कामगार हिताची स्वतंत्र संस्कृती निर्माण करणारा उद्योजक
गुहागर, ता. 13 : ऐंशीच्या दशकात पेठे ब्रेक मोटर्स या उद्योगाची उभारणी करुन आजपर्यत 200हून अधिक कुटुंबांचे संसार उभे करणारे उद्योजक भालचंद्र वामन पेठे यांचे शुक्रवारी लोणावळा येथे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे गुहागर तालुक्यातील 200 कुटुंबावर शोककळा पसरली आहे. Highlights of Bhalchandra Pethe
भालचंद्र वामन पेठे म्हणजे वामन हरी पेठे या सुप्रसिध्द सराफांचे सुपुत्र. सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायामुळे देश विदेशात नावारुपाला आलेल्या पेठे घराण्यात त्यांचा जन्म झाला. पण भालचंद्र पेठे यांनी सोन्याहून अधिक प्रेम लोखंडावर केले. या काळ्या सोन्याच्या विविध उत्पादनांची निर्मिती करताना भालचंद्र पेठे यांनी शेकडो कुटुंबांच्या चरितार्थाचीही काळजी घेतली. इतकेच नव्हेतर सोन्याच्या दागिन्यांसाठी जशी वामन हरी पेठे यांची ओळख आहे तशीच ओळख रेल्वेचे ब्रेक, लिफ्टचे ब्रेक यामध्ये पेठे ब्रेक हे नाव प्रसिध्द करण्याचे काम भालचंद्र वामन पेठे यांनी केले. Highlights of Bhalchandra Pethe
लोणावळा येथे पेठे इंजिनिअरींग या कंपनीची स्थापना भालचंद्र पेठे यांनी 1965 मध्ये केली. या उद्योगाला आवश्यक असणारे कास्टींग बनविण्यासाठी ते फाऊंड्री व्यवसाय शिरले. 1975 मध्ये कास्टवेल नावाचा नवीन उद्योग लोणावळ्यात सुरु केला. या दोन्ही उद्योगांना पुरक असे आणखी एक युनिट हवे असे वाटु लागल्यावर त्यांच्यासमोर गुहागर हे आपलं गाव उभं राहीले. भालचंद्र पेठे यांनी गुहागरजवळच असलेल्या मोडकाआगर येथे पेठे ब्रेक मोटर्स या कंपनीची सुरूवात केली. आज या इंजिनियरींग व्यवसायामधुन एसी ब्रेक, डिसी ब्रेक, इलेक्ट्रीक मोटर्स, हायड्रोलिक थ्रस्टर यांचे उत्पादन घेतले जाते. या उत्पादनांचे ग्राहकही प्रतिष्ठीत आहेत. स्टील ॲथोरिटी ऑफ इंडिया, भारतीय रेल्वे, सर्व राज्यांच्या विद्युत उत्पादक कंपन्या, बजाज ग्रुप, जेएसडब्लयु, टाटा मोटर्स, क्रेन उत्पादन कंपन्या, लिफ्ट उत्पादक कंपन्या या शासकीय आणि खासगी कंपन्या पेठे मोटर्सची उत्पादने गुणवत्तापूर्ण असल्याने गेली अनेक वर्ष खरेदी करत आहेत. Highlights of Bhalchandra Pethe
शेकडो कुटुंबांचा पोशिंदा
भालचंद्र वामन पेठे हे अत्यंत दयाळु, साधी रहाणीमान असलेले उद्योजक होते. या तिनही उद्योगांच्या सुरवातीपासून आजपर्यंतचा विचार केल्यास साधारणपणे 650 कुटुंबाचा चरितार्थ पेठे यांच्यामुळे चालला. कारखान्यामध्ये एखाद्या कामगाराकडून एखादी गंभीर चूक झाली, वारंवार एखाद्या कामागाराकडून गैरवर्तन घडले तरी भालचंद्र पेठे यांनी त्यांच्या कार्यकाळात संबंधित कामगाराला कामावरुन काढून टाकले असे एकही उदाहरण घडलेले नाही. कंपनीत अपघात झाल्यास अपघातगस्ताच्या औषधोपचारांसाठी कंपनी व्यवस्थापन खर्च करते. हे नवीन नाही. पण आपल्या कामगाराच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती गंभीर आजारी असेल तर त्याला आर्थिक मदतीबरोबरच योग्य रुग्णालयात पाठविणे, तिथे त्यांच्यावर चांगले उपचार होतील याची काळजी घेणे यामध्येही भालचंद्र पेठे यांचे लक्ष असायचे. एखाद्या कामागाराला घर बांधायला, मुलांच्या विवाह करीता आगावू रक्कम हवी असली तरी त्याला चौकटीपलीकडे जावून भालचंद्र पेठे मदत करत असतं. आपल्या कारखान्यातील सर्व कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचे हित जपण्याची एक आगळीवेगळी संस्कृतीच भालचंद्र पेठे यांनी तयार केली होती. Highlights of Bhalchandra Pethe
गुहागरशी अतुट नातं
वामन हरी पेठे ज्वेलर्स आणि सराफ या परिवाराचे मुळगाव गुहागर. गुहागर वरचापाट येथे सध्या वास्तव्याला असलेलं अद्वैत गोखले यांचे घर हे मुळ पेठ्यांचे घर. साधारणपणे 60 च्या दशकात पेठ्यांच्या घरातील अनेक मंडळी नोकरी उद्योग धंद्यांनिमित्त गुहागरातून बाहेर पडली आणि तिकडेच स्थीरस्थावर झाली. तरीही या घराजवळ असलेले मारुतीचे मंदिर आणि कोपरी नारायण मंदिर या दोन्ही देवस्थानांमधील उत्सव पेठे कुटुंबच करत असे. पुढे पेठे कुटुंबाने कोपरी नारायण मंदिराची जबाबदारी वरचापाट ग्रामस्थांवर सोपवली. याच कुटुंबातील भालचंद्र वामन पेठे यांनी 1980 च्या दरम्यान मंदिरासमोर असलेल्या प्रसिध्द हार्मोनियम वादक गोविंदराव पटवर्धन यांच्या कुटुंबाकडून पटवर्धनांच्या घराजवळील जमिन खरेदी केली. तिथे स्वतंत्र घर बांधले.
