चिपळूण अर्बनच्या अध्यक्षा ठरल्या प्रभावशाली महिला
गुहागर, ता. 13 : चिपळूण अर्बन बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा सौ. राधिका पाथरे यांना सकाळ माध्यम समुहाने आयडॉल ऑफ महाराष्ट्र वुमन इन्फ्ल्युएन्सर (प्रभावशाली महिला) या पुरस्काराने सन्मानित केले. सौ. राधिका पाथरे या गेली 25 वर्ष पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी चालवतात. त्या रत्नागिरी लॅबोरेटरी टेक्नोलॉजिस्ट असोसिएशनच्या सेक्रेटरी होत्या. तसेच 22 वर्ष चिपळूण अर्बनच्या संचालिका म्हणून त्या कार्यरत आहेत. Impressive Women’s Award to Pathare


चिपळूण अर्बन बँकेच्या 88 वर्षाच्या इतिहासात प्रथमच राधिका पाथरेंच्या रुपाने एका महिलेला अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. बँकेच्या अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी महिला सक्षमीकरणाला गती दिली. महिलांनी उद्योग व्यवसायात यावे म्हणून महिला बचतगटांना प्राधान्याने कर्ज देण्याचे धोरण आखले. सौ. पाथरे यांनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली त्याच वर्षी चिपळूणात महापुर आला. बँकेच्या मुख्य कार्यालयातही 15 फूट पाणी होते. या संकटातून बाहेर पडून जनसेवेसाठी बँक पुन्हा कार्यान्वित करण्याचे आव्हान समोर होते. बँकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. कोरोनाच्या संकटानंतर आलेल्या महापुरामुळे व्यापाऱ्यांनाही प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. अशा स्थितीत चिपळूणच्या व्यापाऱ्यांना मदतीचा हात म्हणून 7 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्याचा धाडसी निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या पार्श्र्वभुमीवर सौ. पाथरे यांच्या नेतृत्त्वाखील चिपळूण अर्बन बँकेने सन 2020-2021 मध्ये 7 कोटी 99 लाखाचा तर सन 2021-22 मध्ये 6 कोटी 25 लाखाचा नफा कमविला. Impressive Women’s Award to Pathare


अशा प्रकारे विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेल्या आणि वित्तसंस्थेचे नेतृत्त्व करणाऱ्या सौ. राधिका पाथरे यांनी चिपळूण अर्बन बँकेचा प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला. याच त्याच्या कार्याचा सन्मान सकाळ माध्यम समुहाने केला. बुधवार 11 मे रोजी कोल्हापूर येथील हॉटेल सयाजीमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात आयडॉल ऑफ महाराष्ट्र वुमन इन्फ्ल्युएन्सर (प्रभावशाली महिला) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मधुराज् रेसिपी या युट्यूब चॅनेलच्या निर्मात्या मधुरा बाचल यांच्या हस्ते सौ. राधिका पाथरे यांना मानपत्र, देवून गौरविण्यात आले. यावेळी सकाळचे निवासी संपादक निखिल पंडीतराव, स्मार्ट सोबती पुरवणीच्या संपादिका सुरेखा पवार, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे, ऐश्वर्या बेहेरे सकाळच्या सांगली आवृत्तीचे सहयोगी संपादक शेखर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. Impressive Women’s Award to Pathare


या सोहळ्याला उपस्थित राहून चिपळूण अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निहाल गुढेकर, बँकेचे ज्येष्ठ संचालक सतिश (अप्पा) खेडेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई यांनी सौ. राधिका पाथरे यांना शुभेच्छा दिल्या. अभिनंदन केले. Impressive Women’s Award to Pathare