गुहागर डॉक्टर संघ विजेता तर रत्नागिरी डॉक्टर संघ उपविजेता
गुहागर, ता. 20 : गुहागर तालुका मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे जिल्हास्तरीय क्रिक्रेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे विजेतेपद गुहागर डॉक्टर संघाने पटकावले तर रत्नागिरी डॉक्टर्स संघ उपविजेता ठरला. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शृंगारतळी येथील गोल्डन पार्क मैदानात या स्पर्धा पार पडल्या. Guhagar Medical Association Cricket Tournament
डॉक्टर हा केवळ उपचार करणारा व्यावसायिक नसून समाजाच्या आरोग्याचा आधारस्तंभ आहे. रुग्णसेवेच्या धावपळीतून थोडासा विरंगुळा, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक समाधान मिळवण्यासाठी खेळणं अत्यंत आवश्यक आहे. क्रिकेटसारखा खेळ संघभावना, शिस्त, नेतृत्व आणि संयम यांसारखी जीवनमूल्ये शिकवतो, जी आपल्या वैद्यकीय व्यवसायातही तितकीच महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर व्यावसायिक जीवनामध्ये ज्येष्ठ डॉक्टर आणि तरुण डॉक्टर यांच्यातील वयाची दरी कमी करण्याचे खेळ हे प्रभावी साधन आहे. या विचाराने गुहागर तालुका मेडिकल असोसिएशनने जिल्हास्तरीय डॉक्टरांच्या क्रिक्रेट स्पर्धेचे आयोजन केले होते. Guhagar Medical Association Cricket Tournament
स्पर्धेची सुरवात दिप प्रज्ज्वलाने करण्यात आली. यावेळी गुहागर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ मंदार आठवले, माजी अध्यक्ष डॉ राजेंद्र पवार, डॉ सुरेश भाले, डॉ प्रकाश शिर्के, डॉ संदीप जाधव यांच्यासह तालुक्यातील सर्व डॉक्टर उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील डॉक्टरांच्या टीम शृंगारतळीत दाखल झाल्या होत्या. या स्पर्धेचे आयोजन करताना केवळ जिल्ह्यात प्रॅक्टीस करणारे डॉक्टरच खेळतील या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. स्पर्धेच्या उद्घाटनानंतरचा पहिला सामना गुहागर मेडिकल असोसिएशन अ टीम विरुद्ध चिपळूण डॉक्टर्स असोसिएशन यांच्यामध्ये झाला. पहिली सेमीफाइनल रत्नागिरी टीम विरुद्ध खेड आणि दुसरी सेमिफायनल गुहागर विरुद्ध मंडणगड यांच्यामध्ये झाली. दोन्ही मॅचेस अटीतटीच्या झाल्या. अंतिम सामना गुहागर डॉक्टर्स विरुद्ध रत्नागिरी डॉक्टर्स यांच्यामध्ये झाला. हा सामना जिंकत यजमान गुहागर डॉक्टर्स संघ स्पर्धेतील विजयी संघ ठरला. तर रत्नागिरी डॉक्टर्स संघ उपविजेता ठरला. Guhagar Medical Association Cricket Tournament
स्पर्धेदरम्यान गुहागर तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहून आपल्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. गुहागर मेडिकल असोसिएशनच्या सर्व महिला डॉक्टर्सनी सकाळपासून या स्पर्धेला उपस्थित राहून सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. जिल्ह्यातील सर्व डॉक्टर खेळाडुंनी खिलाडू वृत्ती दाखविल्याने, शिस्त पाळल्याने आयोजकांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व स्पर्धा रंगतदार झाली. विशेष म्हणजे या स्पर्धेचे आयोजन, नियोजन आणि प्रत्यक्ष मैदानातील कामगिरी या सर्व श्रेणीत गुहागर तालुका मेडिकल असोसिएशन उत्तम ठरली. तसेच जिल्ह्यातील सर्व डॉक्टर एकत्र आल्याने एक छोटेखानी स्नेहसंमेलनच गोल्डन पार्कच्या मैदानावर पहायला मिळाले. Guhagar Medical Association Cricket Tournament
