गुहागर न्यूज : प्राचीन काळापासून भारतीय स्त्रियांचा प्रवास हा थक्क करणारा आहे. यात विशेष करून भारतीय स्वातंत्र्यानंतरचा काळ हा लक्षणीय आहे. विविध चळवळी ते आंदोलने – डावे असो की उजवे; स्त्रियांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे ही “तिनेच” मिळवली आहेत. डाव्यांचा चळवळीत ती आंदोलनात अग्रभागी होती तर कधी दिशाहीन होवून नक्षल बनली. समाजवादी व कॉँग्रेसी विचारसरणीत राजकीय नेतृत्व ही तिने दिले व अगदी देशाची पंतप्रधानसुद्धा झाली. वेगवेगळ्या विचारप्रवाहांत झोकून देणाऱ्या ‘ती’ ला भारतीय चिंतनाची जोड मिळाल्यास काय होतं याचा विशेष उहापोह समाजमाध्यमातून होताना फारसा दिसत नाही. किंवा एकंदरीतच हिंदुत्व विचार आधारित सांघिक प्रयत्नांना आवर्जून बाजूला करण्याचा अनेक वर्षांचा डाव विविध माध्यमांतून केलेला दिसतो. पण अशा सर्व संघर्षमय परिस्थितीत देखील यावर्षी शंभरी पूर्ण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची नोंद आता सर्वच माध्यमांतून घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर संघ विचारांशी जोडल्या गेलेला ‘ती’चा प्रवास यातून समजून घेऊ. Indian women’s journey in the team is remarkable

भारतीय तत्वज्ञानामध्ये शिव आणि शक्ती अशी मांडणी करून स्त्री आणि पुरुष यांना ‘विरोधी’ न पाहता ‘परस्पर-पूरक’ दृष्टीने पाहण्याची मांडणी केलेली आहे. ‘चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम्’ म्हणून आपल्या अस्तित्वाचा वेध घेणाऱ्या जगद्गुरू आदि शंकराचार्यांनी देखील ‘गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि’ या रचनेतून हीच परस्पर पूरकता अधोरेखित केली आहे. वैयक्तिक आयुष्यात ज्याप्रमाणे या परस्पर पूरकतेची जाणीव आणि गरज वारंवार भासते त्याचप्रमाणे सामाजिक संघटनेमध्ये देखील ती असते. नव निर्मितीसाठी आवश्यक आक्रमक ‘पौरुषत्व’ आणि सर्वसमावेशक ‘ममत्व’ या आजच्या भाषेत सांगायच्या तर gender neutral terms आहेत. यावर्षी शंभरी पूर्ण करत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘पुरुषांची संघटना’ हा टॅग लावणाऱ्यांसाठी शताब्दीच्या निमित्त काही वास्तवाचे आरसे.
राष्ट्र सेविका समिती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. त्याकाळी केवळ पुरुषांचा सहभाग असणाऱ्या या राष्ट्रकार्यामध्ये महिलांचा देखील सक्रिय सहभाग असावा या प्रेरणेतून लक्ष्मीबाई केळकर यांनी १९३६ मध्ये ‘राष्ट्र सेविका समिति’ची स्थापना केली. त्या काळात महिलांना सार्वजनिक जीवनात संघटनात्मक कार्यासाठी एक व्यासपीठ मिळाले. शाखा, व्यायाम, शिबिरे, व्याख्यानमाला या उपक्रमांतून महिलांच्या बौद्धिक, शारीरिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचे कार्य सुरू झाले. Indian women’s journey in the team is remarkable
‘मी’ पेक्षाही ‘आपण’ हा कुटुंबभाव हे स्त्रीत्वाचे एक प्रमुख वैशिष्ट्य. त्याचमुळे कोणत्याही क्षेत्रातील सामाजिक कार्यासाठी आवश्यक असणारी सर्वसमावेशकता समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि संस्कारकार्याद्वारे सक्रिय व्हावी या दृष्टीने समितीने कार्याची दिशा ठरवली.
