गुहागर, ता. 24 : येथील नगरपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ही निवडणूक सर्व पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी लढविली. त्यामुळेच आरोप प्रत्यारोपांच्या, टोकाच्या टिकेच्या फैरींविना ही निवडणूक झाली. गुहागरच्या सुज्ञ मतदारांसह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या, सशक्त लोकशाहीचे दर्शन यानिमित्ताने घडवले आहे. Guhagar Nagar Panchayat Election
निवडणुका म्हटले की, नेत्यांचा लवाजमा, जाहीर सभा, मतदानाचे आवाहन करत गल्लीबोळातून फिरणारी वाहने हेच चित्र डोळ्यासमोर येते. किंबहूना असे घडले नाही तर ती निवडणूक कसली अशी प्रतिक्रिया सामान्यजनांमधुनही उमटते. मात्र गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हे चित्र पुसुन काढले. कार्यकर्ते, उमेदवार घराघरात जावून प्रचार करण्यात मग्न होते. Guhagar Nagar Panchayat Election
भाजप शिवसेना युतीच्या प्रचारासाठी पालकमंत्री उदय सामंत यांची प्रचारसभा झाली. या सभेतही पालकमंत्र्यानी टिकाटिपण्णी केली नाही. म्हणून युतीचे काही कार्यकर्ते नाराज झाले होते. पालकमंत्र्यांनंतर एक दिवस गृहराज्यमंत्री व दापोलीचे आमदार योगेश कदम प्रचारासाठी आले. त्यांनी बाजारपेठेत पदयात्रा काढत संपर्क केला. शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव देखील गुहागरात आले होते. त्यांनी मोहल्ल्यात सभा घेतील. त्यावेळी बचेंगे तो कटेंगे या वाक्प्रचाराचा वापर करुन मुस्लिम समाजाला शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. अन्य ठिकाणी आमदार जाधव यांनी आपल्याच कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधुन प्रचाराविषयी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी देखील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साहील आरेकर यांची भेट घेण्याची औपचारिकता पूर्ण केली. मनसेचे गुहागर विधानसभेचे उमेदवार आणि संपर्कप्रमुख प्रमोद गांधी मनसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी गुहागरमध्ये ठाण मांडून होते. असे असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीचा प्रचार, कार्यकर्त्यांचे नियोजन, मतदारांपर्यंत प्रचाराचे साहित्य पुरविण्याची व्यवस्था अशा सर्व बाबतीत सर्व पक्षांचे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते सक्रीय होते. या कार्यकर्त्यांनीच गुहागर नगरपंचायतीची निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. Guhagar Nagar Panchayat Election

लढवय्या साहील
या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण तालुकाध्यक्ष साहील आरेकर यांच्या माध्यमातून पक्षाला उभारी देणारा नेता मिळाला आहे, महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला दोन जागा देणाऱ्यावर युतीचे बलाढ्य नेते ठाम होते. साहीलसारख्या तरुण कार्यकर्त्यांला ते मान्य नव्हते. अशावेळी साहील आरेकर यांनी धाडसी निर्णय घेत नगराध्यक्ष पदासह 5 उमेदवार उभे केले. स्वबळावर पाच जागा लढविणे ही सोपी गोष्ट नाही. आर्थिक बळ नाही, कोणाताही नेता प्रचारासाठी, मार्गदर्शनासाठी नाही. असे असताना साहील आरेकर यांनी अनेक गोष्टी जुळवून आणल्या. राजकीय पटावर अनेक चाली रचुन त्यांनी युतीच्या पदाधिकाऱ्यांना हैराण करुन सोडले. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. साहील आरेकर यांना या सर्व कामात राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस संतोष जोशी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष शलाका काष्टे, तालुका सरचिटणीस महिला आघाडी वृषाली ठाकरे, शहराध्यक्ष मंदार कचरेकर, श्रीधर बागकर, माधव साटले, अनंत तानकर, संतोष वराडकर, मानसी शेटे, नेहा वराडकर आदी कार्यकर्त्यांनी मदत केली. Guhagar Nagar Panchayat Election

