गुहागर, ता. 02 : गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर भारतीय तटरक्षक (Indian Coast Guard) दलाचे हॉवरक्राफ्ट (Hovercraft) थांबविण्यात आले आहे. हे हॉवरक्राफ्ट गुजराथकडे जाणार आहे. तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेल्या आत्पकालिनस्थितीत (Emergency Landing) गुहागरला थांबावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आठवडाभरापूर्वी अशाच पध्दतीने एक हॉवरक्राफ्ट दापोली तालुक्यातील किनाऱ्यावर उतरले होते.


भारतीय तटरक्षक दलाचे (Indian Coast Guard) हे हॉवरक्राफ्ट मेंगलोरहून गुजराथकडे जात होते. गुहागर परिसरात खोल समुद्रात असताना हॉवरक्राफ्टच्या इंजिनामध्ये बिघाड झाला. त्याची दुरुस्ती करण्यासाठी मुंबईतून तटरक्षक दलाचे जवान निघाले आहेत. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर हॉवरक्राफ्ट मार्गस्थ होणार आहे. या हॉवरक्राफ्टमध्ये तटरक्षक दलाचे 14 जवान आहेत. (Hovercraft on Guhagar Beach)
गुहागर वरचापाट येथे दुर्गादेवी मंदिरासमोरील समुद्रकिनाऱ्यावर हे हॉवरक्राफ्ट उभे आहे. याची माहिती मिळताच गुहागरचे पोलीस निरिक्षक बी. के. जाधव यांनी हॉवरक्राफ्टमधील अधिकाऱ्यांची भेट घेतली. समुद्रकिनाऱ्यावर उभे असलेले हॉवरक्राफ्ट पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली तर त्याचा त्रास होवू नये म्हणून दोन जवानांना समुद्रकिनाऱ्यावर नियुक्त केले. कोणतीही अडचण असेल तर सांगा, सर्व प्रकारची मदत करु. असे आश्र्वासीत केले. (Hovercraft on Guhagar Beach)


कसे चालते हॉवरक्राफ्ट (How it works)
युनायटेड किंगडम (United Kingdom) मध्ये तयार करण्यात येणाऱ्या एच 196 (H 196 Hovercraft) या हॉवरक्राफ्टची माहिती देताना अधिकारी म्हणाले की, पाण्यावर तसेच जमिनीवर चालण्याची याची क्षमता आहे. हॉवरक्राफ्टच्या तळाला एक मोठा जाड, न तुटणाऱ्या रबरसदृश्य कापडाचा फुगा असतो. इंजिन सुरु झाल्यावर या फुग्यात प्रेशरने हवा भरते. त्यामुळे प्रत्यक्ष हॉवरक्राफ्टचा जमीन अथवा पाण्याशी थेट संबध कधीच येत नाही. बोटीप्रमाणे हॉवरक्राफ्टच्या तळाला पंखा व दिशा दाखवणारे सुकाणू नसते. हेच युनिट हॉवरक्राफ्टच्या डेकवर (मागील बाजुस) असते. तळाच्या फुग्यात हवा भरल्यानंतर हॉवरक्राफ्टच्या डेकवर असलेले दोन मोठे पंखे सुरु केल्यानंतर हॉवरक्राफ्ट पळू शकते. जमीनीवर पळण्याचा वेग कमी असतो. मात्र पाण्यामध्ये साधारणपणे प्रति तास 45 नॉटीकल मैल या वेगाने हॉवरक्राफ्ट धावते. हा वेग अन्य बोटींच्या तुलनेत जास्त असतो. त्याचबरोबर कमी पाणी असलेल्या नदीतही हॉवरक्राफ्ट धावते. समुद्रकिनाऱ्यांवरही ते चालते. (Hovercraft on Guhagar Beach)


हॉवरक्राफ्टचा उपयोग (Use of Hovercraft)
समुद्रीचाचे, अपघात करुन निघुन जाणाऱ्या बोटी, समुद्रसीमांवरील घुसखोरी यांना आळा घालण्यासाठी हॉवरक्राफ्टचा उपयोग होतो. बोटीपेक्षाही वेगवान असल्याने समुद्रामध्ये अवैध काम करुन किनारे, कमी खोलीच्या खाड्यांमध्ये पळून जाणाऱ्यांना पकडण्यासाठी हॉवरक्राफ्ट उपयोगी पडते. तसेच समुद्रात अपघात झाल्यास शोध आणि बचाव कार्यात हॉवरक्राफ्टचा प्रभावीपणे उपयोग करता येतो. फक्त खराब हवामानात हॉवरक्राफ्ट काम करु शकत नाही. (Hovercraft on Guhagar Beach)