गुहागर : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रिडा, सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दि. ३ ते ७ मार्च या कालावधीत होणाऱ्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज मोठ्या दिमाखात पार पडला. या स्पर्धेचा शुभारंभ गुहागर नगरपंचायत आरोग्य व स्वच्छता समिती सभापती अमोल गोयथळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर नगरसेविका सौ. मृणाल गोयथळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. सलग पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला असून तालुक्यातील क्रीडा रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभणार आहे.
स्पर्धेच्या शुभारंभ कार्यक्रमाला फ्रेंड सर्कल कला क्रिडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. सागर मोरे, उपाध्यक्ष श्री. अनिकेत भोसले, सचिव श्री. रोहन विखारे, खजिनदार श्री. अनराज वराडकर, माजी नगराध्यक्ष श्री. जयदेव मोरे, सुहास सुर्वे, अजय खातू , हेमचंद्र आरेकर , दशरथ आरेकर, वसंत पावसकर, सुनिल गोयथळे, अमोल वराडकर, सिद्धार्थ वराडकर, संतोष मोरे, गुहागर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मंदार गोयथळे तसेच मंडळाचे सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज विखारे यांनी केले.
फ्रेंड सर्कल कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ हे तालुक्यातील जुने क्रीडा मंडळ आहे. गेली अनेक वर्षे या मंडळाच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे उत्तम नियोजन पद्धतीने आयोजन करण्यात येते. या मंडळाने क्रीडा क्षेत्राला चांगले खेळाडू दिले आहेत. फ्रेंड सर्कलने अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्याही आहेत. या मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धांना तालुक्यातील क्रीडा रसिकांचा नेहमीच उदंड प्रतिसाद मिळत आला आहे. पुढील चार दिवस खालचापाट परिसरात जत्रेचे स्वरूप दिसणार आहे.