साथ साथ चॅरीटेबल ट्रस्ट, पिंपर फाट्यावरुन वहातूकीचीही व्यवस्था
गुहागर : वेळणेश्र्वर येथे ग्रामविकास प्रकल्प उभा करत असलेल्या साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर बुधवारी 17 फेब्रुवारीला विवेकानंदालय येथे होणार आहे. शिबिरामध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या ग्रामस्थांना पिंपर फाटा येथून विवेकानंदालयापर्यंत वहातूकीची व्यवस्थाही साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टने केली आहे.
तालुक्यातील वेळणेश्र्वर येथे साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे ग्रामविकास प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. स्वामी विवेकानंद जयंतीचे दिवशी या ट्रस्टने बचत गटांसाठी पापड निर्मितीचे प्रशिक्षण दिले. शेतकऱ्यांना नाचणी पिकाचे मुल्यवर्धनाबाबत मार्गदर्शनाची व्यवस्था केली. तर बागायतदारांसाठी मार्गदर्शन शिबिर भरविले होते. त्यानंतर महिनाभराने आरोग्य विषयक उपक्रमाचे नियोजन साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे.
भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय, डेरवणच्या मदतीने गुहागर तालुकावासीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. हे शिबिर बुधवारी 17 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत पिंपर फाट्यावरील विवेकानंदालय येथे होणार आहे. वालावलकर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर शिबिरस्थळी येणाऱ्या रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करणार आहेत.
सदर शिबिरामध्ये हर्निया, अपेंडिक्स, पित्तशयातील खडे, अल्सर, प्रोस्टेट ग्रंथी, मूळव्याध, मुतखडा, चरबीच्या गाठी ,थायरॉईड, महीलांच्या गर्भाशयाचे विकार, टॉन्सिल्स, मोतिबिन्दु नाकाचा हाड वाढणे, कानाच्या पडद्याची समस्या अशा व्याधींनी त्रस्त रुग्ण आढळल्यास अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यासाठी नोंदणी देखील केली जाणार आहे.
ग्रामीण भागातील जनता अनेकवेळा आरोग्याच्या किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष करते. त्यातून पुढे गंभीर समस्या निर्माण होतात. वेळेवर उपचार झाले तर कमी खर्चात रुग्ण व्याधीमुक्त होवू शकतो. असा विचार करुन साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने मोफत आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे. तालुकावासीयांना पिंपर फाट्यावरुन शिबिरस्थानि म्हणजेच विवेकानंदालय येथे ने आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तरी तालुक्यातील सर्वांनी विशेषत: ग्रामीण भागातील जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष शरद जोशी यांनी केले आहे.