भारतातील पहिलीच घटना; दोन वर्षांच्या मुलीचा जीव वाचवला
गुहागर, ता. 22 : मुंबईत दोन वर्षांच्या बालिकेला गंभीर स्वरूपाच्या यकृताच्या कॅन्सरचे निदान झाले होते. तिच्या यकृताच्या आत आणि भोवतालच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांपर्यंत कॅन्सर पोहोचल्यामुळे पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. त्यामुळे वाडिया रुग्णालयातील कुशल डॉक्टरांनी तिचे यकृत साडेचार तास शरीराबाहेर ठेवून, त्यातील ७० ते ८० टक्के कॅन्सरग्रस्त भाग काढून उर्वरित निरोगी यकृत पुन्हा प्रत्यारोपित करण्याची महत्त्वाची शस्त्रक्रिया पार पाडली. या स्वरूपाची ही भारतातील पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या या शस्त्रक्रियेमुळे यकृताचा कॅन्सर असलेल्या बालकांना जीवनदान मिळेल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. First incident in India
या मुलीच्या पोटात सूज आल्याने तपासणी केली असता, तिला गंभीर स्वरूपाचा हेपॅटोब्लास्टोमा असल्याचे निदान ऑन्कोलॉजिस्ट डॉ. संगीता मुदलियार यांनी केले. बालकांमधील सर्वाधिक आढळणाऱ्या यकृताच्या कॅन्सरपैकी हा एक आहे. मात्र त्या मुलीबाबत हा कॅन्सर यकृताच्या मध्यभागी असल्याने आणि यकृताच्या आत तसेच आजूबाजूच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पसरल्यामुळे शस्त्रक्रिया करणे अत्यंत आव्हानात्मक होते. त्यामुळे वाडिया रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी वरीलप्रमाणे, अत्यंत नाविन्यपूर्ण मार्ग स्वीकारला. First incident in India

गाठीचे स्थान आणि महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये समावेश असल्यामुळे पारंपरिक शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. यकृत प्रत्यारोपणाचा पर्याय होता. मात्र केमोथेरपीनंतर लगेचच दात्याचे (जिवंत किंवा मृत) अवयव उपलब्ध नसल्यामुळे हा पर्याय शक्य नव्हता. निदानानंतर केमोथेरपी देण्यात आल्याने गाठीचा आकार कमी झाला होता, तसेच यकृतातून होणारा रक्तप्रवाह पूर्णपणे रोखला होता. त्यामुळे संपूर्ण यकृत काढून टाकणे आणि रक्तवाहिन्यांची पुनर्रचना करणे गरजेचे होते. ते पारंपरिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून शक्य नव्हते. First incident in India
बाळाचे यकृत आकाराने लहान, सुमारे ५०० ग्रॅम वजनाचे होते. त्यामुळे संपूर्ण यकृत कोणतीही हानी न होता शरीराबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या दुर्मिळ ‘एक्स-सिटू’ (शरीराबाहेरील) शस्त्रक्रिया तंत्रामध्ये रुग्णाच्या शरीरातून संपूर्ण यकृत बाहेर काढण्यात आले, त्यानंतर शरीराबाहेरच साडेचार तास थंड तापमानात ते सुरक्षित ठेवण्यात आले. यामुळे ट्यूमरबाधित यकृत काढून टाकून, रक्तवाहिन्यांची पुनर्रचना करण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुनर्रचना केलेला यकृताचा उर्वरित निरोगी भाग पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आला, अशी माहिती यकृत प्रत्यारोपण आणि हेपॅटोबिलिअरी शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक माथूर यांनी दिली. १४ तास सुरू असलेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान ॲनेस्थेशिया आणि अतिदक्षता विभागाची सतर्कता यांमुळे आठवड्याभरातच या मुलीला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर आठवड्यानंतर घरी सोडण्यात आले. First incident in India
डॉ. अभिषेक माथूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेसाठी प्रो. डॅरियस मिर्झा, डॉ. प्रज्ञा बेंद्रे, डॉ. शैलेश साबळे, डॉ. गायत्री मुंघाटे आणि डॉ. सौरिन दानी यांनी मोलाचे सहकार्य केले. अवयव प्रत्यारोपण विभागाच्या आणि बालरोग शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा बेंद्रे आणि वाडिया रुग्णालयाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी अत्यंत गुंतागुंतीच्या व्याधीमध्ये मुलांना वैद्यकीय मदत देता आली, याचे समाधान व्यक्त केले. First incident in India