येथे घडते. त्याचबरोबर जर कोणी आपल्याला मदत करायला आला, तर त्याची मदत नाकारू नये, ही युद्धनीती आहे. कर्णाला ते करता आले नाही. म्हणून कर्णही संपला आणि अश्वसेनही आटोपला.

या युद्धकाळात अर्जुनाला आपल्या पराक्रमाचा गर्व वाटू लागला. पांडवांचा विजय किंवा कौरवांचा पराभव हा आपल्याच पराक्रमामुळे घडत आहे, असे त्याला वाटू लागले. यावेळी युद्ध करत असताना त्याला एक तेजस्वी आकृती दिसली. त्या आकृतीच्या हातात त्रिशूल होता आणि त्याच्या साह्याने तो वीर कौरव सैन्याला मारत सुटला होता. ही आकृती ज्या बाजूला जाईल, त्या बाजूचे वीर बघता बघता एक तर पळून जात किंवा मृत्युमुखी पडत. अर्जुनाला हा कोण योद्धा आहे, हे कळेना. त्याचवेळी महर्षी व्यास तेथे प्रकट झाले आणि अर्जुनाला म्हणाले, “अर्जुना, तुला जो वीर दिसत आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत. कौरवसैन्याचा संहार तेच करत आहेत. अर्जुना, तुला जे तुझे कर्तृत्व वाटत आहे, ते प्रत्यक्षात तुझे नसून श्री भगवंत ते तुझ्याकडून करून घेत आहेत, हे दाखवण्यासाठी भगवान श्री शंकरांनी केलेली ही लीला आहे. भगवान श्री शंकर आणि श्रीकृष्ण हे वेगळे नसून एकच आहेत, अशी भावना ठेवून त्यांना शरण जा आणि कोणताही अभिमान न बाळगता युद्ध कर. म्हणजे तुला यश मिळेल.”

महर्षी व्यासांच्या उपदेशाने अर्जुनाचे डोळे उघडले. त्याने महर्षी व्यासांना दंडवत घातला. भगवान श्री शंकरांना प्रणिपात केला आणि पुन्हा एकदा युद्धासाठी सज्ज झाला.

वाचक हो, या कथा आपल्या वाचनात येत नाहीत. म्हणून मुद्दाम हाही भाग इथे मांडला. कोणताही माणूस कितीही श्रेष्ठ भक्त असला तरी त्यालाही ‘ग’ची बाधा होऊ शकते. म्हणून परमार्थाच्या साधकाने अखंड सावध राहावे, हाच बोध या कथेतून घ्यायचा आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsIntroduction to MahabharataLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.