जीवितहानी नाही, आगीचे कारण अस्पष्ट
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत हद्दीतील, शृंगारतळी बाजारपेठेच्या मागच्या बाजुला असणाऱ्या आशियाया (Ashiyana) अपार्टमेंटमधील एका ब्लॉकला आज आग (Fire) लागली. या ब्लॉकमध्ये कोणीच रहात नसल्याने तसेच आग इतरत्र न पसरल्याने जीवीतहानी व वित्तहानी झाली नाही. ही आग कशी लावली, कोणी लावली याचा तपास गुहागर पोलीस करत आहेत. (Fire in Ashiyana)
शृंगारतळी बाजारपेठेपासून काही अंतरावर जानवळे ग्रामपंचायत हद्दीत आशियाना अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर नादिर बामणे रहातात. त्याच्या शेजारी असलेला ब्लॉक विक्री न झाल्याने रिकाम आहे. या ब्लॉकमध्ये अपार्टमेंटचा बिल्डर अधुनमधुन येत असतो. त्याने काही वस्तु, कागदपत्रे, फर्निचर आदी सामान या ब्लॉकमध्ये ठेवले आहे.

Fire in Ashiyana
मंगळवारी (ता. 31 मे) सायंकाळी 4.30 च्या सुमारास आशियाना अपार्टमेंटमधील याच ब्लॉकला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच अपार्टमेंटसह आजुबाजुला रहाणाऱ्या ग्रामस्थांनी ही माहिती पोलीसांपर्यंत पोचवली. तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीतील अग्निशामक दलाला सांगितले. तातडीने आरजीपीपीएलचे अग्निशामक दल बंबासह शृंगारतळी बाजारपेठत पोचले. मात्र बाजारपेठेतून आशियाना अपार्टमेंटपर्यंत जाण्याचा रस्ता अरुंद असल्याने अग्निशामक दलाचा बंद इमारतीपर्यंत पोचू शकला नाही. सुदैवाने आग अन्यत्र पसरली नाही. त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र या आगीमध्ये ब्लॉकचे नुकसान झाले आहे.
आगीचे कारण अस्पष्ट
घटनास्थळी सुरु असलेल्या चर्चांमध्ये ही आग ब्लॉकच्या दरवाजावर कोणीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली आहे. काहींच्या मते आग लावणारा अज्ञात इसम आशियाना अपार्टमेंटशी संबंधित आहे. तर काहींच्या मते डोक्यावर परिणाम झालेल्या अज्ञात इसमाने ही आग लावली असावी. अशी विविध मते समोर आली आहेत.
आग लागल्याची माहिती मिळताच गुहागर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल स्वप्नील शिवलकर, लुकमान तडवी आणि प्रतिक रहाटे घटनास्थळी आले. त्यांनी संपूर्ण ब्लॉकची पहाणी केली. पंचनामा केला. या पंचनाम्यामध्ये आगीचे कारण अस्पष्ट असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे सदरची आग कशी लागली. मुद्दाम कोण लावली की आपोआप लागली. मुद्दाम आग लावली असेल तर त्याचे कारण काय. या सर्व गोष्टींचा तपास गुहागर (Guhagar) पोलीस करत आहेत.
