अंजनवेल ग्रुप ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
08.09.2020
गुहागर : तालुक्यातील अंजनवेल ग्रुप ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील जनतेसाठी कोरोना प्रादुर्भावावर प्रभावीपणे तोंड देण्यासाठी औषधांबरोबर एमबीबीएल व बालरोगतज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली आहे. अंजनवेल ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अंजनवेल ही जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायत तालुक्यात अग्रेसर असते.
या ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 61 व कलम 45 मधील ग्रामसुचीतील अनुक्रमांक 25 मधील तरतुदीप्रमाणे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्याकडील पत्राप्रमाणे अंजनवेल ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोणत्याहि संक्रमण रोगाचा उद्रेक, फैलाव किंवा पुनर्उद्भव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी वैद्यकीय पदवी प्राप्त डॉ. शशांक ढेरे (एम.बी.बी.एस. बालरोग तज्ञ) यांची नेमणूक केली आहे. त्याचप्रमाणे त्यांना सहाय्य करण्यासाठी 1 नर्स, 3 आशा वर्कर्सची नेमणूक केली आहे. त्यांचे मासिक मानधन ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून दिले जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत आरोग्य उपचार केंद्र तयार करण्यात आले आहे. युसूफ मेहेर अली सेंटर संचलित प्रिन्स चिन्नेश व नेनेस्का खेडकर स्मारक रुग्णालयाची जुनी इमारत या ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतली आहे. अंजनवेल गावातील कोणत्याहि ग्रामस्थाला सर्दी, ताप, खोकला आदी त्रास होत असेल आणि त्यांना तात्पुरता स्वरुपात रुग्णालयात दाखल करावे लागणार असेल तर याठिकाणी दाखल करून उपचार करण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोनासंदर्भात अतीसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या परंतु कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या फक्त अंजनवेल गावातीलच ग्रामस्थांना येथे दाखल करून घेण्याची व औषधोपचार करण्याची व्यवस्था केली आहे.
60 वर्षांपुढील तीव्र लक्षणे असलेल्या व इतर गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या रुग्णांना येथे दाखल करून घेतले जाणार नाही. महत्त्वाचे म्हणजे 3 वर्षांपुढील सर्व ग्रामस्थांची रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून ग्रामपंचायतीकडून डॉक्टरांच्या सल्ल्याने विटामीनयुक्त औषधांचा विनामुल्य पुरवठा केला जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीने नेमलेले कर्मचारी महसूल गावातील प्रत्येक कुटुंबातील माणसांची माहिती जमा करीत आहेत. प्रत्येक महसुली गावासाठी नेमण्यात आलेल्या आशा कर्मचारी दररोज आपल्या महसुली गावातील सर्व कुटुंबाशी संपर्क ठेऊन ग्रामस्थांच्या आरोग्याची माहिती घेतली व कोणाला आजारपणाची लक्षणे असल्यास त्यांना डॉक्टरांकडे पाठवण्याची व्यवस्था करतील. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेची मदत मिळेल. आपल्या गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही ही सतर्कता बाळगली असल्याचे सरपंच यशवंत बाईत यांनी सांगितले.