समितिच्या स्थापनेनंतर अनेक स्थित्यंतरांतून वाटचाल करत, राष्ट्र सेविका समितिने महिलांच्या समाजकार्यातील सहभागाला दृढ आणि व्यापक स्वरूप दिले. स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतर आणीबाणीकाळात महिलांनी तुरुंगवास भोगला, सामाजिक बहिष्कार सहन केला तरी संघटन कार्य सोडले नाही. समितिच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजना, संस्कारवर्ग, स्वयंसहाय्य गट, आरोग्य शिबिरे यांसारख्या उपक्रमांनी हजारो महिलांना स्वावलंबी बनवले. शाखा, जिल्हा, विभाग, प्रांत, क्षेत्र आणि अखिल भारतीय स्तरावर महिलांनी नेतृत्व करत आज विविध क्षेत्रांत कार्यकर्त्या पुढाकार घेत आहेत. या प्रवासातून स्त्रियांच्या थेट आणि अप्रत्यक्ष योगदानामुळे राष्ट्र सेविका समिति ही समाजपरिवर्तनाची प्रेरक शक्ती ठरली आहे. सद्यस्थितीला समितिच्या संपूर्ण भारतात ४,३१४ शाखा असून १,७५८ विविध सेवा कार्यांद्वारे समर्थ भारताच्या निर्मितीमध्ये आपले योगदान देत आहेत. Indian women’s journey in the team is remarkable
महिला पूर्णकालीन कार्यकर्त्या
संघामध्ये ‘प्रचारक’ नावाची एक व्यवस्था चालते. म्हणजे संघकामासाठी कोणत्याही वैयक्तिक आशा, अपेक्षांना जाणीवपूर्वक बाजूला ठेऊन आपले आयुष्य देणारे कार्यकर्ते. असे लोक कोणताही व्यवसाय / नोकरी न करता, कोणत्याही सांसारिक बंधनात न राहता २४ तास केवळ देशकार्यासाठी देतात. संघकामाशी जोडले गेलेले परिवार, इतर गृहस्थी कार्यकर्ते या ‘प्रचारक’ मंडळींची अगदी घराच्या सदस्याप्रमाणे काळजी घेतात. अशीच काहीशी समांतर व्यवस्था संघ प्रेरणेने सुरु झालेल्या संघटनांमध्ये देखील आहे. आणि त्यांना ‘पूर्णवेळ कार्यकर्ते’ म्हणतात, जे आपला संपूर्ण वेळ संघटनेच्या कामाकरिता देतात.
याच व्यवस्थेमध्ये काही महिला कार्यकर्त्या देखील आहेत. आजच्या, ‘equality’ हा keyword बनलेल्या काळातदेखील आपले घर, कुटुंब सोडून देशालाच संपूर्ण कुटुंब मानून काम करण्याचा निर्णय एखाद्या पुरुषासाठी जितका स्वागतार्ह मानला जाईल तेवढा तो एका स्त्रीच्या बाबतीत मानला जातो का? तरीही या सर्व क्षेत्रातील संघटनांमध्ये अनेक महिला कार्यकर्त्या हा साहसी निर्णय घेऊन काम करताना दिसतात. मग त्यातील काही आपलं शिक्षण पूर्ण करून काही वर्षांकरिता अशा प्रकारचं काम स्वीकारतात तर काही जणी आपलं संपूर्ण आयुष्य कामासाठी समर्पित करतात. संघ प्रेरित विविध संघटनांमध्ये सध्या अशा ४४३ महिला पूर्णवेळ कार्यकर्त्या संपूर्ण भारतात काम करत आहेत. त्यात मग बौद्धिक क्षेत्रातील काम असो किंवा ईशान्य भारतातील दऱ्याखोऱ्यात होणारे जीवघेणे हल्ले असो. या सर्व ठिकाणी तितक्याच खंबीरपणे ‘ती’ आज विविध संघटनांच्या माध्यमातून उभी असलेली पाहायला मिळते. Indian women’s journey in the team is remarkable

