गुहागर, ता.12 : तालुक्यातील नरवण गावचा असा एक स्वातंत्र्यवीर ज्याने इथे अठराविश्र्व दारिद्रय पाहिले. माधुकरी मागून शिक्षण घेतले. पूण्यात असताना स्वदेशसेवेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेवून हा तरुण स्वातंत्र्य चळवळीच्या वारुवर स्वार झाला. प्रत्येकाचे कर्म आधीच लिहिलेले असते. त्याप्रमाणे अमेरिकेत एम. ए. झाल्यानंतर या स्वातंत्र्य सैनिकाची कर्मभूमी ठरली बुलडाणा. येथे सामाजिक कार्य आणि स्वातंत्र्य चळवळीत कार्यमग्न असणाऱ्या या स्वातंत्र्यवीराला येथील जनतेने बुलडाण्याचे नगराध्यक्ष, कायदे मंडळाचे उपाध्यक्ष केले. आजही बुलढाणा शहरात या स्वातंत्र्य सैनिकाचा उल्लेख गौरवाने केला जातो. मात्र कोकणभूमीला त्याचा विसर पडलाय. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुहागरच्या या अपरिचित स्वातंत्र्यसैनिकाचा परिचय गुहागर न्यूजद्वारे आम्ही करुन देत आहोत. Freedom Fighter of Naravan


लेखक : प्रकाशराव देशपांडे, कार्याध्यक्ष लोटिस्मा, चिपळूण
दिनकरशास्त्रीचा जन्म गुहागर तालुक्यातील नरवण गावी झाला. जन्मतारीख उपलब्ध नाही. मात्र त्यांनी लिहिलेल्या आपल्या आत्मचरित्रात मे १८८६ साल लिहिलेले आहे. त्यांचे वडील भिक्षुक होते. घरची परिस्थिती अंत्यंत दयनीय होती. प्राथमिक अक्षर ओळख झाल्यानंतर गुहागर आणि नंतर मुंबईला चौथीपर्यंत शिकले. १८९६ साली प्लेगची साथ आल्याने मुंबई सोडून पुन्हा नरवणला यावे लागले. थोड्याच दिवसात आईचे नवज्वराने निधन झाले. लहान वयातच वडिलांनी घरातून बाहेर काढले. शेवटी एका परिचित गृहस्थांनी त्यांना चिपळूणला पाठविले. चिपळूणला त्यांचे काका न्यायालयात नाझर होते. काकांनी नाईलाजाने ठेवून घेतले. दिनकरला इंग्रजी शिकायचे होते. मात्र काकांनी मराठी शाळेत घातले. चळवळया दिनकरने गावातील शंकराच्या देवळात आपल्या सवंगड्यासमवेत लहानसा सार्वजनिक गणेशोत्सव केला. या उत्सवात स्वतः लिहिलेला उद्योगधंद्यांचे महत्व हा निबंध समोर जमलेल्या १७-१८ श्रोत्यासमोर वाचला. दिनकरशास्त्री म्हणतात यावर ‘हाच माझा सार्वजनिक कार्यप्रवेश’ शाळेतल्या गणेशोत्सवात दुसऱ्या दिवशी आपला देश आपला धर्म या विषयवार विद्यार्थी शिक्षक व काही नागरिक अशा १५० लोकांसमोर व्याख्यान दिले. सार्वजनिक जीवनातले पहिले व्याख्यान चिपळूणच्या शाळेत झाले. अखेर इंग्रजी शिकायचे हा निर्धार करून चिपळूण सोडून रत्नागिरीला गेले. माधुकरी मागून शिकू लागले. तिथून पुण्याला गेले. त्या शाळेत एक वर्षात दोन तीन इयत्तांचा अभ्यास करून घेत. ही शाळा राष्ट्रीय विचारांची होती. इथे ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. याचवेळी दिनकरने देशकार्याला वाहून घ्यायचा निर्णय घेतला. Freedom Fighter of Naravan
१९०५ साली बनारसला कॉंग्रेसचे अधिवेशन झाले. लोकमान्यांनी कॉंग्रेसची चळवळ चालवण्यासाठी प्रचारक तयार करून संघटना वाढविण्याचा विचार मांडला. दिनकरशास्त्रीनी आपण वडिलांना पत्र लिहून ‘तुमचा मुलगा यापुढे तुमच्या घराण्यास वा तुम्हा सर्वांस अंतरला. त्याने विवाह व नोकरी न करण्याचा निश्चय करून देशसेवेस अर्पण केले आहे. कुळाचे दृष्टीने तो प्लेगने मेला असे समजावे. स्वदेशसेवा करित असता मेलेला कळेल तेव्हा त्यास स्वर्ग मिळून त्याने सर्व कुलाचा उद्धार केला असे समजावे. असे कळविले. नंतर तळेगावला राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून गेले. ती शाळा इंग्रजांनी बंद पाडल्यानंतर इंग्रजांचा वरवंटा सर्वत्र फिरू लागला. आता व्याख्याने देण्यावरही गंडांतर आले. अखेर निदान धार्मिक प्रवचनातून देशकार्य करता येईल त्यासाठी धर्म शिक्षण हवे म्हणून ते वाईला केवलानंद सरस्वतींच्या प्रज्ञापाठशाळेत शिकायला गेले. तीथे १९१४ साल पर्यंत राहिले. या शिक्षणामुळेच दिनकर लक्ष्मण कानडे हे दिनकरशास्त्री कानडे झाले. याच प्रज्ञापाठशाळेत त्यांच्या समवेत शिक्षण घेणारे होते आचार्य विनोबाजी.( Acharya Vinobaji) Freedom Fighter of Naravan
दिनकरशास्त्री यांना वक्तृत्त्वाची ईश्वरदत्त देणगी लाभली होती. त्यांनी गीता प्रवचनातून लोकमान्यांनी दिलेली कर्मयोगाची शिकवण देण्यासाठी गावोगावी व्याख्याने दिली. लोकमान्यांच्या निधनानंतर शास्त्रीबुवांनी महात्माजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत पुन्हा एकदा झोकून दिले. अनेकवेळा कारावास सोसला. याच काळात दिनकरशास्त्रींचा अमेरिकतून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या गदर पार्टीशी संबंध आला. व ते अमेरिकेला गेले. तिथे बर्कले विद्यापीठातून अर्थशास्त्रा वरची एम. ए. ची पदवी मिळविली. मात्र तिथे त्यांना प्लूरसीची बाधा झाली. त्यात एक फुफुस निकामी झाले. भारतात आल्यानंतर कोरड्या हवेत रहावे म्हणून नागपूरला गेले. मात्र तिथली हवा मानवली नाही. नागपूरला बुलडाण्याचे लोक आले होते. त्यांनी शास्त्रीबुवांना बुलडाण्यात येणाचा आग्रह केला. आणि ते बुलडाण्याला गेले. पुढची जवळजवळ तीस वर्ष ते तिथेच राहिले. तिथेही त्यांचे समाजकार्य, स्वांतंत्र्य चळवळीविषयीचे काम सुरु होते. लोकआग्रहास्तव 1938 मध्ये दिनकरशास्त्री बुलढाणाचे नगराध्यक्ष झाले. 1941 पर्यंत उत्तम कारभार करताना पालिकेची कर्जामुळे गहाण पडलेली इमारत त्यांनी सोडवली. पालिका कर्जमुक्त केली. 1941 मध्ये काँग्रेस पक्षाने असहकार आंदोलनाची घोषणा केली आणि दिनकरशास्त्रींनी पालिकेचे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. Freedom Fighter of Naravan


वऱ्हाड हा तेव्हा मध्यप्रांतात होता. १९४६ साली मध्यप्रांताच्या कायदे मंडळाची निवडणूक झाली. बुलडाण्यातून दिनकरशास्त्री निवडून आले. रविशंकर शुक्ल मुख्यमंत्री तर घनश्यामदास गुप्त अध्यक्ष आणि शास्त्रीबुवा उपाध्यक्ष झाले. १९५२ साली विदर्भातर्फे मुंबई राज्य विधानपरिषदेवर प्रतिनिधी म्हणून ते निवडून गेले होते. बुलडाणा भागातील क्षय रोगाला प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रीबुवांनी लोकवर्गणीतून तीन लाख रुपये गोळा करून शासनाला दिले. त्यातून सरकारने क्षयरोग आरोग्यधाम सुरु केले. याशिवाय नॉर्मल स्कूल‚ ग्रामसेवक प्रशिक्षण शाळा‚ गांधीभवन‚ टिळक नाट्यविद्यामंदिर या संस्था सुरु केल्या. शरीर थकले तरी समाजसेवेचे व्रत अखंड राहिले. अखेर २८ सप्टेंबर १९५७ रोजी हा कर्मयोगी नश्वरदेह सोडून गेला. नरवणमध्ये कै. दिनकरशास्त्री कानडे यांची आठवण म्हणून डॉ. अनिल जोशी यांच्या प्रयत्नातून वाचनालय सुरु आहे. नरवण ग्रामपंचायतीनेही दिनकरशास्त्रींचा परिचय ग्रामस्थांना होण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन केले होते. Freedom Fighter of Naravan
‘राष्ट्रध्वजाचा इतिहास’ ही बातमी वाचण्यासाठी इथे क्लिंक करा.