गाव पॅनेलतर्फे वैभवी जाधव सरपंच तर महेंद्र गावडे उपसरपंच
गुहागर ता. 09 : तालुक्यातील गिमवीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये अल्पमतात असलेल्या गाव पॅनेलने गनिमी कावा साधला. शिवसेना पुरस्कृत पॅनेलमधुन एका महिला सदस्याला आपल्या गटात खेचून सरपंच पद दिले. त्यामुळे उपसरपंच पद गावपॅनेलच्या उमेदवाराला मिळाले. रात्रीस चालेल्या या खेळात आपला भुमिगत सदस्य शोधण्यासाठी शिवसेना पुरस्कृत पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले होते.
गिमवीतील निवडणूकीत शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे 5 सदस्य निवडून आले तर गाव पॅनेलचे ४ सदस्य निवडून आले. येथील सरपंच पद सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित असल्याने शिवसेना पुरस्कृत पॅनेलच्या वैभवी विजय जाधव यांनी सरपंच पदावर दावा सांगितला होता. मात्र शिवसेना पुरस्कृत पॅनेलने अन्य महिला सदस्याला सरपंच करण्याचे आश्र्वासन दिले होते. गेल्या पंधरा दिवसात हा तिढा सोडविण्यात पॅनेल अपयशी ठरले. त्याचवेळी शिवसेना पुरस्कृत पॅनेलची अडचण लक्षात घेवून गाव पॅनेलने ‘‘येईल त्याचा सन्मान होईल’’ अशी भूमिका घेवून सरपंच पदासाठी डाव टाकला. गिमवी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये देवघर हे देखील महसुली गाव आहे. हे लक्षात घेवून गाव पॅनेलने देवघरची अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न केला. सरपंच पदासाठी अडीच वर्षांचे आश्र्वासन देण्यात आले. उपसरपंच पदाचेही आश्र्वासन देण्यात आले. मात्र वेगवेगळी गणिते मांडूनही गावपॅनेलचा डाव यशस्वी होण्याची चिन्हे नव्हती. नारळावर हात ठेवून घेतलेल्या शपथा विसरण्यास शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे सदस्य तयार नव्हते.
मात्र अखेरच्या क्षणाला विजय जाधव यांनी सरपंच पद पत्नीला देण्याचे आश्र्वासन गावपॅनेलकडून मिळविले. गावपॅनेलने ते मान्य केले. सरपंचपद पत्नीला आणि उपसरपंच पद गाव पॅनेलला. असे सुत्र ठरले. आता एका रात्रीत गडबड नको म्हणून डॉ. संदिप जाधव यांनी सत्तेच्या खेळाची सुत्रे हाती घेतली. गावपॅनेलच्या 4 सदस्यांसह सौ. वैभवी जाधव व विजय जाधव यांना गावातून अज्ञातस्थळी हलविण्यात आले.
सोमवारी (ता. 8 फेब्रुवारी) सायंकाळी सरपंच, उपसरपंच पदाची नावे निश्चित करण्यासाठी शिवसेना पुरस्कृत पॅनेलने बैठक बोलावली होती. या महत्त्वाच्या बैठकीचा निरोप देताना विजय जाधव आणि सौ. वैभवी जाधव गायब असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. जाधव पतीपत्नीची शोध सुरु झाला. तेव्हा गाव पॅनेलचे ग्रामपंचायत सदस्यही बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. शोधाशोध करण्यात रात्र संपली. त्याचवेळी घात झाल्याचे लक्षात आले.
निवडणुकीचा दिवस (9 फेब्रुवारी) उजाडला. तेव्हा नाट्यमयरित्या जाधव दाम्पत्यासह गावपॅनेलच्या सदस्य ग्रामपंचायतीत दाखल झाले. गाव पॅनेलमधला एखादा उमेदवार मिळाला तरी बाजी पलटायचा शेवटचा डाव शिवसेना पुरस्कृत पॅनेल टाकून पाहीला. मात्र त्यातही अपयश आले. अखेर गिमवीच्या सरपंच पदाची माळ सौ. वैभवी विजय जाधव यांच्या गळ्यात पडली. तर उपसरपंच पदी महेंद्र दत्ताराम गावडे हे भाजप कार्यकर्ते गावपॅनेलकडून विजयी झाले.
तालुक्यातील अडूर, कोंडकारुळ, वेळणेश्र्वर, तळवली, पेवे, मळण, उमराठ, जामसुद या ग्रामपंचायतींमधील सरपंच उपसरपंच पदी कोणाची निवड झाली हे वाचण्यासाठी ग्रामपंचायतींचे निकाल या लाल रंगातील अक्षरांवर क्लिक करा.