प्रा. राधाकांत ठाकुर ; कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रातर्फे ऑनलाइन अभ्यासक्रम
रत्नागिरी, ता.16 : भारतीय कालगणनेचा इतिहास खुप वर्षांचा आहे. ज्योतिषशास्त्राधारे ग्रहगणित करून अनंत असलेल्या काळाची गणना सुद्धा भूतलावरील व्यवहार चालविण्यासाठी केली जाते व ती प्रत्यक्ष रुपात दाखविलीसुद्धा जाऊ शकते, म्हणून भारतीय कालगणना हे प्रत्यक्षशास्त्र आहे असे प्रतिपादन तिरुपती येथील राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. राधाकांत ठाकुर यांनी केले. Indian Chronology Online Course


भारतीय कालगणनेवरील प्रमाणपत्रीय अभ्यासक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा (रामटेक) वेदांग ज्योतिष विभाग, रत्नागिरी उपकेंद्र, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचा संस्कृत विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम ऑनलाइन सुरू झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. मधुसूदन पेन्ना यांनी काळाचा उपयोग, काळ, गणित व दर्शनशास्त्राचा संबंध यावर सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, एक चांगला गणितज्ञ एक चांगला दर्शनशास्त्राचा तज्ञ बनू शकतो, पंचांग सर्वसामान्य व्यक्तिंनाही माहिती असायला हवे, पंचांगाचे वाचन फक्त ज्योतिषांनीच नव्हे तर प्रत्येकाने दररोज करायला हवे. हे आपले प्राचीन काळापासून कालमापनाचे यंत्र आहे. Indian Chronology Online Course
कालगणना या विषयाची मांडणी करताना वेदांग ज्योतिष विभाग प्रमुख व प्राचीन भारतीय विज्ञान व मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता प्रा. कृष्णकुमार पांडे यांनी सांगितले की, भारताने स्वीकारलेली ही कालगणनासुद्धा सूर्यावर आधारित आणि खगोलशास्त्रीय आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील परस्पर संबंधावर ही कालगणना असल्यामुळे चांद्र कालगणनेपेक्षा सौर कालगणना ही निसर्गचक्राला अधिक जवळची आहे सुद्धा मानले जाते. कालगणना सूर्याची पृथ्वीच्या संदर्भातील स्थिती पाहून निश्चित करण्यात आली आहे. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमधून आपल्याला ब्राह्म, दिव्य, पित्र्य, प्राजापत्य, बृहस्पत्य, सौर, सावन, चान्द्र आणि नक्षत्र अशा नऊ पद्धती अगर मान सांगितल्याचे आढळते. ब्रह्मदेवाच्या आयुष्यावरून मोजले जाते ते ब्राह्म मान होय. पुराणांमध्ये आपल्याला ब्रह्मदेवाच्या आयुर्मानाबद्दलची वर्णने सापडतात. याचा चार युगांच्या कल्पनेशी घनिष्ट संबंध आहे. भारतीय परंपरेत कालचक्र फिरून पुन्हा पहिल्यापासून सुरू होते, ही कल्पना सापडते पूर्वी घडून गेलेल्या गोष्टी भविष्यात पुन्हा घडणार आहेत आणि हे कालचक्र अव्याहतपणे चालूच राहणार आहे. Indian Chronology Online Course
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. आशिष आठवले यांनी केले. मान्यवरांचे स्वागत डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. प्रास्ताविकात रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक प्रा. दिनकर मराठे यांनी या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे स्वरूप, विषयांची तोंडओळख करून दिली. अभ्यासक्रमात महाराष्ट्रासह अन्य प्रदेशातील जिज्ञासूंनी सहभाग घेतला आहे, असे सांगितले. जयंत अभ्यंकर यांनी आभार मानले. Indian Chronology Online Course