६०० वृक्षरोपांच्या वाटपाला उदंड प्रतिसाद
रत्नागिरी, ता. 16 : तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदंब वृक्षाचा पहिला वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये आवाहन केल्यानुसार एक झाड आईच्या नावे या उपक्रमाअंतर्गत आणि ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांच्या संकल्पनेतून दिवंगत व्यक्तींच्या नावानेसुद्धा ६०० रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. First Birthday of Kadamba Tree
सकाळी ग्रंथालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. धामणसे गावाच्या विकासासाठी योगदान दिलेल्या २० दिवंगतांच्या नावाने रोपे वाटप करून वेगळेपणा जपण्यात आला. गतवर्षी लावलेल्या कदंब झाडाला ज्यांनी ग्रंथालयाला मोफत जागा दिली. त्यांच्या आईचे (कै.) श्रीमती शकुंतला शंकर कानडे यांचे नाव देण्यात आले. कदंब झाडाच्या वाढदिवसानिमित्त झाडाला शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाढदिवसानिमित्त केक ऐवजी कलिंगड कापण्यात आले. हा अनोखा उपक्रम शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ, ग्रंथालयाचे संचालक आदी २०० जणांच्या उपस्थितीत साजरा झाला. First Birthday of Kadamba Tree


ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी याप्रसंगी सांगितले की, संस्थेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. एका पेटीत पुस्तके ठेवून हे ग्रंथालय सुरू झाले. पूर्वीच्या लोकांनी ग्रंथालय चालवले. त्यामुळेच मला काम करण्याची संधी मिळाली. आपल्याला काम करायचे असेल तर आपली रेष मोठी करावी लागते. विद्यार्थ्यांनी वाचन करावे, वाचल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. यंदा ग्रंथालयातर्फे समाजोपयोगी उपक्रमांची मालिका राबवण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करण्यात येत आहे. First Birthday of Kadamba Tree
आज प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना काजू, बेल, चिंच, आवळा, सोनचाफा, पेरू, खैर, साग व कडूनिंब या प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या ६०० रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग जपूया, आनंदी होऊया, उन्हातान्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलोपावली अशा विविध घोषणा दिल्या. तसेच फलकांद्वारे जागृती केली. यावेळी झाड मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. First Birthday of Kadamba Tree


सरपंच अमर रहाटे यांनी सांगितले की, संस्थेने कसे जागरूकपणे कार्यक्रम करावे हे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी नाविन्यपूर्ण कार्यक्रम उपक्रमातून दाखवत हे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहेत. आज उमेश कुळकर्णींचा वाढदिवससुद्धा आहे, याचे औचित्यही साधत अशा पद्धतीचे कार्यक्रम केले पाहिजे. अनेकजण स्वतःचा वाढदिवस केक कापून साजरा करतो, तसा झाडाचासुद्धा वाढदिवस साजरा केला ही बाब कौतुकास्पद आहे. First Birthday of Kadamba Tree


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पांचाळ यांनी केले. प्रास्ताविक चिटणीस मुकुंद गणेश तथा बाळासाहेब जोशी यांनी केले. कार्यक्रमाला अध्यक्ष उमेश कुळकर्णी, सरपंच अमर रहाटे, रत्नागिरी जिल्हा कृषी, औद्योगिक संघ संचालक व ग्रामपंचायत सदस्य सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक जाधव, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष विलास पांचाळ, चिटणीस मुकुंद जोशी, सदस्य प्रशांत रहाटे, अनंत जाधव, विश्वास धनावडे, सौ. स्मिता कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य दीपक रेवाळे, ग्रंथपाल केशव कुळकर्णी, लिपिक अविनाश लोगडे, नंदादीप नेत्रालयाचे विपणन अधिकारी हृषिकेश मयेकर, सेल्फ लेस सर्विंग सोसायटीच्या संचालिका कोनिका दत्त, मानसशास्त्रज्ञ गौरी चाफेकर आदी उपस्थित होते. तसेच आंबा व्यापारी बंड्या हर्षे, अनंत गोताड, मारूती लोगडे, माध्यमिक विद्यालयाचे श्री. सुतार, श्री. गायकवाड, अंगणवाडी सेविका व मदतनीस, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ढापरे व अन्य शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. First Birthday of Kadamba Tree