Guhagar news : कुठियाट्टमच्या शास्त्रीय रंगभूमीवरचा गंभीर आविष्कार, वैदिक मंत्रोच्चारांतून येणारा कालातीत नाद, छाऊ नृत्याचा ठसा, कोलकात्याच्या दुर्गापूजेत सामूहिक आस्था आणि गुजरातच्या गरब्यातील लयबद्ध आनंद, भारतीय जीवनपद्धतीची ही रूपं युनेस्कोच्या ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी’त जगाने मान्य केली आहेत.
ही ‘यादी’ (Intangible Cultural Heritage List) भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि तिच्या सातत्याचा पुरावा आहे. २००८ ते २०२३ या काळात समाविष्ट झालेल्या या परंपरा दाखवतात की, भारतीय संस्कृती केवळ इतिहासात अडकलेली नाही, तर आजही ती समाजाला एकत्र आणते, अध्यात्मिक दिशा देते आणि मानवजातीला सहअस्तित्वाचा मार्ग दाखवते. सत्ता संघर्षाच्या गोंगाटात भारत जगासमोर शांततेचा, विविधतेचा आणि निसर्गाशी संतुलन राखणाऱ्या जीवनपद्धतीचा आदर्श ठेवतो. हीच भारताची खरी ‘सॉफ्ट पॉवर आहे, जी त्याला नव्या शतकात राजनयिक पथदर्शक बनवते. India’s cultural imprint on the world stage
युनेस्कोच्या यादीचे महत्व
दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर १९४५ मध्ये युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organisation – UNESCO) या संस्थेची स्थापना झाली. शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती या क्षेत्रांमधील सहकार्याद्वारे जागतिक शांतता व परस्पर सौहार्द वाढवणे हे तिचे उद्दिष्ट आहे. युनेस्को जगभरातील देशांमधील परंपरा, तेथील प्रथा – परंपरा यांचा अभ्यास करणारी तज्ञ समितीची नेमणूक करते. त्या समितीच्या शिफारशीनुसार दोन प्रकारच्या वारसा यादी तयार करण्यात येतात.
१. जागतिक वारसा यादी (World Heritage List) – या यादीमध्ये समस्त मानवजातीचा वारसा ठरेल अशा स्मारके, वास्तू आणि नैसर्गिक वारसा यांचा समावेश होतो.
२. अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी (Intangible Cultural Heritage List) – या यादीमध्ये सण, नृत्य, मौखिक परंपरा, ज्ञान व हस्तकला संबंधित परंपरा.
एखाद्या सण, नृत्य, मौखिक परंपरा, ज्ञान किंवा हस्तकला संबंधित परंपरेला अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत (Intangible Cultural Heritage List) स्थान देण्यासाठी ती परंपरा प्रचलित आहे का, तिच्यामध्ये पुढील पिढ्यांना हस्तांतरित होण्याची क्षमता आहे का आणि ती समाजात एकात्मता निर्माण करणारी आहे का या निकषांचा विचार केला जातो. या प्रक्रियेद्वारे यादीतील स्थान निश्चित झाल्यास युनेस्को आणि इतर आंतरराष्ट्रीय समूह, संस्था इत्यादींच्या माध्यमातून त्या परंपरांचे संरक्षण, संवर्धन आणि संशोधन करण्याकरता आवश्यक निधी आणि अन्य सहाय्य दिले जाते. त्यामुळे त्यांचा जागतिक प्रसार सुनिश्चित होतो. India’s cultural imprint on the world stage
२००८ पासून २०२५ पर्यंत खालील परंपरांचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
१. वैदिक मंत्रपठण – २००८
वैदिक मंत्रपठण ही भारताची सर्वात प्राचीन मौखिक परंपरा आहे. गुरु-शिष्य पद्धतीने चालत आलेले हे पठण केवळ धार्मिक विधींमध्येच महत्वाचे आहे असे नाही तर, भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा तो आधारस्तंभ आहे. स्वर, उच्चार आणि लय यांची शिस्तबद्ध परंपरा आजही कायम आहे.
२. कुटियाट्टम (केरळ) – २००८
कुटियाट्टम ही अजूनही जिवंत असलेली जगातील सर्वात जुनी संस्कृत नाट्यपरंपरा आहे. केरळमधील मंदिरांतील कोईलांबळम रंगमंचावर ती सादर केली जाते. यात अभिनय, मुखमुद्रा, हस्तमुद्रा, नृत्य आणि संगीताचा संगम असतो. त्याद्वारे प्राचीन संस्कृत नाटके अनेक दिवस चालणाऱ्या सत्रांमध्ये रंगमंचावर सादर केली जातात.
३. रामलीला – २००८
रामलीला हा श्रीरामाच्या जीवनकथेला नाटक, संगीत आणि नृत्याद्वारे सादर करणारा पारंपरिक लोकोत्सव आहे. नवरात्रीच्या काळात गावोगावी खुल्या मैदानांवर तो लोकसहभागाने सादर होतो. हा केवळ धार्मिक उत्सव नसून, नैतिक मूल्ये, सामाजिक एकात्मता आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करणारे महत्त्वाचे माध्यम आहे. प्रामुख्याने उत्तर भारतात हा उत्सव अधिक प्रमाणात साजरा केला जातो. India’s cultural imprint on the world stage
४. रम्माण उत्सव (उत्तराखंड) – २००९
रम्माण हा गढवाल प्रदेशातील ग्रामदेव बिराजी देवतेच्या पूजेच्या निमित्ताने साजरा होणारा ग्रामोत्सव आहे. यात मुखवटे लावून लोकनृत्य, नाट्यसादरीकरण, लोकगीते आणि पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो. संपूर्ण ग्रामसमुदायाच्या सहभागामुळे हा उत्सव सामाजिक ऐक्य आणि स्थानिक परंपरेचे संरक्षण करणारा ठरतो
५. छाऊ नृत्य (झारखंड, ओडिशा, बंगाल) – २०१०
छाऊ नृत्य हा युद्धतंत्रातील हालचाली, लोकपरंपरा आणि कथानकांचा संगम असलेला एक सजीव लोकनाट्यप्रकार आहे. यात रामायण-महाभारत तसेच स्थानिक लोककथांचे सादरीकरण केले जाते. छाऊचे तीन प्रमुख प्रकार आहेत – सेराईकेला, पुरुलिया आणि मयूरभंज. तो प्रामुख्याने चैत्र पर्व सारख्या सणांमध्ये रंगीबेरंगी मुखवटे, प्रभावी ढोलवादन आणि उत्साही संगीतासह सादर केला जातो.