संघ शताब्दी वर्षानिमित्त देशभरात आयोजित झालेली माहिला संमेलनं. या उपक्रमांतर्गत देशभरात ४७२ महिला संमेलनांचे आयोजन झाले, ज्यामध्ये सुमारे ५,७५,७४० महिला सहभागी झाल्या. या परिषदांमध्ये उद्घाटन सत्रात भारतीय स्त्रीविषयक दृष्टीकोन, गटचर्चांमध्ये स्थानिक महिलांच्या समस्या व त्यावरील उपाय, तर समारोपात भारताच्या विकासातील महिलांची भूमिका या विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चांमधून आरोग्य, शिक्षण, रोजगार, सामाजिक प्रश्न आणि अन्याय-अत्याचार यांसारख्या अनेक मुद्द्यांवर उपाय सहभागी महिलांद्वारा सुचवले गेले. त्यात महिलांना कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणे, स्वसंरक्षण प्रशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शासन योजनांची माहिती प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवणे, व्यसनमुक्ती, तरुण मुलींमध्ये चारित्र्य व मूल्य शिक्षण यावर भर देणे यांचा समावेश होता. या संमेलनांनी स्त्रीशक्तीला एकत्र आणून राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात तिच्या सक्रिय सहभागाची नवी पायाभरणी केली.
नारीशक्तीच्या राष्ट्रभक्तीचे विराट दर्शन घडवणारा उपक्रम म्हणजे ऑपरेशन सिंदूर स्मरणार्थ आयोजित तिरंगा यात्रा. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने दाखवलेला अद्वितीय शौर्याचा इतिहास साजरा करण्यासाठी देशभरातील विविध संघटनांतील महिलांनी तिरंगा यात्रांचे आयोजन केले. या यात्रांनी मातृभूमीवरील अपार प्रेम आणि अभिमानाचे दर्शन घडवून जनमानसात खऱ्या अर्थाने राष्ट्रभाव चेतवला. देशातील तब्बल ८३७ ठिकाणी स्वयंस्फूर्तपणे उभ्या राहिलेल्या या यात्रांमध्ये दीड लाखांहून अधिक महिला सहभागी झाल्या आणि भारतमातेप्रीत्यर्थ आपला निष्ठाभाव व्यक्त केला. या तिरंगा यात्रा केवळ कार्यक्रम नाही, तर भारतीय महिलांच्या हृदयात दडलेल्या राष्ट्रभक्तीच्या जाज्वल्य प्रतीक ठरल्या. Indian women’s journey in the team is remarkable
कौटुंबिक जीवनात शहरीकरण आणि तंत्रज्ञानामुळे संयुक्त कुटुंबांपेक्षा लहान कुटुंबांची संख्या वाढत आहे. ओळख आणि समावेशकतेच्या दृष्टीने आधार कार्डचे कव्हरेज २०१८ पर्यंत ९० टक्क्यांवर पोहोचले, पण ईशान्य भारतातील महिला या बाबतीत अद्याप मागे दिसतात.
भारतीय स्त्रियांचा प्रवास हा संघर्षमय असूनही तेजस्वी राहिला आहे. राष्ट्र सेविका समितीसारख्या संघटनांनी दिलेल्या व्यासपीठामुळे स्त्रियांना केवळ कुटुंबापुरती मर्यादा न राहता राष्ट्रनिर्मितीमध्ये सक्रिय योगदान देता आले. विविध महिला संमेलनं, अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उपक्रम आणि राष्ट्रीय स्तरावरील संशोधन या सर्व प्रयत्नांनी स्त्रीशक्तीला नवे भान, नवे भांडवल आणि नवा आत्मविश्वास दिला आहे. आज शिक्षण, आरोग्य, रोजगार, संस्कार आणि नेतृत्व या सर्वच क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढत आहे. त्यांचा हा प्रवास केवळ स्त्री-सक्षमीकरणापुरता मर्यादित नसून, तो समाजपरिवर्तन आणि समर्थ भारताच्या निर्मितीचा भक्कम पाया ठरत आहे. Indian women’s journey in the team is remarkable