टाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका, समुद्र व नदी नाल्यामध्ये विसर्जन
गुहागर, ता. 03 : गुहागर तालुक्यात पाच दिवसांच्या गौरी गणपतींच्या मूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने विविध समुद्रकिनारी व नदी नाल्यामध्ये गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले. संपूर्ण तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत शांततेत विसर्जन सुरु होते. विसर्जन ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात होते. Immersion of Gauri Ganpati idol in Guhagar

गुहागर तालुक्यात दरवर्षी गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गेले पाच दिवस तालुक्यातील प्रत्येक घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यामुळे तालुक्यात गेली काही दिवस भजन, जाकडी नृत्य, महिलांचे नाच व अन्य कार्यक्रमाने वातावरण भक्तीमय झाले होते. पाच दिवसांच्या गणपतींचे व गौराईचे आज सातव्या दिवशी गुहागर खालचापाट, शहरासह असगोली, वरचापाट बाग, आरे, वेलदूर, अंजनवेल, धोपावे, पालशेत, वेळणेश्वर, साखरी आगर, नरवण, तवसाळ या समुद्र किनाऱ्यावर तर कोतळूक, गिमवी, आबलोली, तळवली, वडद, देवघर, झोंबडी याठिकाणी नागरिकांनी नद्या नाल्यामध्ये बाप्पाचे टाळ मृदुंगाच्या गजरात, तर काहींनी गणपती बाप्पा मोरया…जयघोष करत विसर्जन केले. तालुक्यात काहींनी साउंड सिस्टीम लावून लाडक्या बाप्पाची मिरवणूक काढली. Immersion of Gauri Ganpati idol in Guhagar

गुहागर समुद्र किनारी नगरपंचायतीने विसर्जनासाठी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पाच ठिकाणी पाण्यामध्येच सुरक्षा रक्षक उभे केले होते. पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व ठिकाणी लक्ष ठेवत विसर्जन ठिकाणी मोठी गर्दी होणार नाही याची काळजी घेत होते. Immersion of Gauri Ganpati idol in Guhagar