६. नाट-कीर्तन (मणिपूर) – २०१३
मणिपूरमधील वैष्णव भक्तीपरंपरेशी निगडित हा नृत्य-गीत प्रकार आहे. यात ढोलवादन, भक्तिगीते आणि सामूहिक नृत्याच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण व श्रीराम यांच्या कथा सादर केल्या जातात. त्यात संगीत, अध्यात्म आणि सामूहिकता यांचा सुरेख संगम दिसतो.
७. कुंभमेळा – २०१७
कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक एकत्रीकरणाचे उदाहरण आहे. गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर लाखो भाविक, साधू-संत आणि पर्यटक पवित्र स्नानासाठी विशिष्ट तिथीदरम्यान एकत्र येतात. हा उत्सव केवळ धार्मिक विधींचा मेळावा नसून श्रद्धा, साधना, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचा विशाल संगम आहे. विविध प्रांत व समाजघटकांच्या सहभागामुळे तो मानवतेच्या एकात्मतेचे आणि भारतीय एकत्वाचे प्रतीक ठरतो.
८. दुर्गापूजा (कोलकाता) – २०२१
दुर्गापूजा हा बंगालच्या सांस्कृतिक जीवनाचा आत्मा आहे. या उत्सवात उभारले जाणारे भव्य मंडप, कलात्मक प्रतिमाशिल्प, नृत्य-संगीताचे कार्यक्रम आणि लोकांचा उत्स्फूर्त सहभाग समाजाच्या सामूहिक ऊर्जा आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडवतात. देवी दुर्गेच्या उपासनेसोबतच हा उत्सव स्त्रीशक्तीचा गौरव करतो आणि कला, श्रद्धा व सामाजिक ऐक्य यांचा अद्वितीय संगम म्हणून जगभर ओळखला जातो.
९. गरबा (गुजरात) – २०२३
गरबा हा नवरात्रोत्सवातील प्रमुख सांस्कृतिक नृत्यप्रकार आहे. दीपाभोवती वर्तुळाकार रचनेत स्त्री-पुरुषांनी केलेले हे नृत्य आदिशक्तीची उपासना, भक्तिभाव आणि सामूहिक ऐक्य यांचे प्रतीक मानले जाते. विविध तालवाद्यांच्या ठेक्यावर रंगणारी गीते आणि रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख अशा उत्साही स्वरूपातील गरबा केवळ गुजरातपुरता मर्यादित न राहता आज जगभर पोहोचला आहे.
१०. छठ पूजा (बिहार) – २०२५ (नाव सुचवलेले/नामांकन झालेले)
छठ पूजा ही सूर्योपासना आणि निसर्गपूजेची प्राचीन भारतीय परंपरा आहे. यात स्त्रिया कठोर उपवास करून स्थानिक जलस्रोतांच्या काठावर उभे राहून अस्त आणि उदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य अर्पण करतात. हा उत्सव निसर्गाशी मानवाचे अतूट नाते, कृतज्ञता आणि सामूहिक श्रद्धा यांचे प्रतीक मानला जातो. India’s cultural imprint on the world stage
संघर्षग्रस्त जगात भारताची सॉफ्ट पॉवर:
युनेस्कोच्या यादीत स्थान मिळालेल्या या भारतीय परंपरा केवळ धार्मिक विधीपुरत्या मर्यादित नाहीत; तर तो आपल्या प्राचीन संस्कृती आणि सभ्यतेच्या प्रत्यक्ष वारसा आहे. वैदिक मंत्रांच्या गहन स्वरांतून प्रकट होणारे आध्यात्मिक सामर्थ्य, कुंभमेळ्यातील मानवतेचा महासंगम, दुर्गापूजेची सामूहिक सर्जनशीलता आणि छठ पूजेतले निसर्गाशी असलेले नाते – या सर्व परंपरा हे भारताच्या आत्म्याचे जगासमोरील प्रकटीकरण आहे.
आजच्या बदलत्या आणि अस्थिर भू-राजनैतिक परिस्थितीत केवळ शस्त्रसामर्थ्य किंवा भौतिक संपन्नता जगाला टिकवू शकत नाही. खऱ्या अर्थाने मानवतेला दिशा देणारी शक्ती संस्कृती आणि अध्यात्मिक वारशात असते. प्राचीन सांस्कृतिक वारसा समाजाला स्थैर्य देतो, पिढ्यांना जोडतो आणि संघर्षाच्या काळातही आशेचा किरण दाखवतो.
भारताचा मार्ग वेगळा आहे – तो फक्त शस्त्रसामर्थ्य किंवा संपत्तीवर आधारित नसून, आपल्या परंपरांमधून उमटणाऱ्या मूल्यांवर आधारलेला आहे. हा वारसा भारताला जगाला शांततेचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ बनवतो. India’s cultural imprint on the world stage