कोपरी नारायण मंदिर हे पेठ्यांचेच मुळ मंदिर असल्याने या मंदिरातील जीर्ण मुर्ती बदलण्याच्या सर्व कार्यात भालचंद्र पेठे अग्रेसर होते. नवीन मूर्ती बसविण्यापूर्वी मंदिराची डागडुजी, हुबेहुब मूर्तींसाठी मूर्तीकार शोधणे, पंढरपुरातून बनविलेल्या सर्व मूर्ती आणणे, मुर्तींची प्रतिष्ठापना अशा सर्व कामांमध्ये तनमनधनपूर्वक ते सहभागी होते. Highlights of Bhalchandra Pethe
पेठे ब्रेक मोटर्सचा प्रारंभ
लोणावळ्यातील कारखान्याचा विस्तार करणे आवश्यक होते. नविन कारखाना गुहागरात सुरु केला तर आपणही गुहागरात येऊ त्याचबरोबर येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल. रोजगाराचे केंद्र गुहागरवासीयांसाठी उभे राहील. या विचारातून त्यांनी गुहागरमधील ग्रामस्थांशी चर्चा सुरु केली. ही चर्चा ऐकल्यावर खालचापाट येथील नाटकवाले कै. वासुदेव जोशी (वासुमास्तर) यांनी पेठेंना सांगितले होते की, आपल्याला कारखान्याला जागा मिळाली नाही तर माझी आंब्यांची बाग मी तुला देईन, पण कारखाना इथे सुरु झाला पाहीजे. अशा प्रोत्साहनामुळेच 1981साली विजयादशमीला वरचापाटातील महादेव खरे यांच्या घरात छोटे युनिट सुरु झाले. कारखान्यासाठी जागेचा शोध सुरुच होता. खाऱ्या हवेत लोखंड चटकन गंजते हे लक्षात आल्याने गुहागर ऐवजी वरवेली, मोडकाआगर परिसरात जागेचा शोध सुरु झाला. याच शोधातून वासुमास्तरांच्या ओळखीतून मोडकाआगरला जमीन मिळाली. याच जमीनीमध्ये पेठे ब्रेक मोटर्स हा गुहागरातील पहिला औद्योगिक कारखाना सुरु झाला. आज या कारखान्यातून निवृत्त झालेल्या कामगारांची संख्या सुमारे 150 आहे. तर 52 कामगार आज कार्यरत आहेत. Highlights of Bhalchandra Pethe
महिला सक्षमीकरणातही अग्रेसर
इंजियनिरींग वर्क्समध्ये केवळ पुरुषच काम करु शकतात या वाक्याला छेद देण्याचा प्रयत्नही भालचंद्र वामन पेठे यांनी केला. पेठे ब्रेक मोटर्स या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या महिलांच्या हातालाही काम मिळावे म्हणून त्यांनी 2000 साली गुहागरमध्ये एक छोटे युनिट सुरु केले. या युनिटमध्ये कॉईल वायडींगचे काम महिला करत असतं. वरचापाट येथे 15 वर्ष 7 महिला हे काम करत होत्या. त्यानंतर हे युनिट असगोलीत गेले. तिथे 4 महिला कॉईल वायडींगचे काम करत आहेत. Highlights of Bhalchandra Pethe
असे गुहागरशी असलेले नाते दृढ करणारे, कामगारांच्या हिताबरोबरच त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणारे, साधी रहाणी – उच्च विचारसरणी या वाक्याशी अनुरुप जीवन जगणारे उद्योजक भालचंद्र वामन पेठे यांचे शुक्रवारी वार्धक्यामुळे वयाच्या 87 व्या वर्षी लोणावळा येथे निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी (13 डिसेंबर) लोणावळ्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृतात्म्यास सद्गती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना Highlights of Bhalchandra Pethe