निलेशचे नेतृत्व सिध्द झाले
गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे निवडणूक प्रभारी अशी जबाबदारी निलेश सुर्वे यांच्यावर होती. प्रत्येक प्रभागातील उमेदवाराच्या प्रचारावर त्यांचे बारीक लक्ष होते. कार्यकर्त्यांना कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही याची काळजी ते घेत होते. त्याशिवाय भाजप शिवसेनेमधील समन्वयाची भूमिका जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी बजावली. त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष सतिश मोरे आणि माजी आमदार डॉ. विनय नातू यांची चांगली साथ मिळाली. निलेश सुर्वे यांच्या जोडीला तालुकाध्यक्ष अभय भाटकर, तालुका सरचिटणीस सचिन ओक, शहराध्यक्ष नरेश पवार आणि शहरातील संपूर्ण टीम होती. भाजपची निर्णय प्रक्रिया आजपर्यंत डॉ. विनय नातू यांच्याभोवती फिरत असे. यावेळी डॉ. विनय नातू मार्गदर्शन, परीक्षक या भूमिकेत राहीले. Guhagar Nagar Panchayat Election
पडद्यामागचे सुत्रधार राजेश बेंडल
शिवसेनेचा विचार केला तर समन्वयकाच्या भूमिकेत राजेश बेंडल दिसून आले. यापूर्वीच्या राजेश बेंडल यांच्या निवडणुकांचा विचार केला तर प्रदिप बेंडल पडद्यामागे राहून महत्वाची भूमिका पार पाडत असतं. यावेळी उलटे चित्र होते. युतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी आवश्यक समिकरणे जुळविण्यात राजेश बेंडल यांची महत्त्वाची भूमिका राहीली. उमेदवारांच्या निवडणूक निर्णय प्रक्रियेतील अनेक कामांची जबाबदारी शाम आठवले यांनी पेलली. प्रत्यक्ष फिल्डवरील लढाई तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, शहरप्रमुख निलेश मोरे, युवा सेना जिल्हा पदाधिकारी अमरदिप परचुरे, राकेश साखरकर, शाम आठवले, विरेश बागकर, प्रथमेश चाफेरकर, यांच्यासारखे पदाधिकारी आणि स्थानिक शिवसैनिक लढत होते. Guhagar Nagar Panchayat Election

मनसेने संधीचे सोने केले
गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच सौ. कोमल दर्शन जांगळी यांच्या रुपाने मनसेचा उमेदवार विजयी झाला आहे. दोन उमेदवारांपैकी एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मिळालेली जागा ताकदीने लढवून विजयश्री मिळविण्याचे काम मनसैनिकांनी केले. विधानसभेतील प्रचाराचा अनुभव असणारे प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, सचिव प्रशांत साटले, शहराध्यक्ष अभिजीत रायकर, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर, उपशहराध्यक्ष विक्रांत सांगळे, नवनाथ साखरकर, नेहा साखरकर या कार्यकर्त्यांनी झटून काम केले. Guhagar Nagar Panchayat Election
शिवसेना उबाठाची सुत्र तरुणांच्या हाती
शिवसेना उबाठाने ही निवडणूक आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली. आमदार जाधव हे निवडणुकीच्या नियोजनात मातब्बर आहेत. निवडणुकीतील कामांचे मायक्रो प्लॅनिंग करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. या नियोजनाप्रमाणे कार्यकर्त्यांनी काम केले पाहीजे हा त्यांचा आग्रह असतो. गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीतही त्यांनी प्रभागनिहाय नियोजन केले होते. प्रत्येक प्रभागात कोणत्या कार्यकर्त्यांने लक्ष द्यावे याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. जयदेव मोरे यांच्या नेतृत्वात समीर साखरकर, समीर कनगुटकर, निरज बागकर, आदेश मोरे, सचिन कचरेकर, प्रविण रहाटे, विनायक जाधव, कल्पेश बागकर, विनोद कदम, प्रशांत रहाटे, स्वप्नील राऊत, सौ. स्नेहा वरंडे, वैभव गमरे, पराग मालप, कौस्तुभ मोरे, सिध्देश पावसकर, दिपक जाधव, महिला शहर संघटिका सारिका कनगुटकर, तालुका संघटिका सिध्दी सुर्वे आदी कार्यकर्त्यांनी शिवसेना उबाठाच्या प्रचाराची धुरा सांभाळली. Guhagar Nagar Panchayat Election
