गुहागर : शाखा व्यवस्थापिकेच्या खुनाचा छडा पोलीसांनी अवघ्या 12 तासांत लावला. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह गुहागर पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र या तपासात पोलीस आरोपी पर्यंत कसे पोचले याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पोलीसांनी काढलेले निष्कर्ष, आरोपीने दिलेली उत्तरे यांची सुत्रबध्द मांडणी केल्यानंतर गुरुवारी रात्री 1.30 वा. अटकेची कारवाई करण्यात आली.
बुधवारी सायंकाळी 7 नंतर कधीतरी प्रत्यक्ष गुन्हा घडला असावा. अशा निष्कर्षापर्यंत पोचल्यावर पोलीसांनी अनेक संदर्भ मिळविण्यास सुरवात केली. फिर्यादी तृप्ती दुर्गुळेने दिलेली अचुक माहिती, सौ. सुनेत्रा यांच्या मोबाईलवरुन केलेले कॉल, सीडीआर रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज यांची माहिती पोलीसांनी मिळविली. संशयितांकडे चौकशी करण्यापूर्वी पोलीसांनी अनेक शक्यता तयार करुन ठेवल्या होत्या.
गुरुवारी नवानगर तरी जेटीजवळ मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु असताना देखील काही संशयितांवर पोलीसांची बारीक नजर होती. या संशयितांच्या चेहऱ्यावरील हावभाव, वागणं याची ही नोंद पोलीस करत होते. पण त्यावेळी संशयितांना या गोष्टी माहित नव्हत्या. ते बेसावध होते. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांच्या वेगवेगळ्या टीम वेगवेगळी कामे करत होत्या. या सर्वांचे एकत्रिकरण झाल्यावर सायंकाळी तपासाला वेग आला. संशयितांची चौकशी सुरु झाली. या चौकशीमध्ये प्रत्यक्ष गुन्हा केलेला फसला.
प्राथमिक चौकशीच्या वेळी संजय फुणगुसकरने, मी सौ. सुनेत्रा यांना शृंगारतळी येथे सोडले एवढेच सांगितले होते. मात्र पोलीसांनी मिळविलेली माहिती आणि संजयचे कथन यामध्ये तफावत होती. वेगवेगळ्या दिशेने सुरु झालेल्या चौकशीत संजय अडकू लागला. त्यामुळे संशय पक्का झाला. मग पोलीसी खाक्या दाखवल्यावर संजय घडाघडा बोलू लागला. त्याने सांगितलेला घटनाक्रम पुढीलप्रमाणे – बुधवारी (ता. 16) सायंकाळी संजय फुणगुसकर आपल्या वाहनातून सौ. सुनेत्रा दुर्गुळे यांना घेवून शृंगारतळीला आला. दोघही श्रृंगारतळीत चहा प्यायले. त्यानंतर श्रृंगारतळीतील एका दुकानात संजयने टी. व्हि. खरेदी केला. तो टी. व्हि. नवानगरला त्याच्या घरी पाठवून दिला. याच दरम्यान सौ. सुनेत्रा यांनी लेकीला फोन करुन मला संजय चिपळूणला सोडत असल्याचे सांगितले. याचवेळी संजयला शृंगारतळी येथे सत्यजित पटेकर भेटला. त्यानंतर संजय व सत्यजित सौ. सुनेत्रा यांना चिपळूणला सोडण्यासाठी निघाले. मात्र चिपळूणला न जाता संजयने आपले वाहन कारुळ फाट्यावरुन आत नेले. निर्जन रस्त्यावर लघवीला थांबण्याच्या बहाण्याने दोघे थांबले. सौ. सुनेत्रा झोपल्या होत्या. तीच संधी साधून चार चाकी वाहनातच त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर दोघेही श्रृंगारतळीला आले. एका बार मधुन बियर घेतल्या आणि आपली गाडी नवानगरकडे वळवली. नवानगर तरी जेटीजवळील चढात गाडी लावून दोघांनी सौ. सुनेत्राचे प्रेत बाहेर काढले. दोरी कमरेला व मांड्यांना बांधली. दोरीला दोन मोठे दगड बांधले आणि तरी जेटीजवळ प्रेत दाभोळच्या खाडीत फेकून दिले.
अशा रितीने संजय पोलीसांच्या जाळ्यात अडकला. अर्थात वाचण्यासाठी हे सर्व सोपे असले तरी संजयकडून मिळालेल्या माहिती सुत्रबद्ध करण्याचे कामही पोलीसांना करावे लागले. अखेर रात्री 1.30 वाजता. आरोपी निश्चित झाला. त्यानंतर संजय फुणगुसकर आणि सत्यजित पटेकर यांना अटक करण्यात आली.
दरम्यान गुरुवारी (ता. 17) शवविच्छेदनाची प्रक्रिया संपल्यावर रात्री उशिरा सौ. सुनेत्रा यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तोपर्यंत गुन्हेगार सापडल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली होती. दु;खद प्रसंगातही ही समाधानकारक वार्ता समजल्याने सौ. सुनेत्रा यांच्या लेकीने गुहागर पोलीस ठाण्यात फोन करुन पोलीसांना धन्यवाद दिले. मात्र त्यावेळी पोलीस अधिकारी म्हणाले, आई जाण्याचं दु:ख असतानाही, हुंदके आवरुन तुम्ही आमच्या चौकशीला सामोरे गेलात. त्यामुळे गुन्हा सोडवायला मदत झाली. पोलीस म्हणून गुन्ह्याचा तपास करणे हे आमचे कर्तव्यच. असे सांगताना पोलीस अधिकारीही भावनिक झाले होते.