पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे; पर्यटन व्यवसायातून रोजगार आणणार
गुहागर, ता. 13 : कोरोनाच्या संकटातही महाराष्ट्र सरकारने पायाभुत सुविधांच्या निर्मितीचे कामे थांबविली नाहीत. एक लाख तेरा हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली. पर्यावरण संवर्धनाचे काम केले. असे प्रतिपादन पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. ते रमपुर येथील सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सवात बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते.
या महोत्सवाचे उद्घाटन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जि.प. शिक्षण सभापती सुनील मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर आपल्या बोलण्याची सुरवात करतानाच आदित्य ठाकरेंनी, कितीजणांनी मास्क आणलाय आणि किती जणांनी आपला मास्क नाकावर ठेवला आहे. असा प्रश्र्न विचारला. लॉकडाऊन नंतर आता अनेक व्यवहार हळुहळु सुरळीत होवू लागलेत. त्यामुळे सहाजिकच कोरानाचा सर्वांना विसर पडलाय. पण कोरोना अजून संपलेला नाही. तो आपल्यात आहे. त्यामुळे आमच्यासाठी, इतरांसाठी नाहीतर स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क घालणे आवश्यक आहे. अशी सूचना आदित्य ठाकरेंनी केली.
त्यानंतर ठाकरे म्हणाले की, वर्षभर झाले तरी कोरोना गेला नाहीए. त्यामुळे देशात मंदीचे आणि चिंतेचे वातावरण होते. माझ्या नोकरीचं काय, रोजगाराचं काय, याची चिंता होती. अशा या संकटात महाराष्ट्राने पायाभूत सुविधांचे कोणतेही काम थांबवले नाही. विमानतळ, धरणे, महामार्गाचे काम सुरु होते. जेवढे कामगार उपलब्ध होते त्यांना घेवून ही कामे आपण करत होतो. औद्योगिक क्षेत्रात आपण याच काळात एक लाख तेरा हजार कोटींची गुंतवणूक कामे आपण आणली. पर्यावरणाला हानी पोचू नये म्हणून काम केले. आरेचे जंगल असो वा सह्याद्रीचे जंगल असो त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या संकटात एका बाजुला आरोग्य विभागामार्फत राज्य सरकार तुमची काळजी घेण्यासाठी काम करत होते. त्याचवेळी अशी कामे करुन रोजगारही थांबणार नाही याची काळजी आपण घेतली. आज आपल्या आजुबाजुला सुरु असलेल्या उद्योगांनी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडली. म्हणूनच आरोग्य विभागाबरोबर राज्यातील उद्योजकांचे देखील कौतुक करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना तरुणांच्या रोजगाराची चिंता करणे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. आजचा विचार आपण सर्वचजण करतच असतो. आमदार भास्कर जाधव यांनी पुढचा (भविष्याचा) विचार केला. राज्याच्या, जिल्ह्याच्या, मतदारसंघाच्या विकासासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा करत असताना स्वाभाविकपणे रोजगार हा महत्त्वाचा विषय असतो. स्थानिकांना, भुमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. रोजगार मिळाला पाहिजे या बाळासाहेबांचा आग्रहाचा विषय होता. त्यांच्या जयंतीनिमित्त इतका महत्त्वपूर्ण कार्यक्रम आमदार भास्कर जाधव यांनी आयोजीत केला की पहिल्याच व्हॉटसॲप मेसेजला त्यांना होकार देवून टाकला.
आज नोकऱ्या देण्यासाठी इथे आलेल्या कंपन्या सहजासहजी आलेल्या नाहीत. त्यांनी रोजगार उपलब्ध करुन द्यावा म्हणून आमदार जाधव, विक्रांत जाधव यांनी खूप मेहनत घेतली आहे. लॉकडाऊन नंतर हे उद्योग आपल्याकडील कामगार कसे कमी करता येतील. कमी खर्चात उत्पादन कसे वाढवता येईल याचा विचार करत आहेत. अशावेळी आपल्याला मिळणारी नोकरी ही सहजासहजी मिळालेली नाही. याची जाणिव ठेवली पाहिजे. आपण कमी सुट्ट्या घेवून, कमी दांड्या मारुन, २४ तास मेहनत घेतली पाहिजे. आळस करु नका. नोकरीसाठी कॅम्प आयोजीत केले ही हजारो अर्ज येतात. लाखो बेरोजगार रांगेत उभे रहातात. पण आपल्याला माहिती असेत त्यापैकी किती जणांना आपण नोकरी देवू शकतो. बेरोजगारीचे हे चित्र आपल्याला बदलायचे आहे. म्हणून पुढील तीन वर्षात प्रमोशन मिळेल असा विचार करा. नोकरी करताना मी जगातला सर्वोत्तम प्रोफेशनल कसा बनेन याचा अभ्यास करा. मी नोकरी देणारा उद्योजक कसा बनेन याचे स्वप्न पहा.
राजकारण्यांना आगी लावणं सोपं असतं. पण लागलेली आग विझवणं कठीण आहे. इथेतर आमदार भास्कर जाधव अनेक बरोजगारांच्या घरातील चुली पेटविण्याचे काम करत आहेत. ही गोष्ट निश्चितच अभिनंदनीय आहे. मी देखील सातत्याने कोकणातील पर्यटन व्यवसाय कसा वाढेल याचा विचार करतोय. मंत्रीमंडळाच्या प्रत्येक बैठकीत पर्यटन विकासावर चर्चा होते. कोकणातील किनारपट्टी केवळ आपल्याच देशातील नाही तर आजुबाजुच्यां देशांपेक्षा नक्कीच सुंदर आहे. पर्यटनाच्या माध्यमातून येथे रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी वेगवेगळे प्रयत्न आपण करतोय. विमानतळ, महामार्ग, जेटी यातून कनेक्टीव्हिटी वाढणार आहे. शिवाय बीचशॅक्स, आगरी टुरिझम, आंबा महोत्सव असे काही विषय पुढील काही काळात सुरु होतील.
यावेळी जि.प.सदस्य विक्रांत जाधव, नेत्रा ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख सचिन बाईत, माजी सभापती अरूण कदम, चारूता कामतेकर, ऋतुजा खांडेकर, अरविंद चव्हाण, पूनम चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण उपस्थित होते. सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवात दहा हजाराहून अधिक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. सकाळी नऊ वाजल्यापासून मिलिंद हायस्कूलच्या मैदानावर उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या.